सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (15:54 IST)

Tokyo Olympics 2021 : ऑलिम्पिक कधी आहे? जपानमध्ये कोव्हिड काळात ऑलिम्पिक होणार?

जपानमध्ये एकीकडे कोव्हिडची रुग्णसंख्या वाढतेय, तर दुसरीकडे टोकियोमध्ये पुढच्या महिन्यात ऑलिम्पिक सुरू होणार आहे.
 
टोकियोमध्ये मुळात 2020 मध्ये ऑलिम्पिक होणार होतं. पण कोव्हिड 19च्या जागतिक साथीमुळे ते वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलं.
 
टोकियो 2020 ऑलिम्पिकच्या अध्यक्ष साईको हाशीमोटो म्हणाल्या, "शहरामध्ये आणीबाणीची स्थिती असली तरी या स्पर्धा 100 टक्के पार पडतील."
ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार आहे?
2020 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियोमध्ये 23 जुलै चे 8 ऑगस्ट दरम्यान पार पडेल. हे ऑलिम्पिक मुळात 2020मध्ये होणार होते म्हणून याला 2020 Olympics म्हटलं जातंय. या स्पर्धा तेव्हा कोव्हिडमुळे पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.
 
पॅराऑलिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर होणार आहेत.
 
या ऑलिम्पिकमध्ये 33 स्पर्धा आणि 339 इव्हेंट्स असतील आणि 42 ठिकाणी हे सगळं पार पडेल.
 
पॅराऑलिम्पिकमध्ये एकूण 22 खेळांचे 539 इव्हेंट्स होतील आणि 21 ठिकाणी या स्पर्धा होतील.
 
ग्रेटर टोकियोमध्येच यातल्या बहुतेक स्पर्धा आणि कार्यक्रम पार पडतील. काही फुटबॉल मॅचेस आणि मॅरॅथॉन होक्काईडो मधल्या साप्पोरोमध्ये होतील. पण इथे देखील सध्या चिंताजनक परिस्थिती आहे.
 
जपानमधली कोव्हिडची स्थिती काय आहे?
आधी जपानमधल्या कोव्हिड रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती. इथे 7.5 लाख रुग्ण आढळले होते तर 13,200 कोव्हिड मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.
पण एप्रिलमध्ये संसर्गाच्या नव्या लाटेला सुरुवात झाली आणि त्यामुळे काही भागांमध्ये 20 जून पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
 
जपानने फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक लसीकरण मोहीम सुरू केली. इतर अनेक देशांमध्ये यापूर्वीच लसीकरण सुरू झालेलं होतं. आतापर्यंत जपानमध्ये 36 लाख लोकांना म्हणजे एकूण जपानी लोकसंख्येच्या फक्त 3 टक्के जणांचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे.
 
टोकियो आणि ओसाका या दोन शहरांना संसर्गाच्या नव्या लाटेचा सर्वांत मोठा तडाखा बसला. जुलैच्या अखेरपर्यंत 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्यांचं लसीकरण पूर्ण करण्याचं इथल्या यंत्रणेचं उद्दिष्ट आहे.
 
ऑलिम्पिकदरम्यान काय खबरदारी घेतली जाणार आहे?
जपानच्या सीमा या परदेशी प्रवाशांसाठी बंद आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पाहण्यासाठी कोणीही परदेशी पर्यटक येऊ शकणार नाहीत.
 
स्थानिक लोक या स्पर्धा पहायला येऊ शकणार की नाही याचा निर्णय आयोजक 19 जूनला टोकियोमधले निर्बंध संपल्यानंतर घेतील.
 
जपानला जाण्यासाठी निघण्यापूर्वी आणि जपानमध्ये दाखल होताना आंतरराष्ट्रीय अॅथलीट्स आणि त्यांच्यासोबतच्या पथकातल्या लोकांच्या चाचण्या केल्या जातील.
 
त्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही. पण त्यांना बायो-बबलमध्ये रहावं लागेल आणि स्थानिकांमध्ये मिसळता येणार नाही.
 
अॅथलीट्सचं लसीकरण पूर्ण झालेलं हवं, अशी अट घालणयात आलेली नाही. पण जवळपास 80 टक्के अॅथलीट्सचं लसीकरण झालेलं असेल, असा ऑलिम्पिक कमिटीच्या अधिकाऱ्यांचा कयास आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्यांची रोज कोव्हिड चाचणी करण्यात येईल.
 
जपानमधल्या लोकांना ऑलिम्पिक हवंय का?
असाही शिमबुन या जपानमधल्या आघाडीच्या वर्तमानपत्राने नुकतीच एक पाहणी केली. या स्पर्धा रद्द करण्यात याव्या वा पुढे ढकलण्यात याव्यात असं आपल्यला वाटत असल्याचं यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त जणांनी सांगितलंय.
या स्पर्धांमुळे कोव्हिड पसरेल आणि आरोग्य यंत्रणेवर ताण येईल, अशी भीती वाटल्याने स्पर्धेच्या आयोजनाच्या मूळ आराखडयात सहभाग असणाऱ्या अनेक शहरांनी नंतर माघार घेतल्याचं समजतंय.
 
सध्याची जागतिक साथीची परिस्थिती पाहता या स्पर्धांचं आयोजन करणं अशक्य असल्याचं डॉक्टर्सच्या संघटनेने मे महिन्यात जपान सरकारला सांगितलं होतं.
 
अॅथलीट्सचे प्रतिनिधी काय म्हणाले?
अनेक संघटना आणि तज्ज्ञांनी काळजी व्यक्त केलीय.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अॅथलीट्सना सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी, सोशल डिस्टंन्सिंग आणि चाचण्यांची कठोर अंमलबजावणी करावी असं 60 देशांतल्या 85,000 अॅथलीट्सचं प्रतिनिधित्वं करणाऱ्या द वर्ल्ड प्लेयर्स असोसिएशनने सांगितलंय.
 
जपानच्या अॅथलीट्सनी आतापर्यंत फारशी मतं मांडली नसली तरी या देशाची सर्वात मोठी टेनिस स्टार असणाऱ्या नाओमी ओसाकाने याविषयी चर्चा होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय.
 
कोणते देश सहभागी होणार आहेत?
आतापर्यंत कोणत्याही मोठ्या देशाने या स्पर्धांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही.
जपानमधली रुग्णसंख्या वाढल्यानंतर अमेरिकेने इथे प्रवास करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केल्या होत्या. पण अमेरिकेचे अॅथलीट स्पर्धेत भाग घेणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
 
आपणही, "टोकियो ऑलिम्पिक गेम्सना संपूर्ण पथक पाठवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं," ग्रेट ब्रिटनने म्हटलंय.
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही या स्पर्धांना पाठिंबा दिलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत.
 
ऑलिम्पिक रद्द होईल का?
युद्ध किंवा अंतर्गत यादवी युद्ध अशा परिस्थितीमध्येच पूर्वी ऑलिम्पिक रद्द केलं जाई.
 
पण IOC म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आणि आयोजक टोकियो शहर यांच्यात झालेल्या करारानुसार ऑलिम्पिक रद्द करण्याचा अधिकार फक्त आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीलाच आहे.
 
ऑलिम्पिक स्पर्धांच्या प्रक्षेपणाच्या हक्कांमधून IOC ला जवळपास 70% उत्पन्न मिळतं, तर स्पॉन्सरशिपद्वारे 18% उत्पन्न् मिळतं. जर या स्पर्धा झाल्या नाहीत, तर त्याचा थेट परिणाम ऑलिम्पिक कमिटीच्या आर्थिक क्षमेतवर होईल आणि पुढच्या ऑलिम्पिक्सवरही याचा परिणाम होईल.
 
जपानच्या शहरांत आणीबाणी असली तरी या स्पर्धा सुरक्षितपणे खेळवल्या जाऊ शकतात, असं ऑलिम्पिक समितीने वारंवार म्हटलंय. त्यामुळे आता या स्पर्धा थांबवण्यात येण्याची शक्यता कमी आहे.
 
करार मोडत जर टोकियोने ऑलिम्पिक रद्द करण्याचं ठरवलं तर त्यामुळे होणारं सगळं नुकसान जपानला सोसावं लागेल.
 
टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी 12.6 अब्ज डॉलर्सचं बजेट ठरवण्यात आलं होतं. पण याचा प्रत्यक्ष खर्च दुप्पट झाल्याचं सांगण्यात येतंय.
 
जरी ऑलिम्पिकसाठी मोठं विमा संरक्षण घेण्यात येत असलं तरी त्यानंतरही जपानला मोठा तोटा होईल.
 
म्हणूनच ऑलिम्पिकचे आयोजक नेटाने स्पर्धांची तयारी पुढे नेत आहेत. हाशीमोटो यांनी बीबीसी स्पोर्टशी बोलताना सांगितलं, "आम्ही हे खेळ आयोजित करू याचा मला पूर्ण विश्वास आहे. आम्ही शक्य ते सगळं करतोय."