सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. टी-20 विश्वचषक 2024
Written By
Last Updated : सोमवार, 1 जुलै 2024 (14:45 IST)

रोहित शर्मा, विराट कोहली आणि जडेजाची जागा घेऊ शकतात 'हे' तरुण चेहरे

rohit viraat
भारतीय क्रिकेट संघानं 17 वर्षांनंतर ICC टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. पण या विजयानंतर काही तासांतच टीम इंडियाचं चित्र मात्र पूर्णपणे बदलून गेलं आहे.
 
या स्पर्धेनंतर या चांगल्या आठवणीसह संघातील तीन सिनिअर क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या या सर्वांत लहान फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. हे तिघं म्हणजे, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा.
 
पण या तीन दिग्गज खेळाडूंचं योगदान पाहता त्यांची जागा भरुन काढणं हे बीसीसीआयसाठी सोपं नसणार आहे.
 
रोहित शर्मा 2007 पासून म्हणजे 17 वर्षांपासून टीमचा अविभाज्य भाग आहे. तर विराट कोहलीनं 14 आणि रवींद्र जडेजानं 15 वर्षांपर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं.
 
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड टॉप ऑर्डरसाठी दावेदार असतील.
 
तर कर्णधार पदासाठी शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्यात एकप्रकारची स्पर्धा पाहायला मिळू शकते. त्याची पुढं चर्चा करुच, पण आधी गेली दोन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी किती नाट्यमय ठरली हे जाणून घेऊ.
 
आधी कोहलीने जाहीर केली निवृत्ती
भारतीय क्रिकेट संघानं शनिवारी रात्री इतिहास रचला. बार्बाडोसच्या मैदानावर टीम इंडियानं 13 वर्षांनंतर जगज्जेतेपद मिळवलं. 17 वर्षांनंतर भारत टी-20 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला.
 
37 वर्षीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काही मिनिटांमध्येच निवृत्ती जाहीर केली होती.
 
"भारताकडून मी खेळलेला हा अखेरचा टी-20 सामना होता. हा माझा अखेरचा वर्ल्डकप आहे. त्यामुळं मला सर्वोत्तम कामगिरी करायची होती. वर्ल्ड कप जिंकणं हा आमचा उद्देश होता. आम्हाला ही ट्रॉफी उंचवायची होती. आम्ही पराभूत झालो असतो, तरी माझा हाच निर्णय राहिला असता. आता पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे."
 
कोहलीची या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फार उत्तम कामगिरी झाली नाही. फायनलपूर्वी त्यानं वर्ल्ड कपच्या सात डावांमध्ये फक्त 75 धावा केल्या होत्या. कदाचित त्यानं फायनलसाठी सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली होती.
 
दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात झालेल्या फायनलमध्ये कोहलीनं 59 चेंडूंमध्ये 76 दावा करत भारतासाठी संकटमोचकाची भूमिका निभावली होती. या कामगिरीसाठी तो 'प्लेयर ऑफ द मॅच'ही ठरला.
 
रोहितची पत्रकार परिषदेत घोषणा
यानंतर काही वेळातच पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मानंही त्याच्या टी-20 तील निवृत्तीची घोषणा केली.
 
रोहित म्हणाला, "हा माझाही शेवटचा सामना होता. क्रिकेटच्या या फॉरमॅटचा निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. करिअरची सुरुवातही मी या फॉरमॅटपासूनच केली होती. मला कप जिंकायचा होता आणि सर्वांचे आभार मानायचे होते."
 
संपूर्ण स्पर्धेत रोहितनं स्वतः कामगिरी करून दाखवत संघासमोर कायम उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न केला.
 
विराट कोहली या स्पर्धेत बहुतांश सामन्यात फॉर्मसाठी झगडताना दिसला. तर रोहित शर्मानं 156 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 257 धावा केल्या.
 
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज बनला. रोहितनं सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या विरोधात अर्धशतकी खेळी केली होती.
 
जडेजानं इन्स्टाग्रामवर केली घोषणा
या ऐतिहासिक विजयानंतर दुसऱ्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजानंही विराट आणि रोहित प्रमाणं टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली. 35 वर्षीय जडेजानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली.
 
रवींद्रने लिहिलं, “कृतज्ञ मनासह मी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचा निरोप घेतो. अभिमानानं पुढं सरसावणाऱ्या एखाद्या घोड्यासारखी मी सातत्यानं चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. इतर फॉरमॅटमध्ये मी खेळत राहणार आहे.”
 
पण या वर्ल्ड कपमध्ये जडेजाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही.
 
रोहित शर्माचे योगदान
रोहित शर्मा टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे.
 
रोहितनं 159 सामन्यांत पाच शतकांसह 4231 धावा केल्या आहेत. त्यात 32.05 ची सरासरी आणि 140.89 चा स्ट्राईक रेट होता.
 
2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी रोहित शर्मानं त्या स्पर्धेत टी-20 करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आता त्यानं जगज्जेता बनूनच निवृत्ती जाहीर केली आहे.
 
रोहित शर्मानं त्यानंतर झालेला प्रत्येक टी-20 वर्ल्ड कप खेळला आहे. त्याच्या शिवाय आतापर्यंत फक्त एका क्रिकेटपटूनं सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळले आहेत. तो म्हणजे बांगलादेशचा शाकिब अल हसन.
 
कोहलीचे योगदान
विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून निवृत्त होत आहे.
 
कोहलीनं वर्ल्ड कपच्या 35 सामन्यांत 58.72 च्या सरासरीनं आणि 128.81 च्या स्ट्राइक रेटनं 1292 धावा केल्या आहेत.
 
कोहलीनं भारतासाठी 125 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 48.69 च्या सरासरीनं 137.04 च्या स्ट्राइक रेटनं 4188 धावा केल्या आहेत. विराट या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहितनंतरचा दुसरा फलंदाजही ठरला आहे. कोहलीनं एक शतक आणि 38 अर्धशतकं केली आहेत.
 
कोहलीनं 2010 मध्ये झिम्बाब्वेच्या विरोधात टी-20 करिअरची सुरुवात केली होती.
 
जडेजाची कामगिरी
36 वर्षांच्या रवींद्र जडेजाची या विश्वचषकात फारशी चमकदार कामगिरी झालेली नाही.
 
पण 2009 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात करिअरची सुरुवात करणाऱ्या जडेजानं 74 सामन्यांत 127.16 च्या स्ट्राइक रेटने 515 धावा केल्या आणि 7.13 च्या इकॉनॉमीनं 54 विकेट घेतल्या आहेत.
 
कर्णधारपदी कुणाची वर्णी?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघाचे कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. रोहित शर्मानं 62 सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 49 सामन्यांत विजय मिळाला तर फक्त 12 सामन्यांत संघाचा पराभव झाला.
 
तर विराट कोहलीनं 50 सामन्यांत नेतृत्व केलं. त्यापैकी 30 सामन्यांत संघाला विजय मिळाला तर 16 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्यासारखी क्षमता इतर कुणाकडं आहे?
 
अनेक सीरिजमध्ये संघाचं नेतृत्व केलेला आणि वर्ल्ड कपमध्ये रोहितला उपकर्णधार म्हणून साथ दिलेला हार्दिक पांड्या कर्णधार पदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
 
ऋषभ पंतनंही तो उत्तम कर्णधार असल्याचं आयपीएलमध्ये सिद्ध केलं आहे. संघ व्यवस्थापनानं मात्र झिम्बाब्वे विरोधातील आगामी मालिकेत संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शुभमन गिलकडं सोपवली आहे.
 
रोहित शर्मा आणि विराट कोहली या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यात सलामीला उतरले. त्यांची जागा आता शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड घेऊ शकतात.
 
शुभमन गिलचा दावा
गेल्या वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिलनं रोहित शर्माच्या साथीनं डावाची सुरुवात केली होती. टॉप ऑर्डरमध्ये भारताकडं असलेला तो एक उत्तम पर्याय आहे.
 
बॅकफूटवर चांगले फटके खेळण्याची आणि गॅप शोधण्याची क्षमता असलेला 24 वर्षीय गिल तांत्रिकदृष्ट्या सक्षम क्रिकेटपटू आहे. तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये संयमही दिसून येतो.
 
झिम्बाब्वे दौऱ्यात त्याच्याकडं फलंदाजी आणि नेतृत्व दोन्ही सिद्ध करण्याची संधी आहे. निवडकर्त्यांनी कर्णधारपद देत तो दीर्घकालीन पर्याय असल्याचं दाखवून दिलं आहे. वीरेंद्र सेहवागनं पांड्याऐवजी गिलकडंच कर्णधारपद द्यावं असं म्हटलं आहे.
 
सगळ्या नजरा यशस्वीवर
गेल्या एका वर्षात या तगड्या फलंदाजानं सलामीला खेळताना चांगली कामगिरी केली आहे. वेगानं धावा करण्यासाठी यशस्वीला ओळखलं जातं.
 
त्यानं वेस्टइंडीजपासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत वेगवेगळ्या स्थितींमध्ये उत्तमोत्तम कामगिरी केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संघ डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाच्या कॉम्बिनेशच्या शोधात असतो. आतापर्यंत फक्त 16 आंतरराष्ट्रीय इनिंग्जमध्ये त्यानं एक शतक ठोकलं आहे.
 
ऋतुराजही स्पर्धेत
सलामीच्या फलंदाजांच्या गर्दीमध्ये ऋतुराज गायकवाडनं त्याचं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. उजव्या हातानं फलंदाजी करणारा ऋतुराज गेल्या काही वर्षांत कायम संघात किंवा आसपास दिसला आहे.
 
संयमी खेळीनं सुरुवात करणारा ऋतुराज एकदा जम बसल्यानंतर मात्र गोलंदाजांना चांगलाच घाम गाळायला लावतो. ऋतुराजकडेही झिम्बाब्वेच्या दौऱ्यात त्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे.
 
2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या अभिषेक शर्माचं आक्रमक फलंदाजीसाठी कौतुक झालं आहे. या वर्षी आयपीएलमध्येही तो चांगलाच चर्चेत होता.
 
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडच्या साथीनं सलामीला स्फोटक फलंदाजी करत त्यानं 16 सामन्यांत 204.21 च्या जोरदार स्ट्राइक रेटनं 484 धावा केल्या.
 
तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार?
आतापर्यंत तर बहुतांश वेळा तिसऱ्या क्रमांकावर कोहलीनंच फलंदाजी केली आहे. पण आधुनिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजाची ही जागा कशी भरून काढणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
 
कोहलीच्या रुपानं भारतीय क्रिकेट टीमला एक स्टार फलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक आणि अनुभवाचा खजाना असलेला क्रिकेटर मिळाला होता.
 
त्यामुळं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाला मजबुती देणाऱ्या अशाच खेळाडूचा शोध टीम मॅनेजमेंटला घ्यावा लागेल. वरील चार पर्यायांपैकी एक जण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
 
Published By- Dhanashri Naik