suvichar

शेवटी संवाद महत्त्वाचा: आशादायी कथा!

Updated: मंगळवार, 3 मार्च 2026 (17:07 IST)
 
'पुन्हा एकदा घरट्याकडे' कथेचे शीर्षक वाचले नि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची त्या जगविख्यात काव्याची ओळ आठवली, 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला...!' संग्रहातील या कथेत तीन पिढ्यांचा मनाला भिडणारा संघर्ष ऋचा कर्पे यांनी उत्कटतेने मांडला आहे. आजोबा- आजी, त्यांचा मुलगा नि सून तसेच राघव नावाचा नातू! राघवचे आई- वडील दोघेही उच्चशिक्षित असून दूरदेशात स्थायिक झालेले. राघव हा तिसऱ्या पिढीचा... त्याचे शिक्षण परदेशी झाले असूनही त्याला तिथले वातावरण आवडत नाही. त्याला भारतात परत यायचे असते. दरम्यान गावी आजोबांचा मृत्यू झाला त्यावेळीही त्याचे आईबाबा आजीला भेटायला येत नाहीत. राघवचे शिक्षण झाल्यानंतर तो भारतात येतो. आजीला भेटतो. आजीसोबत आनंदात दिवस घालवत असताना राधिका नावाच्या त्याच्या मैत्रिणीचा कथानकात सहज प्रवेश होतो. दोघे भारतीय परंतु दोघांची मैत्री जमते ती परदेशात!‌ राधिकाही तिच्या आई वडिलांसोबत परदेशात राहत असते. तिलाही तिथल्या वातावरणापेक्षा 'मातृभूमी'ची आस लागलेली असते. राघव पाठोपाठ राधिकाही भारतात येते. राघव तिची आजीसोबत ओळख करून देतो. दोघींनाही एकमेकींचे स्वभाव आवडतात. आजी, राघव, राधिका एक निर्णय घेतात. त्यांनी घेतलेला निर्णय बहुतांश वाचकांच्या लक्षात आला असेलच. वाचकांनी त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कथा वाचावी. लेखिका ऋचा यांच्याजवळ असलेली शब्दसंपत्ती आणि तो पेटारा योग्यवेळी उघडण्याची कला या कथेतील शेवटच्या परिच्छेदात लक्षात येईल....
 
'आणि आज... अचानक तिच्या अंगणात वसंत फुलला होता. मोगऱ्याचा सुवास दरवळला होता. सुखाचे कोवळे ऊन पसरले होते. पक्ष्यांनी दाण्यांच्या शोधात आकाशात भरारी घेतली होती पण ते परतणार होते, पुन्हा एकदा घरट्याकडे.....!'
 
 'आणि आता तर गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत रंगू लागला होता. दिवसा तुम्ही कोणाशीही कितीही वेळ संवाद साधला तरी काही वेगळं वाटत नाही, पण नक्षत्रांनी भरलेल्या आकाशात चंद्र कोणते रसायन मिसळतो कोणास ठाऊक! शब्दांची नशा चढू लागते. हृदयाचे ठोके ऐकू येतात आणि गोष्टींच्या ओघात दोन व्यक्ती एकमेकांच्या इतक्या जवळ येतात की स्वतःचीच नव्याने ओळख होवू लागते....' वाचकांनो तुम्ही ओळखलेच असेल त्याप्रमाणे दोन प्रेमींच्या अवस्थेची ही दशा आहे. 'स्पेशल' ते 'व्हेरी स्पेशल' या कथेतील! काव्या पत्रकार नि केदार छायाचित्रकार! दोघेही एकाच कार्यालयात! त्यामुळे सुरुवातीची ओळख, नंतर थोडा जास्त परिचय, काही दिवसांनी मैत्री... मैत्रीचे रुपांतर प्रेमात होणारच की.... पुढचे पाऊल म्हणजे वर उद्धृत केलेली अवस्था! अतिपरिचय अवज्ञा याप्रमाणे प्रेमात रुसणे, बोलण्यात- वागण्यात दुरावा, अनावश्यक गोष्टींचा ताणतणाव हा आलाच... हा 'स्पेशल' प्रवास कर्पे यांनी मनोरंजकतेने मांडला आहे. म्हणतात ना, शेवट गोड तर सारे गोड.... आपणही त्या गोडीची 'व्हेरी स्पेशल' चव चाखूया...
 
ऋचा कर्पे यांच्या लेखनात एक सकारात्मकता आहे, आशावाद आहे. हे प्रत्येक कथेत लक्षात येते. 'गोडवा' ही कथा कुटुंबातील हरवलेल्या संवादाच्या अंगाने असली तरीही वेगळी विचारसरणी जोपासणारी आहे. मानसशास्त्र पदवीधर असलेली सुमेधा, उच्चशिक्षित पती नि सासू असा त्रिकोण! सुमेधा लेखिका असते. तिची लेखमाला वर्तमानपत्रात सातत्याने सुरू असते. सासूबाईंना तिच्या लेखनाचे कौतुक असल्याचे सुमेधाला जाणवत नाही. दोघींमध्ये मोकळ्या संवादाची कमतरता असते. एका रात्री सुमेधा लेखन करत असताना तिला जाणवते की, तितक्या उशिरा रात्री सासूबाई स्वयंपाकघरात काहीतरी करत आहेत. ती जाऊन पाहते. सासूबाई चहा करत असतात. सुमेधा त्यांना विचारते. तेव्हा सासू म्हणते,
"अगं मला नको. मी तुझ्या बद्दल बोलतेय! रात्रीची लिहायला बसलीस, चहा घे. जरा तरतरी येईल. छान काहीतरी सुचेल. तुम्ही आजकालच्या मुली नं। फार जिद्दी. पण खरंच हुषार हं! आपली आवड जपणे, आपले अस्तित्व निर्माण करणे, ते टिकवून ठेवणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे हे खरंच गरजेचे आहे गं.. घे, चहा अन् जास्त जागू नको बरं." हातात चहाचा कप देऊन त्या खोलीत निघून जातात. सुमेधाला हा अनपेक्षित हवाहवासा आयता चहा आज अधिकच गोड लागत होता....
 
'भावविश्व' ही कथा एका अनघा नावाच्या एका तरुणीची! अमेय नावाच्या महाविद्यालयात तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलासोबत तिचे एकतर्फी प्रेम बसलेले! अमेय बोलत नसला तरीही त्याच्या डोळ्यात,‌ बोलण्यात तिला प्रेम जाणवते. खरेच तसे असते का? अनघाचे प्रेम अमेयच्या लक्षात येते का? कथानक कुठे कुठे कोणते वळण घेते, वाचकाला कोणत्या भावविश्वात नेते हे जाणून घेण्यासाठी कथावाचनच अधिक चांगले!
 
'चिमुटभर धाडस' ही कथा वाचताना त्यातही कथेचा शेवट वाचताना मन सुन्न होते. ऋचा यांचा कथासंग्रह हाताची साथ सोडतोय की काय अशी अवस्था होते. हसत्या खेळत्या एकत्र कुटुंब पद्धतीत एखादा माणूस कसं कलंकित वातावरण तयार करतो नि कुटुंबातील सुमी नावाची एक छोटी मुलगी कोणते धाडस करते? त्या माणसाला कशी शिक्षा करते हे लेखिकेने अत्यंत हळुवारपणे, मोठ्या संयमाने लिहिले आहे. सुमीने केलेल्या धाडसानंतर घरात निर्माण झालेल्या वातावरणाबाबत लेखिकेचे वाक्य जणू सारी कथा वाचकांपुढे उभे करते, 'त्या दिवसानंतर बळवंत तात्यांनी वरचेवर सासरी येणे बंद केले.... घरातील लेकी सुना आता मुक्त श्वास घेत होत्या...'
 
'विधिलिखित' ही पण वेगळ्या धाटणीची कथा! विधिलिखित टळत नाही, नशिबात असेल तसेच घडते अशा विचारांना बळ देणारी ही कथा वाचली की या वाक्यांवर असलेला विश्वास अधिक दृढ होतो. कीर्ती नावाची एक तरुणी! तिला एक वेगळेच स्वप्न सातत्याने पडत असते. ती त्यामुळे त्रस्त असते. तिची पूर्वा नावाची मैत्रीण असते. ती कीर्तीला तिच्या डॉक्टर असलेल्या मावसभावाकडे घेऊन जाते. कीर्तीचा आजार बरा व्हावा म्हणून डॉ. प्रताप तिच्यावर औषधोपचाराशिवाय वेगळा प्रयोग करतात. त्यामुळे कीर्ती त्या 'स्वप्ना'च्या आजारातून बाहेर येते का? दोघे औषधोपचाराच्या माध्यमातून जवळ येतात. त्यांच्यामध्ये कोणते संबंध निर्माण होतात? हे सारे वाचताना मती गुंग होते. वेगळ्या विश्वात ही कथा घेऊन जाते....
 
'धारा' ही एक आश्वासक कथा आहे. एका स्वप्नाळू, जिद्द,‌ आत्मविश्वास असणाऱ्या मुलीची ही कथा. विशेष म्हणजे वडील मनोरुग्ण तर आईला कमी दिसणे नि फीट्स हे दोन आजार! अशा परिस्थितीत सापडलेल्या धारा नावाच्या नातीला तिचे आजोबा लहानपणापासून सांभाळतात. धाराचेही आजोबांवर अतोनात प्रेम असते. सोबतच धारा तिचे मन तिच्या शिक्षिककडे मोकळं करत असते. त्या शिक्षका म्हणजे तिच्या शब्दात जणू तिची रोजनिशी. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना धाराचे अतुलवर प्रेम जडते. दोघेही लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा 'मी लग्नानंतर माझ्या आईबाबांसह आजोबांकडे लक्ष देईन, त्यांना सांभाळणार आहे.' अशी अट घालते. अतुल आणि त्याचे कुटुंबीय ती अट मान्य करतात. काही महिन्यांनी त्या शिक्षिकेला धारा तिची लग्नपत्रिका पाठवते. त्यावर वराचे नाव अतुल ऐवजी अनिकेत नाव पाहून शिक्षिकेला आश्चर्य वाटते. सोबत धाराने लिहिलेल्या पत्रात सारा खुलासा होतो. वाचकांना अतुल ऐवजी अनिकेत हे नाव का असा प्रश्न पडला असेल त्यासाठी लेखिकेने धाराचे पत्र ही व्यवस्था केलेली आहे.
 
'विश्वास' हे कथानक अत्यंत वेगळ्या वळणाचे आहे. एका तरुणीचा तिच्या आईबाबांसह निघृणपणे खून होतो. तो सारा प्रकार तिचा मावसभाऊ संकेत पाहतो. निशा नावाची ती तरुणी महत्त्वाचे पुरावे त्याच्या दिशेने फेकते परंतु गुन्हेगार अत्यंत क्रुर आणि दूरवर लागेबांधे असलेले असतात. संकेत घाबरून ते पुरावे कुणाकडेच देत नाही परंतु सतत घाबरलेल्या, अबोल अवस्थेत वावरत असतो. तो लग्न करण्यासाठी तयार होत नाही. आईच्या हट्टासाठी तो साक्षीशी लग्न करतो. साक्षी कोण असते? तिच्याशी लग्न केल्यानंतर संकेतची तब्येत, औदासिन्य नष्ट होते का? साक्षीने संकेतशी का लग्न केले? संकेतजवळ असलेल्या त्या पुराव्याचे काय होते? साक्षीचे खरे रुप संकेतसमोर येताच काय घडते? ह्या प्रश्नांची आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे लेखिका ऋचा कर्पे यांनी कथेत तपशीलवार दिली आहेत...
 
दहा वेगवेगळे विषय घेऊन आलेला हा कथासंग्रह वाचनीय आहे, उत्कंठावर्धक नि सकारात्मक तसेच आशावादी आहे. ऋचा कर्पे यांच्याजवळ असलेली विपुल शब्दसंपत्ती आणि ते शब्दभांडार योग्य ठिकाणी खुले करण्याची अनोखी कला यामुळे हा कथासंग्रह उत्तम झाला आहे....
 
शेवटी संवाद महत्वाचा या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ७४व्या अधिवेशनात संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुमित्राताई महाजन (माजी लोकसभा स्पीकर), माननीय दिलिप कुंभोजकर (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली), मिलिंद महाजन (माजी अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ), प्रसिद्ध नाटककार व पटकथा लेखक श्री अशोक समेळ उपस्थित होते.
 
शेवटी संवाद महत्त्वाचा.... कथासंग्रह 
लेखिका : ऋचा दीपक कर्पे 
प्रकाशक : शॉपिज़न डॉट इन,
अहमदाबाद 
मुखपृष्ठ : सारंग क्षीरसागर 
पृष्ठ संख्या : ८३
आस्वाद: नागेश शेवाळकर,
पुणे 
{९४२३१३९०७१}

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

स्पायसी चटपटीत चिली गार्लिक टोमॅटो मॅगी; नेहमीच्या मॅगीला एक मस्त ढाबा-स्टाईल ट्विस्ट

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे फायदे, दुष्परिणाम जाणून घ्या

विमानतळावर सरकारी नोकरीची संधी, पात्रता ,पगार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पावसात भिजल्यानंतर तुमच्या त्वचेला खाज सुटते का, या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments