सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (16:10 IST)

स्टँप ड्युटी म्हणजे काय? 1 एप्रिलपासून त्यात काय बदल होऊ शकतात?

What is Stamp Duty to be paid in any transaction related to property   How stamp duty is charged How to pay stamp duty What to watch out for when paying stamp duty More information on stamp duty  stamp Duty Full Information In Marathi  स्टँप ड्युटी mahiati In Marathi
नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना म्हणजे 1 एप्रिलपासून काही गोष्टींमध्ये बदल होतो. यातला एक महत्त्वाचा बदल असतो स्टँप ड्युटीच्या दरांमध्ये. स्टँप ड्युटी म्हणजे काय? ती कधी भरावी लागते? घर विकत घेतानाच्या खर्चावर स्टँप ड्युटीचा काय परिणाम होतो? आपण समजून घेऊयात.
 
स्टँप ड्युटी म्हणजेच - मुद्रांक शुल्क. मालमत्तेशी सबंधित कोणताही व्यवहार करताना हे मुद्रांक शुल्क भरावं लागतं. तुम्ही घर घेतलं किंवा व्यावसायिक वापरासाठी जागा घेतली तर स्टँप ड्युटी भरावी लागते. ही ड्युटी राज्यामध्ये महानगरं - शहरं - गावं यांच्यासाठी वेगवेगळी असते.
 
मुंबईत सध्या स्टँप ड्युटी 6 टक्के आहे. तर नवी मुंबई, पुणे आणि ठाण्यात 7% आहे. 1 एप्रिल 2023 पासून या दरांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.
 
स्टँप ड्युटी कशी आकारली जाते?
मालमत्तेची विक्री (Sale), हस्तांतरण (Conveyence Deed), मालमत्ता भेट देत असल्याचा करार (Gift Deed), गहाण ठेवणं (Mortgage), भाडेकरार (Leave and license), भाडेपट्टी (Lease deed), कुळ वहिवाट (Tenancy agreement) या सगळ्या व्यवहारांमध्ये कागद पत्रांचं मुद्रांकन करणं गरजेचं असतं.
 
तुम्ही घेत असलेल्या मालमत्तेची किंमती किती आहे, यानुसार मुद्रांक शुल्क आकारलं जातं. यासाठी तुम्हाला तुमच्या मालमत्तेची किंमत माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासन जमीन वा इतर प्रॉपर्टीसाठी दरवर्षी काही दर नक्की करते.
 
याला रेडी रेकनर रेट (Ready Reckoner) म्हणतात. यापेक्षा कमी किंमतीमध्ये तुम्ही या जागेचं रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तुम्ही घेत असलेल्या मालमत्तेचं मूल्य रेडी रेकनरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अॅग्रीमेंटमधल्या दरानुसार स्टँप ड्युटी भरावी लागेल.

स्टँप ड्युटी कशी भरायची?
उदाहरणार्थ, तुम्ही घेत असलेल्या मालमत्तेचा रेडी रेकनर दर 10 लाख आहे, पण तुमचं प्रॉपर्टी अॅग्रीमेंट 13 लाखांचं असेल, तर मग मुद्रांक शुल्क 13 लाखांनुसार भरावं लागेल.
 
महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विविध मार्गांनी भरता येऊ शकतं. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुम्ही स्वतः इंटरनेटचा वापर करून ई पेमेंट करू शकता किंवा मग बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन काऊंटरवरून पैसे भरू शकता.
 
आता पर्यंतची पद्धत म्हणजे स्टँप पेपर - मुद्रांक कागद आणि चिकटवायचे स्टँप्स - Adhesive stamps मार्फतही ही ड्युटी भरता येते.
 
फ्रँकींग करूनही स्टँप ड्युटी भरता येईल. फ्रँकिंग म्हणजे फ्रँकिंग मशीन वापरून तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्र स्टँपिंगची प्रक्रिया. बँका आणि नोंदणीकृत एजंट्सच ही प्रक्रिया करू शकतात.
 
स्टँप ड्युटी भरताना काय काळजी घ्यायची?
मालमत्तेसाठीचा व्यवहार करत असताना हा पक्षकारांपैकी म्हणजेच संबंधित व्यक्तींपैकीच एका पक्षकाराच्या नावानेच स्टँप पेपर / मुद्रांक खरेदी करा. इतर कोणाच्याही नावे स्टँप पेपर खरेदी केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
 
मुद्रांक शुल्क भरायला उशीर झाला तर मग दरमहा दंड आकारला जातो. तुम्ही जितकी कमी रक्कम भरली त्यावर दरमहा 2% दंड आकारला जातो. कागदपत्रांवर पहिल्यांदा सही केल्याच्या तारखेपासून ते तुम्ही मुद्रांक शुल्क भरण्याच्या तारखेपर्यंत हा दंड आकारला जातो.
 
जर मुद्रांक शुल्क आणि दंडाची रक्कम भरली नाही तर याला जमीन महसुलाची थकबाकी मानलं जातं आणि पुढची कारवाई केली जाते.
 
मालमत्ता खरेदी करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात महिलांना मुद्रांक शुल्कात काही सवलत देण्यात आलीय.
 
विकत घेण्यात येत असलेली मालमत्ता महिलेच्या नावावर असेल तर स्टँप ड्युटीमध्ये 1% सवलत मिळते. 9 मार्च 2023 ला शिंदे - फडणवीस सरकारने मांडलेल्या बजेटमध्येही मुद्रांक शुल्कातल्या सवलतीची ही तरतूद कायम ठेवण्यात आलीय त्यामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्येही ही सवलत कायम असेल.
 
मुद्रांक शुल्काबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार तुम्ही स्टँप ड्युटी भरल्याच्या चार महिन्यांच्या आत खरेदीदाराला रजिस्ट्रेशन फी देखील भरावी लागते.
 
ही नोंदणी झाल्याशिवाय मालमत्तेचं एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे हस्तांतरण ग्राह्य धरलं जात नाही. रजिस्ट्रेशन फी देखील विभाग वा शहरानुसार वेगवेगळी असते.
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवर याविषयीची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.
ही माहिती मराठी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. याच वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांकनाविषयची प्रक्रिया आणि माहिती मिळेल. याशिवाय प्रॉपर्टीशी संबंधित इतर वेबसाईट्सवरही असे कॅल्यक्युलेटर उपलब्ध आहेत.
 
Published By- Priya Dixit