शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्यातील विविध शहरांमध्ये व जगातील 25 देशांमध्ये तेथील साई मंदिरांमार्फत करण्यात येणार आहे. अनेक साईभक्तांनी एकत्र येऊन भारतातील विविध ठिकाणी श्री साई मंदिरांची उभारणी केली आहे. या मंदिरांच्या माध्यमातून श्री साई पादुका दर्शन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला आहे जेणेकरून शहरातील साईभक्तांना श्री साईबाबांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करू इच्छित असलेल्या ट्रस्टने संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे.