गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (09:31 IST)

31 मार्च : टॅक्स, आधार, पॅन, बँक अकाऊंट KYC विषयी या प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्या आहेत का?

money
31 मार्च म्हणजे भारतातला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. देशाचं बजेट दरवर्षी 1 एप्रिलपासून लागू होतं आणि ते सुरू होण्याआधी कंपन्या, बँका, व्यावसायिकांना वर्षाचा ताळेबंद किंवा आयकरासंबंधीची अनेक कामं पूर्ण करावी लागतात.
पण अगदी सर्वसामान्य व्यक्तींनाही 31 मार्चच्या आत काही गोष्टींची पूर्तता करावी लागते.
यंदा कुठल्या गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत, जाणून घ्या.
 
बँकेतील KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे का?
KYC म्हणजे Know Your Customer अर्थात बँक किंवा एखादी अर्थविषयक संस्था आपल्या ग्राहकांची ओळख पडताळणी करते, ती प्रक्रिया.
तुमचं बँक अकाऊंट आणि बँकेचे व्यवहार सुरळीत राहावेत, यासाठी KYC पूर्ण करणं गरजेचं आहे.
 
तुमच्या बँक अकाऊंटशी संबंधित KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली होती.
KYC पूर्ण करण्यासाठी तुमचं पॅन कार्ड, अॅड्रेस प्रूफ आणि इतर माहिती बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन भरू शकता.
ऑफलाईन KYC साठी तुमचं खातं ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या शाखेला भेट द्या. बँकेच्या वेबसाईटवरही तुम्हाला KYC कुठे अपडेट करायचं, याची लिंक मिळेल.
 
टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक केली का?
2022-23 या आर्थिक वर्षातील आयकरात सवलत मिळवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक करण्याचा 31 मार्च हा अखेरचा दिवस आहे.
तुम्ही 80C, 80D, 80G अशा इन्कम टॅक्स सेक्शन्समध्ये पात्र ठरलेल्या योजनांमध्ये दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून करात सवलत मिळवू शकता.
 
तुम्ही नोकरी करत असाल, तर 31 मार्चच्या आत फॉर्म 12BB तुमच्या कार्यालयात सबमिट करणं गरजेचं असतं. यात HRA, LTC, गृहकर्ज किंवा घरभाडं तसंच तुम्ही केलेली गुंतवणूक आणि आयकरासंदर्भातली अन्य काही माहिती असते. हा फॉर्म सबमिट केल्यानं तुम्हाला आयकरात सवलत मिळते.
 
PPF, NPS, SSY मध्ये किमान रक्कम भरली का?
तुम्ही PPF, NPS, and SSY मध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्या अकाऊंटमध्ये वर्षाला काही किमान रक्कम जमा करणं गरजेचं असतं.
त्यासाठीची मुदत 31 मार्च 2023 साली संपणार आहे. तुमच्या किंवा तुमच्या पती-पत्नीच्या किंवा मुलांच्या नावावर ही अकाऊंट असू शकतात.
NPS Tier I अकाऊंटमध्ये रुपये 1000 तर Tier II अकाऊंटमध्ये रुपये 250 किमान रक्कम म्हणून जमा करणं आवश्यक असतं.
पीपीएफ अकाऊंटमध्ये वर्षाला किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरणं आवश्यक असतं.
सुकन्या समृद्धी योजनेतही वर्षाला किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरू शकता.
 
अपडेटेड आयकर भरण्याचा शेवटचा दिवस
2022 सालच्या बजेटमध्ये केंद्र सरकारनं अपडेटेड आयटीआरची सुविधा आणली. त्यानुसार तुम्ही दोन वर्ष जुना आयकरही भरू शकता.
एखाद्या वर्षाचा आयकर भरणं राहिलं असेल किंवा त्यात दिलेल्या माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठीची ही एक संधी असते.
2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा अपडेटेड इन्कम टॅक्स भरण्यासाठी 31 मार्च 2023 हा अखेरचा दिवस आहे.
 
अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याचा अखेरचा दिवस
इन्कम टॅक्स सेक्शन 208 नुसार ज्यांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा आयकर भरावा लागतो, अशा व्यक्तींनी चार हफ्त्यांमध्ये हा कर आधीच भरणं गरजेचं असतं.
 
चौथा हफ्ता आणि आधीच्या तीन हफ्त्यांपैकी कुठला राहिला असेल तर ती रक्कम आणि त्यावरचं व्याज हे 31 तारखेपर्यंत भरणं अपेक्षित असतं. नोकरदार व्यक्तींच्या पगारातून ही रक्कम टीडीएससोबतच कट करणं गरजेचं आहे.
 
म्युचुअल फंड, डीमॅट अकाऊंटचं नॉमिनेशन
शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी डीमॅट अकाऊंट काढावं लागतं.
या अकाऊंटला तुम्ही कुणाला तरी नॉमिनी म्हणून जोडणं आवश्यक असतं किंवा तुम्ही कुणाला नॉमिनी ठेवत नसल्याचं डिक्लेरेशन जावं लागतं.
 
त्यासाठी सेबी या शेअर बाजारातल्या नियामक संस्थेनं दिलेली वाढीव मुदत 31 मार्च 2023 रोजी संपते आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नॉमिनेशन सबमिट केलं नसेल, तर तुमचं डीमॅट अकाऊंट इनअ‍ॅक्टिव्ह होऊ शकतं.
हीच गोष्ट म्युच्युअल फंडाचीही आहे. तुमची म्युच्युअल फंडात गुंतवणूक असेल तर तिथेही तुम्हाला 31 तारखेच्या आत नॉमिनेशन द्यावं लागेल किंवा कोणीही नॉमिनी नाही, हे डिक्लरेशन द्यावं लागेल.
 
नाहीतर तुमचा म्युच्युअल फंड फोलिओ फ्रीज केला जाईल.
 
आधार, पॅन कार्ड संबंधी दिलासा
तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडलं नसेल, तर त्यासाठीची मुदत आता 31 मार्चहून 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पण त्यासाठी भराव्या लागणाऱ्या एक हजार रुपयांच्या लेट फीमध्ये कुठलीही सवलत मिळणार नाहीये.
ही कार्ड्स लिंक केली नाहीत, तर तुमचं पॅनकार्ड इनअक्टिव्ह होऊ शकतं, असं इन्कमटॅक्स विभागानं म्हटलं आहे.
आधार आणि पॅन जोडण्यासाठीची माहिती आणि लिंक आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 
Published By- Priya Dixit