निर्माता : साजिद नाडियादवाला दिग्दर्शक : साजिद खान संगीत : शंकर-एहसान-लॉय कलाकार : अक्षय कुमार, विद्या बालन, फरदीन खान, रितेश देशमुख, बोमन इराणी
सिडनीत राहणार्या तीन अविवाहित, खुशालचेंडू युवकांचे हे कथानक आहे. अक्षय कुमार, फरदिन खान व रितेश देशमुख तिघांच्याही तर्हा निराळ्या. मात्र, एका गोष्टीबाबत कमालीचे साम्य. तिघांनाही मुलींचा प्रचंड नाद. अक्षय कुमार एका नाइट क्लबमध्ये काम करतो. त्याच्या दिलफेक वृत्तीमुळे त्याला गर्लफ्रेंडही बर्याच आहेत. दुसरा फरदिन खान. याला कोणताच कामधंदा नाही. जुगार खेळून तो आपला खर्च भागवतो. त्यालाही मुलींचा नाद. या ग्रुपचा तिसरा सदस्य आहे रितेश देशमुख. तो लहान मुलांच्या बर्थडे पार्ट्यांमध्ये त्यांचे मनोरंजन करतो. पण लक्ष मात्र मुलांपेक्षा त्यांच्या आयांवर.
अशी त्यांची धमाल चालली असताना एका वळणावर त्यांच्यावर लहान मुलीस सांभाळण्याची जबाबदारी येते आणि या तिघांमध्ये आमूलाग्र बदल घडतो.लहान मुलीचे पालन पोषण करताना त्यांची तारांबळ उडते. जबाबदारी त्यांना कर्तव्य शिकविते. ते मुलीची वडिलांप्रमाणे काळजी घेतात. त्याचबरोबर तिचे पालक कोण आहेत याचाही शोध सुरू असतो. पण हाती काहीही लागत नाही.
IFM
IFM
अचानकपणे त्यांच्यापैकीच एकाची गर्लफ्रेंड असलेली मुलगी एकेदिवशी या मुलीला घेऊन जाते. आणि तिघेही हादरतात. यानंतर त्यांच्या प्रेयसीचे मन जिंकून मुलीस परत नेण्याच्या मोहिमेस सुरूवात होते. हा सारा प्रवास गमतीशीर आहे. हास्याची कारंजी उडविणार्या प्रसंगाची मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. चित्रपटाच्या सुरूवातीच्या गाण्यातूनच कथानकाविषयी प्रेक्षकांना अंदाज येतो. त्यामुळे समरस व्हायला वेळ लागत नाही.
दिग्दर्शकाने कथानक मांडताना सुरूवातीपासूनच गती कायम ठेवली आहे. अपवाद फक्त काही दृश्यांचा. सजिद खानचे दिग्दर्शन चांगले असून भविष्यात त्याच्याकडून दर्जेदार चित्रपटाची आशा बाळगता येईल. सर्व प्रकारच्या प्रेक्षकवर्गांना समोर ठेवून चित्रपट देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हिंदी शब्दाची टर उडवून चांगलीच हास्यमिर्मिती केली आहे.
विनोदी भूमिकेत अक्षय चांगलाच खुलतो. देहबोलीचा तो उत्तम उपयोग करतो. रितेश देशमुखचे टायमिंग उत्तम असल्याचे त्याने पुन्हा सिद्ध केले आहे. फरदीन खान अभिनयात कच्चा असून तो अजूनही इंग्रजीच्या टोनमध्येच हिंदी शब्दफेक करतो. विद्या बालनने ग्लॅमरस दिसण्याचा प्रयत्न केला असून तिचा अभिनय ठीक आहे. बोमन इराणी यांना विशेष वाव नाही.
IFM
IFM
शाहरूख खानही वाया घालण्यात आला आहे. निर्माता साजिद नाडियाडवालाने मुक्त हस्ते पैसा खर्च केला आहे. एका गाण्यात तर चक्क पंधरा अभिनेत्री आहेत. संपूर्ण छायाचित्रण ऑस्ट्रेलियातील सिडनीत झालेले आहे. संगीत चांगले जमले असून 'हे बेबी' सहित इतरही गाणी हीट झाली आहेत. संवादात मात्र दम नाही. पण तरीही एकंदरीत चित्रपट बरा जमला आहे.