अर्जुनच्या घरी त्याच्या काकांशिवाय कोणीही नाही. त्यांना सोडून तो लंडनला आपले स्वप्न साकार करण्यासाठी निघून जातो. तिथे तो स्वतःची ओळख तयार करायला लागतो. तेथे जोहेब आणि वासीम या दोन पाकिस्तानी तरूणांच्या मदतीने तो आपला बॅंड तयार करतो. प्रिया (असीन) ही दक्षिण भारतीय मुलगीही त्याच्या बॅंडमध्ये सामील होते. अर्जुन मनातून तिच्यावर प्रेमही करू लागतो.
इकडे भारतात पंजाबात असलेला मन्नू कर्जाच्या बोज्याखाली अडकतो. कमाईसाठी तो गावच्या बॅंड पार्टीत सामील होते. एका दिवशी अर्जुन व मन्नूची भेट होते आणि अर्जुन त्याला लंडनला घेऊन जातो. पण नंतर त्याला कळते की मन्नूला लंडनला आणून त्याने मोठी चूक केली आहे.
मन्नू त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावंत आहे. त्यामुळे त्याला मोठे यश मिळते. जे यश मिळवायला अर्जुनला बरेच दिवस लागले, ते मन्नूला सहजगत्या मिळते. त्यातच प्रियाही मन्नूकडे आकर्षित होते. त्यामुळे तर अर्जुनची चीडचीड आणखी वाढते. त्यातच मन्नूला संपविण्याची योजना अर्जुन आखतो. पुढे काय होते ते पडद्यावर पहाण्यात मजा आहे. प्रेमाचा त्रिकोण म्हणजे या कथेत नाविन्य नाही. पण सादरीकरण दिग्दर्शक विपूल शहाने छान केले आहे.
विपुलने दोन्ही स्टारना तितकेच महत्त्व दिले आहे. इंटरव्हलपूर्वीचा सलमान 'मजाकिया' स्वरूपाचा विनोदी ढंगाचा आहे. तो त्याने मस्तच रंगवला आहे. इंटरव्हलनंतर मित्राच्या वर्तनाने दुखावला गेलेला सलमानही त्याने तितकाच ताकदीने उभा केला आहे. त्याचवेळी अजय देवगणही आपला प्रभाव पाडतो. ऑल दी बेस्टमध्ये विनोदी भूमिकेत असलेला अजय इथे मात्र गंभीर भूमिकेतही चपखल आहे. प्रेम ते द्वेष व्हाया असुरक्षितता हा प्रवास त्यानेही छान रंगवला आहे. असीनसाठी सुंदर दिसण्याव्यतिरिक्त फारसे काही काम नाही. तरीही तिची उपस्थिती प्रसन्न आहे.
एकुणात विपूल शहा दिग्दर्शित 'लंडन ड्रिम्स' पहायला काहीच हरकत नाही. किमान सलमानच्या अभिनयासाठी तरी.