मुलांनी काय खावं, काय टाळावं.? १)अभ्यासाच्या काळात काही मुलांना खूप भूक लागते, तर काही मुलं काहीच खात नाही. ही दोन्ही त्यांच्यावरील अतिताणाची लक्षणं आहे. त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेत त्यांना विशिष्ट अंतरानं खायला द्यावं.
२)दिवसातून दोनच वेळा मुलांना पोटभर जेवायला न देता चार वेळा विभागून थोडं थोडं खायला द्यावं.
३)मधल्या वेळेच्या खाण्यात त्यांना फळं, सुकामेवा खाण्यास द्यावा.
४)परीक्षेला जाण्याआधी त्यांना लिंबू सरबत द्यावं.
५)परीक्षेवरून आल्यावर त्यांना धपाटे, धिरडे असा थोडा चटकदार खाऊ दिला तरी चालेल.
६)प्रथिनं असलेला आहार मुलांना द्यावा.
७)मुलं पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसत असतील तर पहाटे उठल्यावर त्यांना नुसताच चहा किंवा दूध देऊ नये. त्याबरोबर फळे किंवा सुकामेवा द्यावा. हे दोन्ही नसतील तर पोळी किंवा बिस्किटं पण चालतील. तसेच मुलं रात्री अकरानंतर जर अभ्यास करत असतील तर रात्री नुसताच चहा न देता थोडं खायलाही द्यावं. नुसत्या चहानं मुलांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.
८)मुलांना परीक्षेच्या काळात बाहेरचं किंवा जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. आपल्या हातानं बनवलेलं ताज ताजं मुलांना खायला द्यावं.
९)परीक्षेच्या काळ म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. त्यांच्या शरीरात पुरेसं पाणी जाण्याची आवश्यकता असते. तेव्हा थोड्या-थोड्या वेळानं त्यांना पाणी प्यायला द्यावं. मधून-मधून सरबत द्यावं. फळांच ज्यूस देऊ नये त्यापेक्षा लिंबाच्या सरबताला प्राधान्य द्यावं.
नुसतेच पालक नका; मित्र बना परीक्षेच्या काळात मुलांना तुमच्याकडून शिस्तीची किंवा तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर तुमच्या सहकार्याची गरज असते. तुमच्या सूचनांची नव्हे तर तुमच्यासोबतच्या संवादाची गरज असते. प्रत्येक मूल हे स्वतंत्र असतं. त्याच्या क्षमता वेगळ्या असतात, हे आधी पालकांना स्वीकारता आलं पाहिजे. आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करणं, स्वत:चं उदाहरण देणं यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल. तुमच्यापासून तुमचं मूल दूर होण्याची, तुमचा सहवास त्याला नकोसा वाटण्याची, त्यातून त्याला नकारात्मक ऊर्जा मिळण्याची शक्यता असते. त्याच्यातील दोषांना दूषणं देत बसण्यापेक्षा ते दूर होतील म्हणून प्रेमानं सहकार्य करा. त्याच्यातील गुणांची, क्षमतांची, त्याच्यातील ताकदीची त्याला जाणीव करून द्या.