शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (08:03 IST)

लोकलसाठी नवे पोर्टल सुरू, अशी आहे प्रक्रिया

मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी ६५ रेल्वे स्थानकांवर क्यूआर कोड आधारित ऑफलाईन रेल्वे पास देण्याची प्रक्रिया सुरु केली.आता ऑनलाईन ई-पास ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ सुविधादेखील राज्य सरकारने एक नवे पोर्टल सुरू केले आहे. https://epassmsdma.mahait.org या लिंकच्या माध्यमातून ई – रेल्वे पास मिळविणे शक्य होणार आहे.उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील ऑफलाइन कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आणि त्यासोबत ऑनलाइन ई-पास पद्धत देखील सुरु झाल्याने आता पात्र सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करणे सुलभ होणार आहे.
 
‘असा’ मिळवा युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास
१) सर्वप्रथम पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
 
२) त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे.
 
३) त्यानंतर नागरिकांनी आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.
 
३) लगेचच मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
 
४) हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
 
५) त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
 
६) त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
 
७) या तपशिलामध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेऱयाद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
 
८) ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता एसएमएसद्वारे लिंक प्राप्त होईल.
 
९) लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये जतन (save) करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर दाखवल्यास तुम्हाला रेल्वे पास मिळेल.
 
सध्या अत्यावश्यक सेवेतील ११ – १२ लाख कर्मचारी रेल्वेने प्रवास करीत असल्याचा अंदाज आहे. त्यामध्येही रेल्वे पास, रेल्वे तिकीट शिवाय, बोगस ओळखपत्र यांचा वापर करून अनेकजण रेल्वे प्रवास करीत आहेत. मात्र आता राज्य शासनाने ऑफलाईन व ऑनलाईन रेल्वे पास पद्धती कार्यान्वित केल्याने पास, तिकीट याशिवाय बोगस ओळ्खपत्राच्या आधारे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाला चाप बसणार आहे. बोगस कागदपत्र, ओळखपत्र यांच्या आधारे रेल्वे प्रवास करणाऱ्या नागरिकांना किमान ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. 
या ई पास सुविधेनुसार, ज्या नागरिकांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा डोस घेवून किमान १४ दिवस पूर्ण झाले आहेत, ते नागरिक या ई पाससाठी पात्र असतील. जे पात्र नागरिक पाससाठी अर्ज करतील, त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची (दुसरा डोस घेवून १४ दिवस पूर्ण झाल्याची) पडताळणी ह्या लिंकवर आपोआप होईल. त्यासाठी वेगळ्या मानवी कार्यवाहीची आवश्यकता राहणार नाही. विशेष म्हणजे दुसरा डोस घेवून १४ दिवस पूर्ण न झालेल्या नागरिकांनी अर्ज केला तर त्यांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ई-पास उपलब्ध होईल.