शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (21:40 IST)

राऊत यांचा कोठडीमधील मुक्काम पुन्हा वाढला

sanjay raut ed
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. वेळे अभावी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कोठडीमधील मुक्काम पुन्हा वाढला आहे.
 
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीमध्ये असलेल्या संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये त्यांना १० ऑक्टोबर पर्यंत कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज वेळेअभावी त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकलेली नाही. पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचे या कामासाठी म्हाडाबरोबर कंत्राट झाले होते. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीने चौकशी केली होती.
 
या चौकशीमध्ये १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचे समोर आले आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यामधील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे आणि याबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे.

Edited By - Ratandeep Ranshoor