सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (17:50 IST)

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. महाराष्ट्र सरकारनं 2023 मध्ये या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला.

नवीन बदलांनुसार, गेल्या वर्षीपासून 'सर्वसमावेशक पीक विमा योजना' राज्यात राबवण्यात येत आहे.
त्यानुसार, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.
यंदाच्या खरिप हंगामात 5 जुलैच्या सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यातील तब्बल 68 लाख 98 हजार 613 शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे.

गेल्यावर्षी राज्यातून एकूण 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, अशी माहिती कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण विनयकुमार आवटे यांनी बीबीसी मराठीला दिली आहे
खरिप हंगाम-2024 मध्ये योजनेत सहभागी होण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 ही आहे.
 
पीक विमा योजनेत सहभाग नोंदवताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी शेतकऱ्यांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रमुख 5 गोष्टी कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
 
1. सगळ्या कागदांवर सारखंच नाव असलं पाहिजे का?
पीक विमा योजनेत भाग घेणेसाठी आधार कार्ड, बँक खाते आणि सातबारा उतारा यावर नाव एकसारखे असणे आवश्यक असून यात किरकोळ बदल असल तरी विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

याबाबत स्पष्टीकरण देताना कृषी आयुक्तालयानं म्हटलंय की, "आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. पण सातबारा उताऱ्यावर कधीकधी नावात किरकोळ बदल असतो. असं असलं तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. नावात थोडासा बदल असल्यास हरकत नसेल, पण पूर्णनाव, आडनाव वेगळे असल्यास ते चालणार नाही."
 
नावात असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाईल आणि तपासणी अंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जावू नये, असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे.
 
2. पीक विमा योजनेत अर्ज करताना किती पैसे लागतात?
पीक विमा योजनेत शेतकरी स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठीचा अर्ज प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट pmfby.gov.in वर करता येतो.
याशिवाय सामायिक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातूनही शेतकरी अर्ज करू शकतात.
 
CSC केंद्रावर अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ 1 रुपया शुल्क देणं अपेक्षित आहे. प्रती शेतकरी 40 रुपये एवढे शुल्क विमा कंपनी CSC चालकांना देणार आहे.
 
पण, योजनेसाठी लागणारा सातबारा व 8-अ चा अद्ययावत उतारा शेतकऱ्यांनी स्वत: बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे. डिजिटल सहीचा सातबारा आणि 8-अ उतारा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या वेबसाईटवरुन काढता येतात.
 
सातबाऱ्यासाठी 15 रुपये, तर 8-अ उताऱ्यासाठी 15 रुपये एवढे शुल्क लागते.
अर्ज करताना शेतकऱ्यानं आधार कार्ड, बँक पासबुक फोटो, पीकपेऱ्याचं घोषणापत्रही सोबत बाळगणं आवश्यक आहे.
 
3. अधिकचे पैसे मागितल्यास तक्रार कुठे करायची?
याव्यरिक्त CSC चालक अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास याबाबतची तक्रार नोंदवता येते.
त्यासाठीचे संपर्क क्रमांक कृषी विभागानं उपलब्ध करुन दिले आहेत. तक्राराची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं विभागानं म्हटलं आहे.
टोल फ्री क्रमांक :- 14599/14447
व्हाट्सअप क्रमांक :- 9082698142
 
4. विम्यासाठी पिके नोंदवताना काय काळजी घ्यायची?
शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा उतरवावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर करण्यात येईल.
 
याआधी राज्यात काही ठिकाणी सरकारी जमिनीवर विमा उतरवल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
 
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऑगस्ट-2024 अखेरपर्यंत पूर्ण करावी. ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांनी शेतात जे पीक नोंदवलंय तेच विम्यासाठी ग्राह्य धरलं जाईल.
5. अर्ज केला म्हणजे विम्यासाठी पात्र ठरलात असं होत नाही, कारण...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ तुम्ही लाभास पात्र ठरलात असा होत नाही.
 
तुमच्या शेतमालाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास तुम्हाला 72 तासांच्या आत ती माहिती विमा कंपनीला द्यायची आहे.
 
त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का हे ठरवलं जाईल आणि मगच तुम्हाला नुकसानभरपाई दिली जाईल.

Published By- Priya Dixit