ऑस्ट्रीया येथे खुल्या गटाच्या बॅडमिंटन स्पर्धा , नाशिकच्या स्मित तोष्णीवालला कास्य पदक
नुकत्याच २६ ते २९ मे, २०२२ दरम्यान ऑस्ट्रीया येथे खुल्या गटाच्या बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष एकेरी. पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अश्या पाच गटांचा समावेश होता. या स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताचे प्रतीनिधीत्व करणाऱ्या नाशिकच्या स्मित तोष्णीवालने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेत कास्य पदक मिळविले.
या स्पर्धेत सहावे मानांकन मिळालेल्या स्मित तोष्णीवालने अत्यंत चुरशीच्या झालेल्या पहिल्या सामन्यात जोमाने खेळ करून इंडोनेशियाच्या मुटियारा आयू पुसटासरी हिला २१-१८, २१-२३ आणि २१-१५ असे पराभूत करून चांगली सुरवात केली.त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्मितने इंग्लंडच्या एस्टेल व्हेन लेकुवेन हीला २१-१९, २१-१४ असे पराभूत करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य सामन्यात स्मितने भारताच्या केयूरा मोपाती हिच्यावर २१-१० आणि २१-१३ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.
स्मितची उपांत्य लढत या स्पर्धेत पहिले मानांकन असलेल्या चायना तायपेच्या वेन ची हूसू हीच्या विरुद्ध झाली. या उपांत्य फेरीच्या सांमन्यातही स्मितने चांगली सुरवात करून ४-२ अश्या दोन गुणांची आघाडी घेतली. परंतु त्यानंतर वेन ची हूसू ने आपल्या अनुभवाच्या आधारे हा सेट २१-१४ असा जिंकून १-० अशी आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही ६-६ अश्या बरोबरीनंतर वेन ची हूसू ने हा दूसरा सेटही २१- १६ असा जिंकून हा सामना आपल्या नांवे करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे स्मितला संयुक्त रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत अंतिम लढतीत स्मितला पराभूत करणाऱ्या वेन ची हूसू ने दुसरे मानांकन चायना तायपेच्या लिन हसींग ताये हीचा पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
याआधी मागील आठवड्यात पार पडलेल्या योनेक्स इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत स्मितने सुंदर खेळ करून रौप्य पदकाला गवसणी घातली होती. या लागोपाठच्या दोन्हीही आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगला खेळ करून पदक प्राप्त करणारी ती भारताची एकमेव खेळाडू ठरली आहे. कारण या स्पर्धेमध्ये भारतातर्फे सहा महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.