शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जळगाव , शुक्रवार, 25 मार्च 2022 (21:28 IST)

लग्न जुळत नसल्याने तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनाच्या काळामुळे दोन वर्षांपासून लग्न सोहळे लांबणीवर पडले होते. पण आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे वयाची तिशी ओलांडत चालली तरी वधू मिळत नसल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन खरोटे (वय ३०) हा गेल्या काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणाने चिंतेत होता. अनेक वेळा त्याने त्याच्या मित्रांजवळ ही खंत देखील व्यक्त केली होती. यामुळे तो व्यसनाच्या ही आहारी गेला होता. अखेर चेतनने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
 
तसेच गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी चेतन खरोटे हा त्याच्या आईला वारंवार लग्न होत नसल्याचा तगादा लावीत होता. याच विवंचनेत असलेला चेतन गेल्या तीन दिवसांपासून व्यसनाच्या ही जास्त आहारी गेला होता. यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. ही संधी साधत चेतनने घर आतून बंद करून घेतले आणि घराच्या छतावरील कडी-कोंड्याला दोरी बांधून आपली जीवन यात्रा संपवली. बराच वेळ झाला तरी घरातून कुणी बाहेर येत नसल्यामुळे शेजार्‍यांना संशय बळावला. त्यांनी त्यांच्या आईला माहिती दिली. तेव्हा घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता चेतनने आत्महत्या केल्याचे आढळून आले.
 
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.