सत्ताधार्यांकडून जनतेच्या पैशांची लूट केली जात आहे - सुनिल तटकरे
शहादा नगरपालिकेत गेल्या २0 वर्षात विकासाच्या नावावर केवळ सत्ताधिकार्यांनी जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी शहादा येथील प्रचार सभेत केला. तटकरे यांच्या हस्ते राज्यभरातील नगरपालिका, महानगरपालिकेच्या रणसंग्रामातील राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे बुधवारी सकाळी जाहीर सभा घेण्यात आली. सभेस मार्गदर्शन करताना तटकरे पुढे म्हणाले की, सत्ताधार्यांनी ठेकेदारांशी भागीदारी करून जनतेच्या पैशांची लूट केली. नागरिकांपेक्षा ठेकेदारांच्या हिताची जपणूक केली. राष्ट्रवादी सत्तेत आली तर वर्षभरात शहराचा विकास करू. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता या प्राथमिक सुविधा प्राधान्याने सोडवू. काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी केवळ उपभोगण्यासाठी सत्तेचा वापर केल्याचा आरोप करत त्यांनी नाव न घेता माजी मंत्री पद्माकर वळवींना टोला लगावला. राष्ट्रवादी सत्तेत असताना शहराचा विकास झाला नाही तर पुन्हा कधीही मते मागण्यासाठी शहाद्याच्या वेशीवर पाय ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी काँग्रेससह भाजपा आणि एमआयएमवर सडकून टीका करताना एमआयएम पक्ष देशभरातील मुसलमानांची दिशाभूल करीत असल्याचे आणि भाजपा व एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेसने मुसलमानांची दिशाभूल करून मते मिळविल्याचा आरोप त्यांनी केला, तर जिल्हा संपर्कप्रमुख उमेश पाटील यांनी सत्ताधार्यांवर सडकून टीका करताना सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे शहर २० वर्ष मागे गेल्याचे सांगितले. शहाद्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त पाणीपट्टी असल्याचे सांगून दरमहा नऊ लाखांचा स्वच्छतेचा ठेका असताना शहरात वराहांचा सुळसुळाट आणि घाणीचे साम्राज्य असल्याचे सांगितले. शहरातील जातीय सलोखा टिकविण्यासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. राजेंद्र गावीत यांनीही मनोगत व्यक्त करताना सुंदर शहर, स्वच्छ शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत उपाध्यक्ष कदीर मौलाना, जिल्हा संपर्कप्रमुख उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत, तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील,नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.योगेश चौधरी, अनिल भामरे, अर्चना गावीत, दिनेश पाटील, हेमलता शितोळे तसेच पदाधिकारी व सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.