ईएसआयसी रूग्णालयासाठी एमआयडीसीने उपलब्ध करून दिला भूखंड
जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळासाठी (ईएसआयसी) रूग्णालयासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एमआयडीसी क्षेत्रात अवघा १ रूपया चौरस मीटरमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रूग्णालयांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त शासकीय रूग्णालय असावे, अशी जिल्ह्यातील कामगारांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी खा.उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रूग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आ.सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी पुढाकार घेत सप्टेंबर २०२३ महिन्यात जागेचा शोध घेतला. त्यासाठी पाच सदस्यीय समितीने एमआयडीसीतील जागांची पाहणी करून रूग्णालयासाठी भूखंड क्रमांक २१६९४ मध्ये रूग्णालयासाठी ५ हजार ४२५ चौरस मीटर जागा अंतिम करत एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. प्रस्तावाचा शासनपातळीवर उद्योग मंत्रालयाकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पाठपुरावा केला. एमआयडीसीने रूग्णालयांसाठी एक रूपया चौरस मीटरप्रमाणे जागा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक वासुदेव सपकाळे यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळ, मुंबई यांना रूग्णालयासाठी जागा मागणीचा प्रस्तावही दिला आहे. राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे लवकरच रूग्णालयासाठी जागा हस्तांतरित होणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय ईएसआयसी रूग्णालयासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे महसूल, कामगार महामंडळ, ईएसआयसी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.