1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (07:35 IST)

Ind vs Aus : के एल राहुल, विराट कोहलीची महत्त्वाची इनिंग, पण टीम इंडियासमोर ‘या’ समस्या

जान्हवी मुळे
 
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर केएल राहुल आणि विराट कोहलीनं भारताला अक्षरशः पराभवाच्या तोंडातून बाहेर काढलं.
 
त्यामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाला हरवून आयसीसी वन डे विश्वचषकात विजयी सलामी देता आली.
 
विराट आणि राहुल वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऐन भरात आले आहेत, ही टीम इंडियासाठी अगदी जमेची गोष्ट आहे.
 
पण या सामन्यात टीम इंडियामधले काही कच्चे दुवेही समोर आले. विश्वचषकाच्या पहिल्याच लढतीत विजय मिळवला असला, तरी रोहित आणि कंपनीला या मॅचमधून शिकण्यासारखंही बरंच काही आहे.
 
सलामीच्या व्यथा
खरंतर भारताच्या सलामीच्या समस्यांची सुरुवात हा सामना सुरू होण्याआधीच झाली होती. वर्ल्ड कप आधी वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा शुबमन गिल डेंग्यूनं त्रस्त असल्यानं या सामन्यातून बाहेर झाला.
 
त्याच्याऐवजी मिळालेल्या संधीचा इशान किशनला लाभ उठवता आला नाही.
 
वर्ल्ड कपमधल्या आपल्या पहिल्याच सामन्यात इशान एका लूज शॉटवर भोपळाही न फोडता बाद झाला. मिचेल स्टार्कनं त्याची विकेट काढली.
 
आता गिल पुढच्या सामन्याआधी फिट होईल का? तो फिट झाला नाही, तर रोहित आणि इशानची जोडी वेळेत सेट होईल का? सलामीचं समीकरण नेमकं काय असेल? या प्रश्नांची उत्तरं टीम इंडियाला शोधावी लागतील.
 
रोहित शर्माचा फॉर्म
‘Captain leads by example’ म्हणजे कर्णधार स्वतःच्या कर्तृत्वानं टीमसमोर उदाहरण घालून देत असतो.
 
कदाचित त्यामुळेच चेन्नईत रोहित शर्मानं सोडलेला एखादा झेल आणि त्याचं शून्यावर बाद होणं अनेकांना जास्त टोचलं.
 
तुलनेनं अनुभवी शुबमन गिल गैरहजर असताना रोहितनं नवख्या इशानसह भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्याची गरज होती. पण जॉश हेझलवूडनं रोहितला पायचीत केलं.
 
असं कोंडीत सापडणं रोहितला टाळावं लागेल.
 
कारण कर्णधार आणि सलामीवीर अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्याला या स्पर्धेत पार पाडायच्या आहेत, आणि दोन्हीमध्ये यशस्वी ठरला, तर भारताला मोठं यश मिळवून देण्याची क्षमताही त्याच्यात आहे.
 
टॉप ऑर्डरची कामगिरी
कुठल्याही मोठ्या स्पर्धेत सलामीची जोडी जमणं टीममधल्या बाकी फलंदाजांवरचा भार हलका करतं. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला आपल्या सलामीवीरांकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती.
 
पण वर म्हटलं तसं, चेपॉकच्या खेळपट्टीवर भारताचे दोन्ही ओपनिंग बॅट्समन – इशान किशन आणि रोहित शर्मा – भोपळाही न फोडता माघारी परतले. अवघ्या 200 धावांचं लक्ष्य गाठणं त्यामुळे अचानक अशक्य वाटू लागलं.
 
श्रेयस अय्यर बाद झाल्यानं पहिल्या चारपैकी तीन फलंदाज शून्यावर बाद झाले.
 
तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट कोहलीही बाद होता होता वाचला. विराट अवघ्या 12 रन्सवर असताना मिच मार्शनं त्याचा झेल सोडला. ते जीवनदान मिळालं नसतं तर भारताची अवस्थाही वाईट झाली असती.
 
चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचं काय?
गेला काही काळ टीम इंडियाला अनेकदा ‘चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या’ भेडसावते आहे. या क्रमांकावर खेळणारा फलंदाज डावाला स्थिरता देण्याची जबाबदारी पार पाडतो.
 
गेला काही काळ श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, सूर्यकुमार यादव, अशा अनेकांना या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात आली होती, पण ही जागा कायमची व्यापेल असा कुणी फलंदाज अजून सापडलेला दिसत नाही.
 
चेन्नईत श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. पण तोही शून्यावर बाद होऊन माघारी परतला.
 
त्यानंतर सोशल मीडियावरही श्रेयसला चौथ्या क्रमांकावर पाठवणं योग्य होतं का, अशी चर्चा रंगली. चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजानं दबावाखाली खेळत ताण हलका करायचा असतो.
 
या क्रमांकावर अय्यरऐवजी केएल राहुलला पाठवायला हवं होतं असं मतही काहींनी मांडलं आहे. अर्थात राहुल चेन्नईच्या उकाड्यात ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये पूर्णवेळ विकेट किपींग करत होता आणि त्याला थोडीही उसंत न मिळता लगेच फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागलं.
 
भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगनंही त्यावर टिप्पणी केली आहे. तो म्हणाला आहे की, “चौथ्य क्रमांच्या फलंदाजानं दबाव कमी करायचा असतो. टीम आपली इनिंग पुन्हा उभारत असताना श्रेयसनं चांगला विचार करण्याची (विचारपूर्वक खेळण्याची) गरज होती. केएल राहुलला या क्रमांकावर का पाठवत नाहीत कळत नाही. पाकिस्तानविरुद्ध त्यानं (याच क्रमांकावर) शतक ठोकलं होतं.”
 
भागीदारी आणि सिंगल्सचं महत्त्व
चेन्नईच्या मैदानात खरंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवातही अडखळती झाली होती. पण आधी वॉर्नर आणि स्मिथनं तर नंतर कमिन्स आणि मिचेल स्टार्कनं छोट्या मोठ्या भागीदारी रचून आपल्या टीमला 200 धावांच्या वेशीवर नेलं.
 
भारताच्या इनिंगमध्ये मात्र चित्र बरंच वेगळं होतं. इथे राहुल आणि विराट उभे राहिले नसते, तर हा सामना जिंकणं भारतासाठी अशक्यच होतं. या दोघांनी सिंगल रन्सही किती महत्त्वाच्या असतात ते पुन्हा दाखवून दिलं.
 
वन डे क्रिकेटमध्ये, विशेषतः पॉवरप्ले संपल्यावर चौकार षटकार ठोकणं दरवेळी शक्य होत नाही. चेन्नईसारख्या पिचवर तर ते आणखी कठीण ठरू शकतं. अशा वेळी सतत एकेरी, दुहेरी धावा काढून धावफलक हलता ठेवण्याची, प्रसंगी गियर बदलून खेळण्याची गरज असते.
 
विराट आणि राहुलला हे गणित उलगडल्याचं दिसतंय. पण बाकीच्या फलंदाजांनाही त्याची पुन्हा उजळणी करावी लागेल.
 
अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना भारताला या समस्यांवर मार्ग काढावाच लागेल. कारण त्यानंतरच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा मुकाबला करायचा आहे.