सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2024 (09:39 IST)

अहमदनगर: पाणी नाही, तर मत नाही!

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील निघोज या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा २२ एप्रिलपासून सुरू होत आहे.
 
या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक हजेरी लावतात. निघोजमधील रांजणखळगे हे जगप्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक पर्यटक रांजणखळगे पाहण्यासाठी येत असतात. मात्र सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे रांजण खळगे कोरडे पडले आहेत. पाणी नसल्यामुळे या ठिकाणी असलेले मासे मृत पावले आहेत आणि उन्हाळ्यात यात्रा येत असल्यामुळे या ठिकाणी आता यात्रा उत्सव काळात पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
निघोज हे गाव आणि रांजण खळगे हे नगर आणि पुण्याच्या हद्दीवर असल्यामुळे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून डिंबे धरण आणि कुकडी धरणातून पारनेर तालुक्याला पाणी सोडले जाते आणि त्यामुळेच रांजण खळगे भरण्यासह या परिसरातील शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असते. मात्र सरकारी लालफितीत अडकलेले पाणी वाटप हे आता उत्सव काळात येणाऱ्या भाविकांना त्रास देण्याची शक्यता आहे.
 
पाणी नसल्यामुळे यात्रा उत्सव काळात भाविकांना मोठा त्रास होऊ शकतो. निघोज गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करूनही कुकडी कालव्यात पाणी सोडत नसल्यामुळे आता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
 
दरम्यान या ग्रामस्थांनी 'पाणी नाही तर मतदान नाही' अशी भूमिका घेतली आहे. उत्सव काळात जर कुकडी कालव्यातून नदीला पाणी सोडले नाही तर मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा निघोज ग्रामस्थांनी दिला आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor