Dharma Sangrah
✕

अर्रर्र आबा... बरं झालं थांबला

किरण जोशी

Updated: सोमवार, 1 डिसेंबर 2008 (16:51 IST)
काही दिवसांपूर्वी 'आरं आरं आबा आता तरी थांबा' नावाचा चित्रपट आला होता. चित्रपट टुकार होता. पण त्याच्या शीर्षकावरून जणू तो राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. आबा यांच्यावर आधारीत असावा की काय असे वाटत होते. पण चित्रपट नसला तरी ते शीर्षक मात्र आबांच्या भविष्यकालीन वाटचालीचा संकेत देणारे होते, हे आजच्या राजीनाम्याने स्पष्ट झाले. 'आता तरी थांबण्याचा' निर्णय त्यांनी घेतला वा त्यांना घ्यायला लावला तो योग्यच आहे यात काही शंका नाही. पण आबांच्या राजीनाम्याने मुंबई वा महाराष्ट्रावरील हल्ले थांबतील असे तरी म्हणता येईल काय? असो. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अल्पावधीतच धडाडीने वरच्या फळीत येऊन दाखल झालेले आणि अगदी 'साहेबांचे' उत्तराधिकारी अशी स्वतःविषयी प्रतिमा निर्माण करणारे आबा दुर्देवानेच या पदावरून गेले. त्यांच्या अकार्यक्षमतेपेक्षाही त्यांचा बोलभांड स्वभाव याला कारणीभूत ठरला असेही म्हणता येईल.

पण असे असले तरी स्वच्छ चारित्र्याचा, स्पष्टवत्ता आणि सामान्य कुटुंबा‍तील नेता म्हणून आर.आर. पाटील अर्थात 'आबा' यांची प्रतिमा होती. जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत 'नगाला नग' म्हणून उभे करण्यात आलेल्या आबांना अनपेक्षित यश मिळाले. तेव्हा, हा सामान्य कार्यकर्ता मंत्रीपदापर्यंत पोहोचेल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. केवळ तोंडात साखर असल्याने त्यांनी आपल्या वक्तृत्वकौशल्याच्या जोरावर सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कार्यकर्त्यांचे संघटन केले. तासगावचा हा वकिल जिल्हा परीषद सदस्याचा आमदार झाला.

‍
  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अल्पावधीतच धडाडीने वरच्या फळीत येऊन दाखल झालेले आणि अगदी 'साहेबांचे' उत्तराधिकारी अशी स्वतःविषयी प्रतिमा निर्माण करणारे आबा दुर्देवानेच या पदावरून गेले. त्यांच्या अकार्यक्षमतेपेक्षाही त्यांचा बोलभांड स्वभाव याला कारणीभूत ठरल      
अंजनी या गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आबांनी सांगलीत शिक्षण घेतले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संघर्ष करत त्यांनी राजकारणात पाय घट्ट रोवले. तासगाव मतदारसंघामध्ये राजकीय पार्श्वभूमी असणा-या आणि तेवढेच लोकप्रिय असणार्‍या संजयकाका पाटील यांच्याशी त्यांना टक्कर घ्यावी लागली. सातत्याने होणारा विरोध आणि त्यांच्याच पक्षातील इतर नेत्यांनी केलेला दगाफटका आबांनी तेवढ्याच चपखलपणे त्यांच्यावरच उलटवला. आबांचा हा मुरब्बीपणा आणि सामान्यांमधील त्यांची स्वच्छ प्रतिमा लक्षात घेऊन प्रभावीत झालेल्या शरद पवारांची त्यांच्यावर नजर पडली.त्यांनी हा हिरा बरोबर हेरला. मग त्यांच्याच वरदहस्ताने बघता बघता आर.आर राज्याचे लाडके 'आबा' कधी झाले हे कुणाला कळलेच नाही.

मंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या आबांनी आपल्या स्वच्छ चारित्र्याच्या प्रतिमेला धक्का पोहचू दिला नाही. ग्रामीण भागातील असल्याने सामान्य लोकांची नस ओळखण्याची कला त्यांना अवगत आहे. ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री म्हणून काम करताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामविकास अभियान राबवले. सगळ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देणा-या या मोहिमेमुळे त्यांची 'स्वच्छ' प्रतिमा आणखी उजळ झाली. योगायोगाने त्याचवेळी त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी छगन भुजबळ त्यावेळी तेलगी स्टॅंप पेपर घोटाळ्यात अडकल्याची वदंता होती. त्यामुळे मीडीयाच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. त्यातच एका वाहिनीवर त्यांची खिल्ली उडविणारा कार्यक्रम सादर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी या चॅनेलवर हल्लाबोल केला आणि भुजबळ यांना राजीनामा द्यायला लागला.


भुजबळांचा राजीनामा पाटील यांच्या कर्तृत्वाला भरारी घेण्यास कारणीभूत ठरला. शरद पवारांनी पाटील यांना हे पद देऊन पक्षात नव्या नेत्याचा उदय झाला याचे स्पष्ट संकेत दिले. गृहमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर त्यांच्यावरची जबाबदारी अधिकच वाढली. एकदा त्यांची मुलाखत घेताना आपला मृदू स्वभाव लक्षात घेता आपण गृहखात्याचे काम सांगाळू शकाल का? या प्रश्नाला चपखल उत्तर देताना 'मी ही माणूसच आहे आणि पोलिसही माणूसच आहेत' असे चपखल उत्तर त्यांनी दिले होते. कोणत्याही घटनेवर शांत, संयमाने आणि चपखल उत्तर देण्याचे कसब त्यांच्याकडे असल्याने याच भांडवलावर अनेकवेळा त्यांनी सुटका करून घेतली.

बारबालांवर कारवाई, तंटामुक्त अभियान, पोलिस सुधारणासाठी अभियान राबवून आपणच लायक गृहमंत्री म्हणून आपली प्रतिमा करण्याचा प्रयत्न ते करू लागले. पुढे या गृहमंत्रिपदानंतर त्यांची मृदू भाषाही आक्रमक होऊ लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक आक्रमक नेते म्हणूनही ते पुढे येऊ लागले. निवडणुकांत एक प्रमुख वक्ते म्हणून त्यांच्या स्वतंत्र सभाही होऊ लागल्या. 'गुंडांची धिंड काढू, सालटी सोलून काढू', 'पोलिस दल सक्षम करणारच', ' तर महाराष्ट्रात धरणे बांधू', 'संयुक्त महाराष्ट्रासाठी फासास जाईन', 'गोळीला गोळीने उत्तर' ही त्यांची वक्तव्ये मीडीयातही गाजू लागली.

त्यांच्या या आक्रमकपणाने ते वारंवार मीडीयातही झळकू लागले. एकीकडे सामान्यांची कड घेणारा नेता अशी प्रतिमा उंचावत असताना दुसरीकडे पक्षांतर्गत पातळीवर त्यांचे विरोधकही सक्रीय झाले होते. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी आबांवर स्तुतिसुमने उधळत सर्वांना आश्चर्यांचा धक्ता दिला होता. जयंत पाटील, अजीत पवार आदी सरंजामशाहीचे नेते असूनही राष्ट्रवादीची सारी मदार आबांच्या खांद्यावर होती. आपले राजकीय वारसदार आबाच असल्याचे शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले होते.

हे सगळे सुखावणारे होत असताना आबांच्या उतरणीचा काळही सुरू झाला. त्यांनी डान्सबारवर बंदी घालण्याचा धडाडीचा निर्णय घेतला तरी त्याला पूर्ण यश लाभले नाही. दुसरीकडे खैरलांजी प्रकरणाच्या तपासावर दलित संघटनांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली. आबांच्या काळातच महाराष्ट्रात सर्वांधिक जातीय दंगली झाल्या. मालेगाव बॉम्बस्फोट व त्यानंतरचा हिंदू दहशतवादाचा बुरखाही त्यांच्याच काळात फाटला तरी नकळत समाजाच्या एका गटातून ते टीकेचे लक्ष्य ठऱतच होते. राज ठाकरे प्रकरण त्यांना चांगलेच भोवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर भारतीयांविरोधात केलेले आंदोलन (फेब्रुवारी व ऑक्टोबर) त्यांना अडचणीत आणणारे ठरले. राज ठाकरे यांना जाणीवपूर्वक मोठे करून त्यांच्या हिंसक आंदोलनाला मुद्दाम लवकर आळा घातला नाही, अशी टीका त्यांच्यावर झाली. उत्तर भारतीयांचा प्रश्न असल्याने विशेषतः राष्ट्रीय मीडीयाने त्यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे प्रकरणात पोळल्यानंतर राहूल राज या बिहारी तरूणाला गोळी घालून पोलिसांनी मारल्याचे प्रकरणही त्यांच्या अंगलट आले. या तरूणाला मारल्यानंतर 'गोळीला गोळीने उत्तर दिले जाईल' हे त्यांचे विधानही मीडीयाने अतिरंजीत करून दाखवले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पवारांन दिल्लीतून आबांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्याच काळात धुळ्यात झालेली दंगलही आबांनी भोवली. यातून बाहेर निघत नाहीत तोवर मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले.

या हल्ल्यानंतर तर आबांचे या पदावरचे टिकणेही मुश्किल झाले होते. त्यांचे सातत्याने मीडीयात जाणे, त्यांचा बोलभांडपणा त्यांना अडचणीत टाकणारे ठरले. त्यातच कॉंग्रेसच्या केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला गेल्यानंतर तर आबा या पदावर रहाणे शक्यच नव्हते. तरीही कालपर्यंत आपण राजीनामा देणार नाही, असे ते सांगत होते. पण सकाळी अचानक राजीनामा देऊन त्यांनी 'नैतिक' जबाबदारी स्वीकारली. त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता. पण धडाडीने पुढे येणार्‍या राज्यातील या नव्या नेतृत्वाचा राजकीय प्रवास सध्या तरी कुंठीत झालेला दिसतोय. भुजबळ यांना याच पदावरून जावे लागल्यानंतर पक्षातूनही ते 'निवृत्तीकडे' निघाले असल्याचे दिसते. ऐन 'राजकीय तारूण्यात' आबांचे असे होऊ नये हीच इच्छा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे शहरात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूविरोधात मोठी कारवाई

हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यावर टीव्हीवर मोठा टॉवेल टाका: एका निवृत्त कर्नलने जोडप्यांना असा सल्ला का दिला?

भाताची लागवड: पद्धतशीर आणि आधुनिक तंत्रज्ञान

१ डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; जाणून घ्या कार्डधारकांवर काय होणार परिणाम

घरकामाचा ताण संपला! संपूर्ण घरात झाडू-पोछा करेल हायरचा रोबोट व्हॅक्यूम क्लिनर; जाणून घ्या खासियत

Show comments