शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (17:06 IST)

महामार्गांलगतच्या दारु दुकानांचा मार्ग मोकळा

महामार्गांच्या पाचशे मीटर अंतरातील दारुची दुकानं जर महापालिकेच्या अखत्यारित येत असतील तर यापुढे त्यांच्यावर दारुबंदी नसेल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील महामार्गांलगतची परवानाधारक दुकानं पुन्हा सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामधील मृत्यू यांचे प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर 2016 रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटर परिसरातील दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयात सुधारणा करुन सुप्रीम कोर्टाने हा नवा निर्णय दिला आहे.

दारुबंदीतून सुटण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ काही रस्ते स्थानिक प्रशासनाला हस्तांतरित केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही बाब स्पष्ट करुन सांगितली आहे. राज्यातील सुमारे 25 हजार दारु विक्रीच्या परवान्यांपैकी 15 हजार परवाने रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली, तर राज्याचा 7 हजार कोटींचा महसूलही बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती.