पुढील दोन दिवसात कोकणात पाऊस हजेरी लावणार
लवकरच मुंबईत पाऊस हजेरी लावणार आहे. पुढील दोन दिवसात पाऊस महाराष्ट्राच्या कोकण परिसरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या केरळमध्ये असलेले पाऊस हा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. मात्र, मुंबईकरांना पावसासाठी आणखी आठवडाभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यानुसार मुंबईत मान्सून १० जूननंतर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने 29 मे रोजी जाहीर केले होते की, नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे.
“नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आहे. कर्नाटकचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, प.म. बंगालचा उपसागर, ई. बंगालचा उपसागर, ईशान्येमधील राज्ये, सिक्कीममध्ये पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे”, असे के. एस. होसाळीकर यांनी लिहिले आहे.