सुप्रिया ताई सांगतात, देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे, अशा आशयाचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या परभणी बोलत होत्या.
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे.”
कारण बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते पवारांचं नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवत आहेत, अशी शक्यता आहे. कारण या राज्याची सहा-सहा खाती त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्री आणि उर्जामंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि त्याच्यावर अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे. अशा व्यक्तीला अशी कंड्या पिकवायला (गॉसिप) वेळ कसा मिळतो? त्यामुळे मला आपल्या राज्याची चिंता वाटायला लागली आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
Edited by: Ratnadeep Ranshoor