शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , शनिवार, 15 जुलै 2017 (11:27 IST)

आज व्हिनस-मुगुरुझामध्ये अंतिम लढत

अमेरिकेची दहावी मानांकित व्हीनस विल्यम्स आणि स्पेनची 14वी मानांकित गार्बिन मुगुरुझा यांच्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी अंतिम लढत रंगणार आहे.
 
महिला एकेरीच्या पहिल्या उपान्त्य लढतीत स्पेनच्या 14व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने स्लोव्हाकियाच्या बिगरमानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हाचे आव्हान 6-1, 6-1 असे झटपट मोडून काढताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपान्त्य लढतीत व्हीनसने इंग्लंडच्या सहाव्या मानांकित योहाना कॉन्टाचे आव्हान 6-4, 6-2 असे संपुष्टात आणताना सहाव्या विम्बल्डन विजेतेपदाकडे आगेकूच केली.
 
मुगुरुझाने त्याआधी उपान्त्यपूर्व लढतीत सातव्या मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हावर सरळ सेटमध्ये मात केली होती. तसेच तिने चौथ्या फेरीत अग्रमानांकित अँजेलिक कर्बरलाच चकित करताना स्पर्धेतील सर्वात खळबळजनक निकालाची नोंद केली होती. व्हीनसने उपान्त्यपूर्व फेरीत 13व्या मानांकित येलेना ऑस्टापेन्कोला, चौथ्या फेरीत 27व्या मानांकित ऍना कोन्जुहला, तर तिसऱ्या फेरीत नाओमी ओसाकाला पराभूत केले होते.
 
मुगुरुझाने तत्पूर्वी तिसऱ्या फेरीत सोराना सिर्स्टियाचा फडशा पाडला होता. तर दुसऱ्या फेरीत यानिना विकमायर व पहिल्या फेरीत एकेटेरिना अलेक्‍झांड्रा यांच्यावर मात करताना तिने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविले होते. मुगुरुझाने कर्बरविरुद्धची उपान्त्यपूर्व लढत वगळता बाकी सर्व सामने सरळ सेटमध्ये जिंकले.
 
गेल्या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून आपला पहिला ग्रॅंड स्लॅम किताब पटकावणाऱ्या मुगुरुझाने 2015मध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. या वेळी तिने त्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. केवळ 23व्या वर्षी योग्य मार्गावर असलेल्या मुगुरुझाला विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घालण्यात या वेळी तरी यश मिळते का हाच प्रश्‍न आहे.