सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2024 (16:40 IST)

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

तुम्हाला तुमचा मतदानाचा अधिकार बजावायचा असेल तर मतदार यादीत तुमचं नाव असणं त्याचबरोबर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणं आवश्यक आहे.
 
यंदा लोकसभा निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार असाल, तर मतदार ओळखपत्र कसं काढायचं हे समजून घ्यायला हवं.
 
व्होटर आयडी कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र, हे एक फोटो ओळखपत्र आहे, जे दाखवून भारतातले नागरिक मतदान करतात. याला इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे EPIC म्हणूनही ओळखलं जातं.
 
पण हे कार्ड कसं काढतात? व्होटर आयडी कार्डसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येतो. पण त्यासाठी तुम्ही आधी काही अटींची पूर्तता करणं आवश्यक असतं.
 
मतदार ओळखपत्रासाठी या अटींची पूर्तता आवश्यक-
अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असायला हवी.
त्या व्यक्तीचं वय एक जानेवारी, एक एप्रिल, एक जुलै किंवा एक ऑक्टोबरला 18 वर्षं पूर्ण असायला हवं.
काही दिवसांच ते 18 वर्षांचे होणार असतील, तरीही ते अर्ज करू शकतात.
जिथे तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करायची आहे, तुम्ही तिथले रहिवासी असायला हवं.
 
व्होटर आयडी काढण्यासाठी सगळ्यांत आधी फॉर्म 6 भरावा लागतो. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी हा फॉर्म भरावा लागतो.
 
या अर्जासोबत तुम्हाला एक अलीकडचा पासपोर्ट साईझ फोटो, वयाचा आणि पत्त्याचा दाखला द्यावा लागतो. जे पहिल्यांदा व्होटर आयडी कार्ड काढतायत, ते जन्माचा दाखला, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचा दाखला ज्यावर जन्मतारीख लिहिली असते, असे डॉक्युमेंट्स जोडू शकतात.
 
निवडणूक आयोगानं यासाठी 'Others' म्हणून पर्यायही दिला आहे. म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथली काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही तुमच्या पत्त्यावर आलेलं एखादं पत्रही पुरावा म्हणून जोडू शकता.
 
पण बेघर नागरिकही हे व्होटर आयडी बनवू शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का?
 
त्यासाठी फॉर्म 6 भरून एक डिक्लेरेशन द्यावं लागतं. म्हणजे कोणी फुटपाथवर किंवा फ्लायओव्हर खाली राहात असेल तर त्याची माहिती ते देऊ शकतात.
 
त्यानंतर त्या विभागातले बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजे बीएलओ कमीत कमी तीनदा त्या जागेला भेट देऊन ती व्यक्ती त्याच ठिकाणी राहते की नाही याची खात्री करून घेतात. ही प्रक्रिया पार झाली तर अर्जदाराला सहज व्होटर आआयडी कार्ड मिळतं.
 
ऑफलाईन अर्जासाठी तुम्हाला फॉर्म 6 च्या दोन कॉपी हाती भराव्या लागतात. इलेक्‌टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा बीएलओ पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडून हा फॉर्म मोफत मिळतो.
 
त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही स्वतःच हा फॉर्म संबंधित इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर कडे जमा करू शकतात किंवा पोस्टानं पाठवू शकता. तुम्ही बूथ पातळीवरील अधिकाऱ्याकडेही हा फॉर्म देऊ शकता.
 
ऑनलाईन अर्ज कसा भराल?
ऑनलाईन अर्ज देणार असाल, तर तुम्हाला कुठल्या सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत, आणि तुमचं काम काही मिनिटांतच होईल.
 
घरबसल्या ऑनलाईन अर्ज देण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा. तिथं login/register या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
 
जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल, तर तुमचं यावर अकाऊंट असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मग Don't have account. Register as a new user या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
 
त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
डावीकडे सगळ्यात पहिला पर्याय, म्हणजे रजिस्टर अ‍ॅज न्यू एलेक्टर/वोटर वर क्लिक करा आणि फॉर्म 6 भरा, जो मतदार म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असतो.
फॉर्म उघडल्यावर राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, नाव, जन्मतारीख, सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता अशी माहिती आणि पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.
 
प्रूफ म्हणून जे कागदपत्र जोडणार आहात त्यावर क्लिक करा आणि त्याची कॉपी अपलोड करा.
 
मग स्क्रीननवर दिलेला कॅप्चा कोड टाका. फॉर्म प्रीव्ह्यू करायला विसरू नका, कारण एकदा सबमिट केल्यावर मग काही बदल करता येणार नाही.
 
सगळं ठीक असेल तर शेवटी सबमिटवर क्लिक करा.
 
सगळ्‌या गोष्टी नमूद केल्यावर तुमच्या मेलबॉक्समध्ये एक ईमेल येईल आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेजही येईल ज्यात अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर असेल. तो वापरून, तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस ट्रॅक करू शकता.
 
त्याशिवाय निवडणूक आयोगानं व्होटर हेल्पलाईन नावाचं एक मोबाईल अ‍ॅपही तयार केलंय, ज्यात व्होटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही याच सगळ्या प्रक्रियेद्वारा व्होटर आयडी कार्डसाठी अर्ज करू शकता.
 
ऑनलाईन अर्ज केला असेल तर बूथ लेव्हलचे अधिकारी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर जाऊन व्हेरिफिकेशन करतात.
 
व्होटर आयडी कार्ड हरवलं किंवा नाव-पत्ता बदलायचा असल्यास...
पहिल्यांदा हे ओळखपत्र तयार करताना ही सगळी प्रक्रिया आहे. पण काहीजण असे असतात ज्यांचं व्होटर आयडी कार्ड हरवलं आहे किंवा नाव, पत्ता अशा गोष्टी बदलायच्या आहेत.
 
त्यासाठी तुम्ही https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवरचा फॉर्म 8 डाउनलोड करू शकता आणि आवश्यक कागदपत्रांसह तो जमा करू शकता.
 
सगळ्या गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला कमीत कमी सात दिवसांनी व्होटर आयडी कार्ड मिळेल. अर्थात जास्तीत जास्त किती वेळ लागेल याची काही मर्यादा नाही.
 
तुमच्या मनात काही शंका असतील तर 1950 या नंबरवर कॉल करू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या नॅशनल ग्रिव्हन्सेन्स सर्विस पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकता.
 
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, मतदानाचा अधिकार नागरिकांचा असा अधिकार आहे, जो त्यांचपासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. (अपवादात्मक स्थितत तो काढला जाऊ शकतो.) मत देण्यासाठी व्होटर आयडी कार्ड असणं गरजेचं नाही.
 
सरकारनं अन्य अकरा ओळखपत्रांना मान्यता दिली आहे, ज्यातलं एखादं दाखवून तुम्ही मत देऊ शकता, पण त्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत असायला हवं.

Published By- Priya Dixit