' मजबूत नेता आणि निर्णायक सरकार' चा नारा देत दिल्लीकडे आगेकूच करणार्या भाजपला कॉंग्रेस आघाडीने दिल्लीच्या आसपासही फिरकू न दिल्याने समस्त भाजपेयी आता बिथरले आहेत. या अपयशाचे खापर एकमेकांवर फोडून पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणण्याची कोणतीही संधी सोडली जात नाहीये आणि या पक्षाचे 'लोहपुरूष' 'कुमकुवतपणा' दाखवत यातल्या एकाही असंतुष्टाला गप्प बसवू शकलेले नाहीत. थोडक्यात भाजपमधली 'निर्नायकी' या निमित्ताने पुढे येते आहे. पण हे फक्त भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील चित्र आहे, असे नाही.
वाजपेयींनी तीन वेळा भाजपला सत्ता मिळवून दिली. पण या निवडणुकीत त्यांनी निवृत्ती स्वीकारली नि सगळी धुरा अडवानींकडे आली. पंतप्रधानपदासाठी आसुसलेल्या अडवानींनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना गप्प बसवून निवडणूक पार पाडली. पण सत्ता न आल्याने या विरोधकांनाही तोंड फुटली आहेत. त्यामुळेच पक्षातच 'महाभारत' सुरू झाले आहे. या महाभारतात पक्षातील नेते एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात व्यस्त आहेत.
हे वस्त्रहरण रोखण्याचे काम 'कृष्ण' बनून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करावे लागत आहे. जसवंतसिंहांसारख्या नेत्यांनी संघाच्या हिंदूत्ववादी विचारसरणीने चालल्यामुळेच ही वेळ ओढविल्याचे विधान केल्यानंतर संघीय नेत्यांचाही संताप आवरला नाही. त्यांनीही 'मग भाजपने हिंदूत्व सोडावे' असा जाहीर सल्ला दिला आहे. अडवानींना आता कुणीही विचारत नसल्याने आणि राजनाथसिंहांचा काही प्रभावच पडत नसल्याने पक्षात 'निर्नायकी' माजली आहे.
PTI
PTI
निवडणूक सुरू असतानाच सुधांशू मित्तल यांच्या नेमणुकीवरून अरूण जेटली आणि राजनाथसिह समोरासमोर आले होते. विशेष म्हणजे हे जेटली या निवडणुकीत मुख्य स्ट्रॅटेजिस्ट होते. त्यांच्या स्ट्रॅटेजी पार अपयशी ठरल्या. पण तरीही याचे 'बक्षिस' म्हणून त्यांना राज्यसभेचे नेतेपद देण्यात आले.
दुसर्या प्रभावहीन नेत्या सुषमा स्वराज यांना लोकसभेत उपनेते करण्यात आले. यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते असलेल्या जसवंत सिंह यांना वळचणीत फेकण्यात आले. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हाही अडगळीत जाऊन पडले. मुरलीमनोहर जोशी या अडवानी विरोधक नेत्याचाही काही पत्ता लागत नाही. या उपेक्षेमुळे ही नाराज मंडळी आता तोंड उघडू लागली आहेत. सुरवात जसवंतसिंहांनी थेट अडवानींवर तोफ डागून गेली. त्यानंतर यशवंत सिंन्हा यांनी पक्षाध्यक्षांना पाठलेला 'नाराजीनामा' प्रसारमाध्यमांकडेही पाठवून ही नाराजी जगजाहिर केली.
PTI
PTI
आता जेटलींनीही सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे जेटलींनी राजीनामा दिल्यानंतर राजनाथसिंहांनी सहा दिवस तो दडवून ठेवला होता. जसवंतसिंह, यशवंत सिन्हा यांनी जेटलींवर टीका केल्यानंतर राजनाथसिंहांनी तो माध्यमांपुढे आणला. दोन ज्येष्ठ नेत्यांच्या टीकेनंतर जेटलींनी राजीनामा दिल्याचे चित्र निर्माण करण्यात राजनाथसिंह यशस्वी ठरले. खुद्द पक्षाध्यक्षच अशा राजकारणात अडकले हे दुर्देवच.
PTI
PTI
पक्षातील आधारस्तंभ मानले जाणारे दिग्गज नेतेच नाराज असल्याने अर्धा डझन नेत्यांची नाराजी दूर करण्याचे दडपण पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यावर आले आहे. पक्षातील नेत्यांना कामाऐवजी खुर्चीचीच लालसा अधिक असल्याने प्रत्येक नेता, पक्ष आपल्या मालकीचा असल्यागत वावरतो आहे.
हे फक्त दिल्लीत चाललेय असे नाही. राज्याराज्यातील भाजपमध्येही हीच परिस्थिती आहे. दक्षिणेकडे अनेक वर्षांनंतर सत्ता मिळवलेल्या येडीयुरप्पा यांच्यासारख्या 'क्लीन' नेत्यावरही पक्षातून शिंतोडे उडवले जात आहेत. त्यांना सरकार चालवणे इतके कठिण जात आहे. संघाच्या बैठकीला उपस्थिती लावत संघ नेत्यांपुढे कामाचा पाढा वाचावा लागत आहे. उत्तरांचलातही पक्षातील आठ आमदारांनी बंड पुकारल्याने पक्षाची येथील सत्ताही जाण्याची भीती आहे. विरोधकांपेक्षा पक्षातील नेतेच एकमेकाचे पाय ओढत आहेत. त्यामुळे विरोधकांचे काम सोपे झाले आहे.
PTI
PTI
महाराष्ट्रातही हीच गत आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष नीतिन गडकरी यांच्यातून आता विस्तवही जात नाही. मुंडेची पुतणी पूनम महाजन यांचे तिकीट पद्धतशीरपणे कापले गेल्यानंतर त्यांचा संताप झालाय. तत्पूर्वीच त्यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावून नंतर तो खालीही घेतला. आता ते काय करतील की राष्ट्रवादीतील नाराज असलेल्या छगन भुजबळांच्या साथीने 'ओबीसी'ची बाराखडी राज्यात गिरवतील ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
PTI
PTI
गुजरातमध्येही हेच सुरू आहे. मोदी यांच्या एकाधिकारशाहीला पक्षातील अनेक नेते आता कंटाळले असून, त्यांच्याविरोधात आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. शिवाय केंद्रातील मोदीविरोधकही या कामी लागले आहेत. कारण मोदी मोठे झाल्यास त्यांच्या नेतृत्वाच्या मार्गात अडथळे येण्याची शक्यता आहे. अरूण शौरी व अरूण जेटली यांनीही मोदींचा 'पीएम इन वेटिंग' असा उल्लेख करून भाजपमधील नेतृत्वाचा 'अरूणोदय' झाल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. आता मोदींच्या आक्रमक हिंदूत्वामुळेच पक्षाचा पराभव झाल्याचे कारण सांगत मोदींचा दिल्लीचा रस्ता रोखण्याचे काम त्यांचे विरोधक करत आहेत.
राजस्थानात 'वसुंधरा राज' ला कंटाळलेल्या नागरिकांनी अनेक वर्षांनंतर कॉग्रेसचा हात पकडत भाजपला सत्तेवरून बॅकफुटवर टाकले आहे. लोकसभा निवडणुकांमध्येही भाजपच्या पदरी निराशाच आली आहे. मध्य प्रदेशात काय ते शिवराज सिंह चौहान यांचे ठीक चालल्याचे दिसतेय. दिल्लीत तर सलग तिसर्यांदा कॉंग्रेसच्या शीला दीक्षितांनी सत्ता मिळवून भाजपेयींची बोलती बंद केली आहे. शिवाय या लोकसभा निवडणुकीत तर सातही जागा जिंकून 'क्लीन स्वीप' केला आहे. भाजपचे केंद्रीय नेते दिल्लीत असूनही दिल्लीत भाजपची एकही जागा येऊ शकली नाही. भाजपचे काही एक वर्चस्व असलेल्या राज्यातच ही परिस्थिती असताना, भाजपला फारसे महत्त्व नसलेल्या राज्यातली स्थिती आणखी कठीण आहे.
हिंदुत्व का सत्ता?
बाबरी मशीद पडल्यानंतर भाजपने 'हिंदूचे कैवारी' अशी प्रतिमा उभी केली होती. पण आता निवडणुका आल्या की पक्षाला हिंदुत्व आठवते. या लोकसभा निवडणुकांमध्येही पक्षाने हेच केले. पण सत्ता मिळाली नाही. वरूण गांधींची प्रक्षोभक भाषणे उलट पक्षाच्या मुळावर उठली. वरूण जिंकले, पण इतर ठिकाणी त्यांच्या या आक्रमक हिंदूत्वाने आपल्याच उमेदवारांना पाडले.
PTI
PTI
निवडणुकांपूर्वी वरुण गांधी आणि भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव पक्षातील नेते करत होते. आता या दोघांच्या कट्टर हिंदुत्वानेच पक्षाचा पराभव झाल्याचे पक्षातील नेते (खासगीत आणि काही तर जाहीरपणे) म्हणत असून, हिंदुत्वाचा मुद्दा तडीपार केल्याशिवाय पक्षाला सत्तेवर येता येणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे पक्षातील कट्टर नेते मात्र हिंदुत्वाशिवाय पक्षाला सत्ता काबीज करता येणार नसल्याचे म्हणत आहेत. पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे 'रेटायचा का काटायचा' यावरच सध्या विचार मंथन चालले आहे. पक्षातील मुस्लिम नेते निवडणुकांपासूनच अंधारात गेले आहेत. वरुण गांधी यांच्यावर टीका करणार्या शहनवाज हुसेन यांचा पत्ता निवडणुकांपूर्वीच कापण्यात आलाय. त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आल्याने आता तेही पक्षात फारसे लक्ष घालत नाहीत. मुख्तार अब्बास नक्वी आणि ज्येष्ठ नेत्या नजमा हेपतुल्ला यांचाही पत्ता कार्यकर्त्यांना शोधावा लागत आहे.
एरवीही स्वबळावर मिळणार नाही, हे स्पष्ट असल्याने भाजला इतर पक्षांनाही बरोबर घ्यावे लागेल याची नेत्यांना कल्पना आहे. राष्ट्रीय आघाडी करताना हिंदूत्ववादी प्रतिमा अडचणीची ठरत असल्याने भाजपेयींनी आता हिंदूत्व गुंडाळून ठेवले आहे. त्यामुळे संघ नाराज आहे. थोडक्यात हिंदूत्व राखले तर अल्पसंख्याकांची मते जातात नि पक्ष बाकी पक्षांसाठीही अस्पृश्य ठरतो. हिंदूत्व सोडले तर जो आहे तो 'बेस'ही निघून जातो. शिवाय संघही नाराज होतो. त्यामुळे हिंदूत्व धरावे की सोडावे या गोंधळात नेतृत्व आहे.
PTI
PTI
पक्षांतर्गत मतभेद माजलेले आणि वैचारीक गोंधळही अशा आवर्तात भाजप सध्या सापडला आहे. सध्या तरी राजीनामा सत्र सुरू आहे. पण पक्षातील रणकंदन न थांबल्यास पक्षाला गळती लागणार हे निश्चित आहे. मतभेद वेळीच न मिटवल्यास आणि वैचारीक गोंधळ दूर न केल्यास आगामी काळात राजनाथ यांना केवळ राजीनामा गोळा करण्याचे काम करावे लागू नये म्हणजे निभावले. पण राजनाथ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकवटला जाईल का हा या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रव्यापी प्रतिमा असलेला नेता सध्या भाजपकडे नाही आणि त्यातल्या त्यात 'राष्ट्रीय ओळख (की बदनामी?)' असलेल्या मोदींनाही पुढे आणले जात नाही. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या 'निर्नायकी' आहे. त्यामुळे पुढचा काळ भाजपची परीक्षा पहाणारा असेल हे नक्की.