ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे निधन
मराठीतील चार नवकथाकारांपैकी एक मानले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे आज पहाटे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. मध्यमवर्गीय जीवन त्यांनी अतिशय बारकाईने टिपले आणि त्यावर आधारीत त्यांच्या कथा मराठी साहित्याला नव्या दिशा देणार्या ठरल्या. 'तलावातील चांदणे' ही त्यांची कथा तर केवळ अप्रतिम. गंगाधर गाडगीळांचा जन्म २५ ऑगस्ट १९२३ला मुंबईत झाला. अर्थशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिडनेहॅम व मुंबईच्याच अन्य कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. भारतातील अनेक साहित्य चळवळींशी त्यांचा संबंध होता. १९८८-९३ पर्यंत ते साहित्य अकादमीचे उपाध्यक्षही होते. एका मुंगीचे महाभारत या नावाने आलेल्या त्यांच्या आत्मचरित्राला १९९३ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय अभिरूची, महाराष्ट्र राज्य सरकार, आर. एस. जोग आदी पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले होते. रॉकफेलर फाऊंडेशनची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली होती. गाडगीळांचे लेखन अत्यंत साधे होते. अनलंकृत लिखाणातून मध्यमवर्गीय जीवनातील गुंतागुंत मांडण्याचे त्यांचे कौशल्य विलक्षण होते. ते अतिशय संवेदनशील होते. त्यांच्या अनेक कथांमधून काही सामाजिक विधाने केलेली आढळतात. ही विधानेही केवळ एका समाजापुरती मर्यादित होती, असे नाही, तर जागतिक पातळीवर ती कुठेही लाग पडतील अशी होती. गाडगीळांनी गंभीर लिखाणाखेरीज लहान मुलांसाठीही लिहिले. त्यांची प्रवासवर्णनेही गाजली. एकपात्री प्रयोगही त्यांनी लिहिले. विनोदी कथाकारांतही त्यांचे नाव घेतले जाते. 'बंडू' हे पात्र त्यांनी अजरामर केले. 'बंडू व त्याची पत्नी स्नेहलता' ही मध्यमवर्गीय कुटुंबांचे प्रतिनिधीत्व करणारी पात्रे जन्माला घालून त्यांनी धकाधकीच्या आयुष्यावर मिस्किल हास्य पेरले. गाडगीळांची पुस्तके मुंबई आणि मुंबईकर, साता समुद्रापलीकडे, कडू आणि गोड, दुर्दम्य, एका मुंगीचे महाभारत, भोपळा, बायको आणि डोंबलं, भरारी, सफर, बहुरंगी रसिकतेची, पाच नाटिका, प्रारंभ, अशा चतुर बायका, आम्ही आपले धडधोपट, सात मजले हास्याचे, बंडू बिलंदर ठरतो, कबूतरे, बुगडी माझी सांडली ग, चीन एक अपूर्व अनुभव, गोपुरांच्या प्रदेशांत, बंडू-नानू आणि गुलाबी हत्ती, स्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते, बंडू जगू आणि खतरनाक अब्दुल्ला, पाण्यावरची अक्षरे, बाबांचं कलिंगड आणि मुलीचा स्वेटर, एकेकीची कथा, गंधर्वयुग, काजवा, नायगाराचे नादब्रह्म, साहित्याचे मानदंड हिममय अलास्का, बंडू नाटक करतो, बंडू मोकाट सुटतो, हसर्या कथा, गंगाधर गाडगीळांच्या निवडक फिरक्या, मुंबईच्या नवलकथा, तलावातले चांदणे, लंब्याचवड्या गोष्टी, बंडूचे गुपचुप.