1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (20:02 IST)

भारताचं नागरिकत्व असं मिळतं, पण ‘या’ चुकांमुळे कुणाचंही नागरिकत्व काढलं जाऊ शकतं

akshay kumar
This is how citizenship of India is obtained  अक्षय कुमारला पुन्हा एकदा भारतीय नागरिकत्व मिळालं आहे. 15 ऑगस्टला त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत जाहीर केलं, "दिल और सिटिझनशिप, दोनो हिंदुस्तानी."
 
पण त्याने हे नागरिकत्व मिळवलं कसं? त्याला कॅनडासोबतच भारताचा नागरिक होता येतं का? भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे नियम काय असतात?
 
अक्षय कुमार उर्फ राजीव भाटिया उर्फ अक्षय हरिओम भाटियाचा जन्म दिल्लीचाच. मग त्याने कॅनडाची सिटिझनशिप का घेतली होती?
 
एका मुलाखतीत अक्षय म्हणाला होता, की “एक काळ होता की सलग 14 सिनेमे फ्लॉप गेल्यानंतर मला काहीतरी वेगळं करून पाहायचं होतं. तेव्हा कॅनडात राहणाऱ्या एका जवळच्या मित्राने मला म्हटलं होतं, ये कॅनडाला. इथे आपण एकत्र काहीतरी करू.
 
"तोही एक भारतीय होता आणि तो तिथेच राहायचा. मला वाटलं होतं की माझं इथलं करिअर संपलंय. म्हणून मी कॅनडाचा पासपोर्ट घेतला होता. पण नंतर माझा 15वा चित्रपट हिट झाला आणि मी मागे वळून पाहिलं नाही. मी पुढे जात गेलो, पण मला कधीच वाटलं नाही की मी माझा पासपोर्ट बदलला पाहिजे."
 
पण अक्षय कुमारला त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून अनेकदा ट्रोल केलं गेलंय. ‘टॉयलेट’, ‘पॅडमॅन’, ‘केसरी’, ‘हॉलिडे’ सारख्या सिनेमांमधून अक्षयने सामाजिक जागरुकता आणि देशप्रेमाचे संदेश दिलेत, पण त्याचं हे कॅनेडियन नागरिकत्व आणि पासपोर्ट त्याच्या आड यायचं. अखेर त्याने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळवलं.
 
मात्र पँडेमिकमुळे ही प्रक्रिया तीन वर्षं लांबली, असं अक्षय 2022मध्ये एका कार्यक्रमात म्हणाला होता. मग त्याने भारताचं नागरिकत्व परत कसं मिळवलं? त्यासाठी काय प्रक्रिया असते?
 
भारताचं नागरिकत्व कसं मिळतं?
1955चा नागरिकत्व कायदा आपण भारताचं नागरिकत्व कसं मिळवू शकतो आणि ते कसं रद्द होऊ शकतं, याचे नियम सांगतो.
 
याच कायद्यामुळे जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर इतर कोणत्याही देशाचे नागरिक होऊ शकत नाही. आणि जर इतर कुठल्या देशाचं नागरिकत्व तुम्ही स्वीकारलं असेल तर तुमचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं.
 
या कायद्यानुसार खालील पाच प्रकारे आपण भारताचं नागरिकत्व मिळवू शकतो -
 
1. जन्माने
अ) भारताची घटना लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती जन्माने भारतीय असेल.
 
आ) 1 जुलै 1987नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस त्याची आई किंवा वडिलांपैकी कुणीही एक भारताचे नागरिक असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेल.
 
इ) 03 डिसेंबर 2004 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस त्याचे आई आणि वडील दोघेही भारताचे नागरिक असतील किंवा किमान एक पालक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा अवैध स्थलांतरित नसेल.
 
2. नोंदणी
भारत सरकारकडे अर्ज करून नागरिकत्व मिळवता येऊ शकतं. त्यासाठीच्या या अटी आहेत - खालील व्यक्ती त्यासाठी पात्र आहेत.
 
अ) अर्ज करण्यापूर्वी किमान 7 वर्षं देशात राहिलेली भारतीय वंशाची व्यक्ती
 
आ) पाकिस्तान आणि बांग्लादेश वगळता इतर देशांचे नागरिक, ज्यांना त्या देशाचं नागरिकत्व सोडून भारतीय नागरिक व्हायचं असेल
 
इ) भारतीय व्यक्तीशी लग्न केलेली आणि अर्ज करण्यापूर्वी किमान सात वर्षं भारतात राहिलेली व्यक्ती
 
ई) अशी अल्पवयीन मुलं ज्यांचे आई किंवा वडील भारतीय नागरिक असतील
 
उ) अशी व्यक्ती जी आधी भारताची नागरिक होती, आणि आता पुन्हा नागरिकत्वाचा अर्ज करण्याआधी किमान एक वर्षं भारतात राहते आहे
 
ऊ) अशी व्यक्ती जी किमान पाच वर्षं Overseas Citizen of India (OCI) आहे, आणि नागरिकत्वाचा अर्ज करण्याआधी किमान एक वर्षं भारतात राहते आहे
 
3. Naturalisation (भारतात रुळून)
अवैध स्थलांतरित सोडून कोणतीही व्यक्ती नागरिकत्वासाठी भारत सरकारकडे अर्ज करू शकते, जर त्यांनी किमान 12 वर्षं भारतात वास्तव्य केलं असेल, आणि तिसऱ्या अनुसूचीमधील सर्व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात
 
4. भारताचा भूमी विस्तार
जर एखादा नवीन भूभाग भारतात सामील झाला तर तिथल्या रहिवाशांना भारताचं नागरिकत्व मिळेल. उदाहरणार्थ, गोवा 1961 साली तर पाँडेचेरी 1962 साली भारताचा भाग झाले, ज्यानंतर तिथल्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळालं होतं.
 
5. भारताबाहेर जन्म झाला असेल तर
पण जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला असेल तर?
 
अशा व्यक्तींनाही भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, पण त्यांच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईवडिलांपैकी कुणीही एक भारताचा नागरिक असायला हवं. यासाठी एक अटही आहे, की परदेशात जन्मलेल्या या बाळाची नोंदणी तिथल्या भारतीय दूतावासात एका वर्षाच्या आत करावी लागते.
 
तसं न केल्यास भारत सरकारकडून वेगळी परवानगी घ्यावी लागेल.
 
तर जगात असेही काही देश आहे जिथं जाऊन नागरिकत्व मिळवणं सोपं आहे. त्याबद्दल तुम्ही खालील गोष्ट दुनियेची पॉडकास्टमध्ये जास्त जाणून घेऊ शकता.
 
पण जशी भारताचं नागरिकत्व मिळवता येतं, तसंच ते काढूनही घेतलं जातं किंवा त्याचा त्यागही केला जाऊ शकतो. तो कसा?
 
नागरिकत्व कसे काढून घेतले जाऊ शकते?
नागरिकत्व कायदा 1955मधल्या कलम 9 नुसार एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व या तीन प्रकारे काढून घेतलं जाऊ शकतं -
 
1) एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर...
 
2) एखाद्या व्यक्तीनं स्वेच्छेनं नागरिकत्वाचा त्याग केला तर...
 
3) भारत सरकार या काही नियमांन्वये एखाद्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं -
 
जर तो नागरिक सलग 7 वर्षं भारताबाहेर राहात असेल
जर त्या व्यक्तीने अवैधरीत्या, चुकीच्या पद्धतीने भारताचं नागरिकत्व मिळवलं असेल तर
जर त्या व्यक्तीने भारतीय राज्यघटनेचा अनादर केला असेल तर
जर एखाद्या युद्धादरम्यान, ज्यात भारताचा सहभाग आहे, ती व्यक्ती शत्रू राष्ट्राला मदत होईल, अशी कुठलीही देशविरोधी कृती करेल तर
जर एखाद्या भारतीय नागरिकाला नागरिकत्व मिळाल्याच्या पाच वर्षांच्या आत दुसऱ्या एखाद्या देशात किमान दोन वर्षांचा तुरुंगवास झाला असेल तर
या आहेत त्या अटीशर्ती ज्यामुळे तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं किंवा तुम्ही गमावू शकता. एक लक्षात घ्या, ही सगळी फक्त ढोबळ माहिती आहे आणि संपूर्ण नियमावली तुम्ही www.indiancitizenshiponline.nic.in इथे पाहू शकता.