suvichar

दिवा गेल्यावर 'हवा' जाईल का?

Updated: शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (16:55 IST)
 
लाल दिवा हा व्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक. एकदा गाडीवर लाल दिवा लागला की सहसा कुणी वाट्याला येत नाही. अनेक लहानमोठे अपराध बिनबोभाट खपवून घेतले जातात, सवलतींचा वर्षाव होतो. रस्त्याने धावताना ट्रॅफिक मध्ये अडकावं लागत नाही, उलट जो तो तुमची वाट मोकळी करून देतो, केवढा तो थाट. एका चांगल्या उद्देशाने निर्माण झालेल्या व्यवस्थेची विल्हेवाट. खरंतर लाल दिव्याची पद्धत सुरु झाली त्यामागे खूप मोठा विचार होता. महत्वाच्या पदावरील व्यक्ती रस्त्यावरच्या रहदारीत अडकून पडल्याने कामकाज रखडू नये. त्यांच्या सुनियोजित आणि सुरक्षित प्रवासाची खात्री संबंधित यंत्रणांना करता यावी, यासाठी ही सोय होती. मात्र ही सुविधा उपभोगताना काही नियम पाळणेही अपेक्षित होते. केवळ सरकारी कामकाजासाठी प्रवास करतानाच लाल दिवा वापरला जावा. खासगी कामासाठी जाताना किंवा गाडीत संबंधित व्हीआयपी व्यक्ती नसताना गाडीवरचा दिवा काळ्या आवरणाने झाकला जावा. केवळ तातडीच्या किंवा अत्यावश्यक प्रसंगीच अशा सुविधांचा वापर व्हावा, असे ते नियम होते. याव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य शासनाने किती लाल दिव्यांना परवानगी द्यावी? कुणाच्या दिव्याला फ्लॅश लाईट असावी, कुणाच्या नसावी याचेही स्पष्ट नियम होते. पण हे सगळे नियम धाब्यावर बसवून लाल दिव्याला केवळ आणि केवळ 'स्टेटस सिम्बॉल' म्हणून वापरले जाते, तेव्हा खरी समस्या सुरु होते. लाल फितीच्या कारभाराप्रमाणे लाल दिवासुद्धा अडवणुकीचे आणि अरेरावीचे प्रतीक होऊन बसतो, आणि मग तो काढून टाकण्याचे आदेश द्यायची वेळ येते. 
 
अर्थात गाडीवरून लाल दिवा हटला म्हणून काही डोक्यात गेलेली हवा कमी होत नाही. भाजपच्या एका आमदाराने याचा प्रत्ययही दिला आहे. टोल नाक्यावर दहा सेकंद थांबावे लागल्याने उत्तरप्रदेशमधील सीतापूरचे राकेश राठोड यांनी तेथील कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गाड्यांना टोल फ्री सोडण्यास नकार दिला गेल्याने, त्यांनी तेथील बॅरिकेटसची मोडतोड केल्याचे समोर आले आहे. बरेलीतील राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेने नेत्यांच्या अंगात भिनलेल्या व्हीआयपी संस्कृतीचा परिचय करून दिला आहे. 
 
अंगातली ही मस्ती केंद्र सरकारच्या एका निर्णयाने संपेल याची शक्यताच नाही.  तसंही आज व्हीआयपी दिसण्यासाठी लाल दिव्याची गरज पडत नाही, पुढे मागे गोंडा घोळणाऱ्या पाच - दहा गाड्या आणि तेवढीच टाळकी हीच आजच्या पुढारीपणाची लक्षणं झाली आहेत. गल्लीतला दादासुद्धा दिल्ली दरबारचा शहेनशहा असल्यासारखा ताफा घेऊनच फिरतो, आणि त्याच ताफ्याच्या मनगटी सामर्थ्यावर बाकीच्यांना गप्प करतो. त्यासाठी त्याला कुणाच्या परवानगीची आणि सवलतींची गरज नसते. नाक्यावरचा मवाली म्हणावा इतक्याच लायकीच्या 'त्या' दादाचा हा महिमा असेल तर बाकी स्वयंघोषित जगद नायकांबाबत काय बोलावे? तुरुंगातून जामीनावर सुटलेला बिहारचा एक राजकीय गुंड रोड शो करत जातो, यापेक्षा अधिक काय सांगावे? त्यामुळे लाल दिवा नसल्याने कुणाला फार काही फरक पडेल असे वाटत नाही. एक 'प्रतिकात्मक प्रयत्न' या शिवाय या निर्णयाला फारसे महत्व नाही. 
 
उन्मेष गुजराथी 
09322 755 098

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments