साइनाने मलेशिया सुपर सिरीज, स्विस ओपन व इंडियन ओपनच्या क्वार्टर फायनल गाठली. तिच्या शानदार कामगिरीमुळे भारत सुदीरमन चषकात ग्रुप दोनपर्यंत मजल मारता आली. मात्र जूनमध्ये सिंगापूर ओपनमध्ये अंतिम आठमध्ये वांग लिनकडून साइनाला पराभव पचवावा लागला होता. मात्र इंडोनेशियामध्ये चायनीज प्रतिद्वंद्वीला धूळ चाखवत तिने पहिला सुपर सिरीज पुरस्कारावर नाव कोरले.
भारतीय अधिकारी व विश्व बॅडमिंटन महासंघाच्या 'कोल्ड वार'ची झळ मात्र साइनाला पोहचली व चीन मास्टर्स स्पर्धा तिला मुकावी लागली. त्यानंतर डेनमार्क व फ्रान्समध्ये झालेल्या सुपर सिरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचून तिने ऑक्टोबरमध्ये विश्व
मानांकनात सहावे स्थान पटकावले होते.
वर्षाच्या शेवटी साइनाने विश्व सुपर सिरीज मास्टर्सच्या सेमीफायनल गाठली होती. महिला एकेरी वर्गात तिने तिरंगा फडकविला तर मिश्र दुहेरीत ज्वाला व दीजू या जोडीने जेतेपद मिळविले.
वर्षाच्या शेवटी साइनाने लखनऊ येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यामुळे पुण्याच्या अदिती मुटाटकरला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. याशिवाय साइना यंदाच्या सीएनएन-आयबीएन 'स्पोर्ट्स पर्सन ऑफ द
इयर' ह्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
खेळ कुठलाही असो त्यात शारीरिक क्षमता व मनाचा कणखरपणा आवश्यक असतो. हे दोनही गुण साइनाच्या अंगी आहेत. ती दररोज सकाळी सहा वाजता बॅडमिंटनच्या कोर्टवर न चुकता हजर राहते. दुपारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर साडेतीनला ती पुन्हा कोर्टवर हजर आहेच. साइनाचे सर्व कुटुंब शाकाहारी आहे. परंतु जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या दृष्टीने तिच्यात स्टॅमिना यावा म्हणून तिने किमान अंडी तरी खावीत, असा सल्ला तिला तिच्या गुरुजींनी दिला होता. पण गंमतीचा विषय असा की, मांसाहाराची तिला अशी चटक लागली की, स्पर्धेसाठी ती एखाद्या शहरात गेली की, नॉनव्हेज खाणेच ती पसंत करते.
ऑगस्ट 09 मध्ये साइनाच्या अंगावर कांजण्या (चिकन पाक्स) उठल्या होत्या. त्यामुळे तिला काही काळ विश्रांती घ्यावी लागली. अशा लहान-सहाण समस्या वगळता साइनासाठी 2009 हे वर्ष मस्तच गेलं... साइनाला 'वर्ल्ड नंबर वन'ची बॅडमिंटनपटू बनायचे आहे.
त्यादृष्टीने ती मेहनत घेत असून तिची घोडदौड सुरू आहे. तिला तिच्या इच्छेप्रमाणे यश मिळो... हीच तिला नववर्षानिमित्त सदिच्छा!