MPSC तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त प्रतिसाद राज्यसेवा, PSI-STI-ASO, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवांना मिळतो. त्यातही राज्यसेवा या परीक्षेतून सर्वाधिक पदे भरली जात असल्याने त्या परीक्षेला विद्यार्थ्यांची सर्वांत जास्त पसंती असते. त्यामुळे एखादी व्यक्ती MPSC चा अभ्यास करतेय म्हटल्यावर ती बहुतांश वेळी राज्यसेवेचा अभ्यास करत आहे असं समजण्यास हरकत नाही.
राज्यसेवा: स्वरूप आणि परीक्षापद्धती
राज्यसेवा परीक्षा पूर्व, मुख्य, आणि मुलाखत या तीन टप्प्यात घेतली जाते. आयोगाकडून या परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात येते. त्यानुसार ही परीक्षा महाराष्ट्रात घेतली जाते. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा प्रकारच्या सुमारे 30 पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.
ही पदं 'गट अ' आणि 'गट ब' या पदांमध्ये राजपात्रित आणि अराजपात्रित अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याने ही अतिशय कठीण मानली जाते. या परीक्षेच्या स्वरुपात नुकतेच मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही इथे वाचू शकता.
राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यात होते. पूर्व परीक्षेत दोन पेपर असतात. हा टप्पा बहुपर्यायी स्वरुपाचा असतो. पहिल्या पेपरचं नाव सामान्य ज्ञान असतं. त्यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय संबंध, पर्यावरण या विषयांशी निगडित प्रश्न असतात. या सर्व विषयांच्या मागे महाराष्ट्रावर विशेष भर असं आयोगाकडून सांगितलं जातं. तरीही भारताशी निगडीतही प्रश्न असतातच. हा पेपर 200 मार्कांचा असतो.
दुसरा पेपर बुद्धिमत्ता चाचणीचा असतो. त्यात सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, मराठी आणि इंग्रजी भाषेचं आकलन, सामान्य गणित, निर्णयक्षमता अशा विषयांचा समावेश असतो. हे सगळे विषय दहावी ते बारावीच्या पातळीचे असतात, असं आयोगाचं म्हणणं आहे. हा पेपरसुद्धा 200 मार्कांचा असतो.
पूर्व परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25 टक्के किंवा ¼ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा केले जातात.
एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता ¼ गुण वजा करण्यात येईल.
एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू होणार नाही.
भरावयाच्या एकूण पदांच्या 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील. अशा रीतीने सीमारेषा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक आरक्षित प्रवर्ग/उपप्रवर्गातील पदांसाठी 12 पट उमेदवार उपलब्ध होण्याची निश्चिती करण्यासाठी जरुरीप्रमाणे सीमारेषा ओढली जाते. अशा पद्धतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ त्यांच्या आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतील.
मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षासुद्धा आधी बहुपर्यायी असायची. आता ती वर्णनात्मक आहे. हा बदल 2023 पासून लागू होणार आहे. आता ही परीक्षा 1750 मार्कांची असते. मुलाखत 275 मार्कांची असते. मुलाखत हा सुद्धा मुख्य परीक्षेचाच भाग समजला जातो. त्यामुळे मुख्य परीक्षेचे एकूण गुण 2025 आहेत.
मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर असतात. पहिले दोन पेपर मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयाचे असतात. हे दोन्ही पेपर अहर्तात्मक स्वरुपाचे असतात. या दोन्ही पेपरमध्ये 25 टक्के गुण मिळवावे लागतात. ते न मिळाल्यास पुढचे पेपर तपासले जात नाही. एक पेपर निबंधाचा असतो. तो 250 मार्कांचा असतो.
जनरल स्टडीज चे 250 मार्कांचे 4 पेपर असतात. दोन पर्यायी विषयाचे सुद्धा पेपर 250 मार्कांचे असतात.
ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेत देता येते. जनरल स्टडीज आणि पर्यायी भाषेचे पेपर मराठी आणि इंग्रजी भाषेत देता येतात. परीक्षेचं माध्यम कोणतं याचं विवरण परीक्षेचा फॉर्म भरताना सांगावं लागतं.
मुलाखत
विहित सीमांकन रेषेनुसार लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. ती 100 गुणांची असते.
हे तिन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवाराची निवड गुणक्रमानुसार विविध पदांवर होते. उपजिल्हाधिकारी किंवा उपअधीक्षक पदावर 12 वर्षं काम केल्यावर IAS किंवा IPS मध्ये काम करता येतं.
अभ्यास कसा करावा?
अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नक्की ही परीक्षा का देत आहोत याचा स्पष्ट विचार उमेदवारांनी करावा. या परीक्षेसाठी आपण किती काळ घालवणार आहोत याची चाचपणी उमेदवारांनी करावी. वैकल्पिक विषय कोणता घेणार आहात याचा योग्य निर्णय घ्यावा.
स्पर्धा परीक्षेतले ज्येष्ठ मार्गदर्शक वैकल्पिक विषयांना जोडीदाराची उपमा देतात. वैकल्पिक विषयाची निवड जोडीदारासारखी असते. ती नीट विचार करून करावी कारण तो सतत तुमच्याबरोबर असतो. आपण घरी अभ्यास करणार, कोणता क्लास लावणार, लावणार की नाही लावणार याचा विचारही उमेदवारांनी करायला हवा.
एकदा हे सगळं झालं की योग्य मार्गदर्शन घेऊन, आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करावा. प्रश्नांची पद्धत, याची समीक्षा करावी. ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या लोकांची भेट घेऊन एक नियोजनबद्ध प्लान आखावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. मार्गदर्शन घेताना ठराविक लोकांचंच मार्गदर्शन घ्यावं. अन्यथा गोंधळ उडण्याची शक्यता असते.
स्पर्धा परीक्षेचा प्रवास हा खूप मोठा असतो. त्यामुळे उमेदवारांनी प्रचंड संयम बाळगण्याची गरज असते. हे करत असताना सगळेच दिवस सारखे नसतात. या प्रवासात नैराश्य येऊ शकतं. त्याचीही तयारी ठेवावी. आपली लोक आसपास ठेवावी.
यावर्षीच्या परीक्षेत प्रमोद चौगुले प्रथम आले. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "तयारीच्या काळात कोल्हापुरात पूर आला होता. त्यात कोरोनाची साथ होती. प्रमोद तेव्हा पुण्यात होते. पूर्णपणे एकटे होते. त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यास केला." त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात चढ उतार येतात. ते सगळं सांभाळून परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रचंड मानसिक तयारी लागते.
पियुष चिवंडे सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतात. अभ्यास कसा करावा या विषयावर बोलताना ते म्हणतात, "उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. मी ग्रामीण भागातला आहे, माझी परिस्थिती चांगली नाही, मला हे जमणार नाही असा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये.स्पर्धा परीक्षा वेळखाऊ असते. त्यामुळे सकारात्मक विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
"या प्रवासात आई वडिल आणि कुटुंबीयांची साथ अत्यावश्यक असते. तसंच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असं नाही. याचा अर्थ आधीचे प्रयत्न वाया गेले असं नाही."
प्लॅन बी ची ताकद
स्पर्धा परीक्षेचं जग अनिश्चितततेने भारलेलं असतं. अशा परिस्थितीत एक प्लॅन बी कायम हाताशी हवा. MPSC काय किंवा कोणत्याही परीक्षेत अपयश आलं तर एक पर्यायी व्यवस्था असावी. ती व्यवस्था लावूनच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरलं तर निश्चिंतपणे अभ्यास करता येतो.
प्लॅन बी ची व्यवस्था ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सविस्तर माहिती इथे वाचा.
MPSC च्या परीक्षेत या वर्षी महत्त्वाचे बदल झाले आहेत. हे बदल पुढच्या वर्षीपासून अस्तित्वात येणार आहेत. हे बदल विद्यार्थ्यांच्या फायद्याचे आहेत असं लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर निंबाळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.