रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By

स्पर्श वेडा : "वेडे" होऊन जगा...

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता. आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.
 
सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.
रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत. स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर fm ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र सोशल मिडीयाद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे. चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे.... किती छान ना.
हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच वाया घालवायचा, त्याचा मोबाईल नेहमी रिकामाच असायचा.
 
ना फुला-फळांचे, ना पक्षा प्राण्यांचे फोटो ...काहीच नाही.
कोणाशी काही देवाण घेवाणचं नाही, तर हे सगळे येणार कुठून? हा पठ्ठ्या दोन दोन दिवस तर नेट सुद्धा चालू करायचा नाही. नेट चालू झाल्यावर येणारा पोस्ट्सचा खच तो काही मिनिटात बाजूला सारायचा.... काही वाचून तर काही न बघता, न उघडता. ऑफिस मधेही याचा 'वेडे'पणा संपायचा नाही. सर्वांच्या जवळ जाऊन बोलायची याला भारी हौस. ऑफिसने कर्मचाऱ्यांना दिलेले चॅट एप्लिकेशन तो फक्त कामा पुरताच वापरायचा. माणसांशी प्रत्यक्ष बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला ऑफिसचे चौकीदार बोडके काकांच्या मुलीने संगणक शास्त्रात विशारद केल्याचं समजलं होतं. त्यासाठी मोबाईलवर पोस्ट शेयर करून अभिनंदन करायचे सोडून या वेड्याने बोडके काकांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते. तेव्हा केवढे भावुक झाले होते काका. पण याला लोकांना असं रडवायची सवयच होती. त्याच्या या वेडाची कल्पना ऑफिस मधल्या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना होती. या सवयीमुळे त्याचा डेस्क नेहमी न सांगता साफ व्हायचा, पिण्याचे पाणी, चहा कॉफी सर्व काही जागेवर यायचे. ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी चांगला व्हायचा. असेच एकदा ऑफिस मधल्या बर्वे मावशींच्या मुलीला मुलगी झाल्याचे कानावर आल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी घरून आईने पाठवलेले डिंकाचे लाडू आणून गुपचूप मावशींच्या हातावर देत "ताईला बाळ झालंय ना, तिला द्या" म्हणाला. ते बघून केवढा गहिवर दाटून आला होता त्या माऊलीच्या नजरेत, काय म्हणून सांगावा.
 
तो घरी दारी सारखाच वागायचा. सुट्टी झाल्यावर घरी आले की त्याचे सर्व मित्र लॅपटॉप, मोबाईल घेऊन तासंतास बसायचे. कोणी सोशल मिडीयातून मित्रांशी संवाद साधायचे, तर कोणी रोजच्या चहा, कॉफी किंवा जेवणाचे छायाचित्र पाठवून भरपूर लाईक्स मिळवायचे. त्यांची मित्र संख्या दिवसेंदिवस वाढत होती. हा मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर कपडे बदलून खाली सोसायटीच्या बागेत जायचा. मिळेल त्या वयाच्या मुला माणसां सोबत खेळायचा. फिरायला आलेल्या सत्तरीतल्या तरुणां सोबतही त्याची खूप गट्टी जमायची. या वर्गाची दुःखं काहीशी वेगळी असतात, याची चांगली जाण त्याला खूप लवकर आली होती. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्या सुख दुःखाची चौकशी करायचा. ती म्हातारी माणसं त्याला बऱ्याचदा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत का रहात नाही, म्हणून विचारायची, तो त्यांना फक्त मिश्किल स्मित देऊन विषय टाळायचा. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठीमागे तीच माणसे त्याला प्रेमाने 'वेडा' म्हणायची. त्याला येणारे मैदानी खेळ बागेतल्या छोट्या मुलांना शिकवताना त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांच्या देखील तो ओळखीचा झाला होता.
 
त्याला आता सोसायटीत अडीच तीन वर्ष झाली होती. नेहमी तरुण पुरुष भाडेकरूंच्या नावाने ओरडा करणारी तोंडे हळू हळू शांत झाली होती. एकदा असाच खेळताना पाय मुरगळला म्हणून त्याने सकाळच्या व्यायामाला दांडी मारली, संध्याकाळी देखील त्याला बागेत जाणे जमले नव्हते. डॉक्टरांनी चार दिवस पूर्ण आराम करायला सांगितले होते. एव्हाना आपल्या लाडक्या दादाच्या दुखण्याची बातमी चिल्ल्या पिल्ल्यांनी अख्ख्या सोसायटीत पसरवली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरात एकटा असताना दारावरची घंटी वाजली, म्हणून हळू हळू चालत जाऊन त्याने दरवाजा उघडला, तर दारात शिंदे आजी आणि पवार आजी उभ्या होत्या. शिंदे आजींनी त्याच्या पायासाठी लेप बनवून आणला होता. दरवाजा उघडताच "काय रे पोरा, एवढं लागलं तर सांगायचं नाही का?" म्हणून प्रश्नांच्या फैरी झाडत दोघी घरात शिरल्या. त्याच्या परवानगीची वाट न पहाता त्याला बसायला लावून त्याच्या पायावर सोबत आणलेला लेप लावला. तुम्हाला कसं समजलं म्हणून विचारलं तर अगदी तिखट आवाजात शिंदे आजींनी "अरे पोरा, बागत तू येईना म्हणून आमचे म्हातारे बी घर सोडीनात, त्यांच्या बडबडीच्या जाचा पायी तुला हुडकीत आले" अशी बतावणी केली. त्यांचे उत्तर ऐकताना त्याच्या गालावर छानसं हसू आलं होतं. लेप लावून होई पर्यंत घरात गर्दी वाढतच गेली. शिंदे, पवार आणि जोशी आजोबा, गफूर चाचा, नायर आंटी, प्रमिला काकू, चिल्ली पिल्ली गँग आणि अजूनही बरेच जण आले होते. ऑफिस सुटून मित्र घरी पोहोचले तेव्हा घरात बसायला देखील जागा शिल्लक नव्हती. आपल्या मित्राची सोसायटीत इतकी ओळख असेल, याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती.
 
त्याचे मित्र "फ्रेंड्स लिस्ट" वाढवत होते तेव्हा हा माणसे जोडत होता. त्याचे मित्र आभासी दुनियेत रममाण व्हायचे तेव्हा हा 'वेडा' खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरायचा.
त्याच्या मित्रांना लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांशी "टच" मधे रहायला आवडायचे, याला मात्र लोकांना "स्पर्श" करायला आवडायचे.
तो लोकांच्या मनाला स्पर्श करायचा, त्यांच्या भावनेतील ओलावा जपायचा. कधी त्यांच्या घरात, तर कधी आयुष्यात डोकवायचा, त्यांच्या मनात आणि आठवणीत घर करून राहायचा. आज घरात आणि घराबाहेर जमलेली गर्दी म्हणजे त्या वेड्याने जोडलेली माणसे होती. केवळ स्पर्शाने माणूस इतका श्रीमंत झाल्याची उदाहरणे तशी विरळच.
एवढ्या घाईत पवार आजींनी त्याला लवकर बरा होण्यासाठी फर्मान काढले आणि पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या त्यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं...
"आज प्रत्येकाच्या ठायी असे स्पर्शाचे असे वेड जपण्याची गरज वाढत चालली आहे व आपापसातील संवाद कमी व वादच जास्त वाढत चालले आहेत तरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक रोज एका लहान मुलाशी व एका वयस्कर माणसाशी संवाद साधायला हवा.मुलांशी बोलताना आपण लहान होतो व चार चांगल्या गोष्टी त्याला हक्काने सांगता येतात व वयस्कर माणसाशी संवाद साधल्यावर त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येते. हि गोष्ट रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्या दैनंदिनीत समाविष्ट करा.
 
जीवन खुपच सुंदर असते, आहे, ते आनंदात जगा, "वेडे" होऊन जगा...!!"...

- सोशल मीडिया