दरम्यान, लोकलचे चालक (मोटरमन) यांनी अचानक फुकारलेल्या संपाचा फटका ही प्रवाशांनाच बसला होता. कारण ते या संपाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणे पुढे करून मोटरमनच्या आंदोलनाची माहिती प्रवाशांपासून लपविली होती. त्यामुळे प्रवाशांना जी कसरत करावी लागली, ती त्यांच्या कायमचीच लक्षात राहणार आहे. काहींना ऑफिसातच रात्र काढावी लागली होती तर काहींना नोकरीवर पोहचण्याची व घरी येण्याची वेळ पाळता आली नव्हती.
मुळात लोकल गाड्यांची संख्या वाढत आहे व त्यांना हाकणारे 'सारथी' (मोटरमन) मात्र, आहे तेवढेच आहेत. त्यांना ओव्हरटाईम करून रेल्वेची वेळ काढून न्यावी लागत आहे. अशा स्थितीत अपघातांचे प्रमाण वाढणार नाही तर काय? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जाणे स्वाभाविक आहे.
या वर्षात ओव्हरहेड वायर वारंवार तुटणे व नादुरूस्त रेल्वेचे सांधे हे लोकलच्या झालेल्या लहान- मोठे अपघातास कारणीभूत आहे. या अपघातांमुळे 'वेळापत्रक' विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले होते. सीएटीत प्रवेश करणारी लोकल फलाटावर आदळणे, माटुंग्या दोन लोकलची टक्कर होणे तर ठाण्याच्या कोपरी पुलावरील पाण्याची पाईपलाईन मुंबईच्या लोकलवर कोसळून झालेल्या अपघातात दोन मोटारमनवर मृत्यू ओढविला होता. या अपघाताचा तपास अजून फाईलबंदच आहे.
एकूणात 2009 वर्ष हे 'मुंबई लोकल'सह मुंबईकरांचे 'टाइम' खराब करणारे वर्ष ठरले. आगामी येणार्या 2010 या वर्षात मुंबई लोकलसह मुंबईकरांच्या मागची 'ईडापिडा' जाओ अशीच आपण प्रार्थना करू या..!