गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

गुडफ्रायडे म्हणजे, प्रभू येशूचा बलिदान दिवस!

प्रभू येशू ख्रिस्त गुरूवारी रात्री आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे जेवण (लास्ट सपर) करत होते. त्यावेळी ते असे म्हणाले की, 'या ठिकाणी आपल्याबरोबर जेवत असलेली एक व्यक्ती माझ्याशी विश्वासघात करून मला माझ्या शत्रूच्या स्वाधीन करेल. मला माणसांच्या उद्धारासाठी बलिदान द्यावेच लागेल, पण त्या माणसाबद्दल मला वाईट वाटते. हे ऐकून 'स्कार्‍योती' खोलीच्या बाहेर गेला आणि थेट येशूला पकडण्याचे षडयंत्र रचणार्‍यांना जाऊन मिळाला. अवघ्या 30 चांदीच्या नाण्यांच्या मोबदल्यात त्याने हे कृत्य केले. येशूंना पकडण्यासाठी 'गेतशमनी' बागेकडे तो सैनिकांना घेऊन गेला. 
 
शुक्रवारच्या पाहिल्या प्रहरात पहारेकर्‍यांच्या जोड्यांचा आवाज व हत्यारांचा खडखडाट ऐकू येत होता. त्याच वेळी 'स्कारयोतीने काही रोमन शिपायांसमवेत व पहारेकर्‍यांना बरोबर घेऊन त्या 'गतेशमनी' बागेत प्रवेश केला. ते पाहून प्रभू येशूचे शिष्य घाबरले, व 'पॅट्रीक' नावाच्या शिष्याने तलवार काढली. त्यावर येशूने त्याला तलवार म्यान्यात ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, जे वार करतात तेच घातही करतात.' त्यावर स्कारयोती पुढे आला व त्याने येशूचे चुंबन घेतले. हे चुंबन विश्वासघाताचे होते. शिपाई येशूला घेऊन बंदी बनवून मुख्य पुरोहिताकडे गेले. तेथे त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवण्यात आला. धर्मसभेत प्रभू येशूंवर तीन दोष ठेवले. 
 
1. ही व्यक्ती देवाचा अनादर करते.
2. हे जेरुसलेमचे लोकांनी बांधलेले मंदिर पाडा मी ते पुन्हा बांधीन, असे तो म्हणतो.
3. हा स्वत:ला देवाचा पुत्र मानतो. हा सर्वात गंभीर आरोप होता
 
त्यावर महागुरूने त्यांना (येशूंना) विचारले, 'हे खरे आहे का?' त्यावर येशूने 'हो' असे उत्तर दिले. ते ऐकून महागुरूंनी आपले कपडे फाडले आणि सांगितले - आता कोणत्याही आरोपांची गरज नाही. मृत्यूदंड हीच या अपराधासाठी योग्य शिक्षा आहे. सकाळ होताच येशूला रोमन राज्यपाल पॉंटीयस पायलेटपुढे आणण्यात आले. 
 
आरोपांचा विषय धार्मिकतेतून राजकीय पातळीवर बदलला. हा आपल्या प्रजेला कर देण्याविरुद्ध भडकवतो, स्वत:ला ख्रिश्चनांचा राजा मानतो व विद्रोह करतो त्यावर पायलेटने त्यांना, 'तुला स्वत:च्या अपराधांविषयी काही सांगावयाचे आहे काय? असे विचारले. त्यावर येशू उद्गारले, 'मी नेहमी सत्याचाच प्रचार करतो.' पायलेटला कळले की ही व्यक्ती निर्दोष आहे त्यावर काइफ व त्याचे साथीदार ओरडून सांगू लागले की, 'सिझर शिवाय आमचा कोणी राजा नाही याला मृत्युदंड देण्यात यावा. पालटेने प्रभू येशूला वाचवण्याचे फार प्रयत्न केले. 
 
शेवटी त्याने मोठ्या जनसमुदायासमोर हा प्रश्न नेला. तत्कालीन कायद्यानुसार पवित्र सणाच्या दिवशी एका कैद्याला सोडण्यात येईल, असा नियम होता. त्यावेळी तुरूंगात खूनाच्या आरोपाखाली कैदेत असलेला बरबा नावाचा एक डाकूही होता. पायलेटने लोकांना थेट विचारले, की कुणाला सोडायचे बरबाला की येशूला? त्यावर तत्कालीन धर्ममार्तंडाच्या प्रभावाखाली असलेल्या जनसमुदायाने बरबाला सोडून द्यावे असे ओरडून सांगितले. आणि येशूला सूळावर चढविण्याची शिक्षा करण्यास सांगितले. आता पायलेटचा नाईलाज झाला 
 
रोमन सम्राट सीझरला आपल्याविषयी कुणी तक्रार करू नये वा येशूच्या मृत्यूचे बालंट आपल्या अंगावर येऊ नये म्हणून तो खुर्चीवरून उठला आणि त्याने हात धुतले व सांगितले, की मी ह्याला निर्दोष मानतो. याच्या मृत्यूचा दोष तुमच्या माथ्यावर आहे आणि त्याने येशूला मृत्युदंड देणार्‍यांच्या स्वाधीन केले. आरोप ठेवला दंगली भडकावण्याचा. 
 
शिपायांनी प्रभू येशूच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवला व त्याची टर उडवत त्याला म्हणाले की, 'हे ज्यू राजा तुला प्रणाम' आणि त्याच्या खांद्यावर लाकडाचे दोन जड बांबू ठेवून त्याला फटके देत 'सॅन्तोनियो' किल्ल्याच्या टोकावर घेऊन गेले. 
 
येशूचा अनन्वित छळ करण्यात आला. त्याच्या हातपायावर खिळे ठोकण्यात आले. डोक्यावर काटेरी मुकुट ठेवला. कुणी त्याच्या गालात थापडा मारल्या, कोणी त्यांच्या तोंडावर थुंकले. मानेवरचे जू खाली पडले की रोमन शिपाई त्यांना आसुडाचे फटके देत. एवढे करूनही येशूच्या मनी त्यांच्याविषयी क्षमाभावनाच होती. 'हे प्रभू यांना क्षमा कर हे काय करताहेत हे त्यांना कळत नाही.' असे म्हणून त्यांनी छळ करणार्‍यांना क्षमा करण्याची विनंती इश्वराजवळ केली. प्रभू येशूला सुळावर चढविल्यानंतर येशूने परमेश्वराला विचारले, 'हे परमपिता तुम्ही माझा का त्याग केलात?' त्या वर परमपित्याने (परमेश्वराने) तिसर्‍या दिवशी त्यांना परत जिवंत केले. आता दुपारचे दोन वाजले होते. माणसांना पापमुक्त करायचे काम येशूच्या बलिदानाने पूर्ण झाले होते. येशूने मोठ्या आवाजात पूर्ण झाले.' 
 
असे म्हणत डोके खाली झुकवून आपले प्राण परमात्म्यात विलीन केले व परमात्म्याला, 'माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो. असे म्हणताच मोठ्या मंदिराचा पडदा फाटला, सूर्याचा प्रकाश विरला, भूकंप झाले आणि प्राणार्पण केले. ही जयघोषाची वाणी ऐकून सैतान, मृत्यू, पाप पराजित झाले. आता जो त्यावर विश्वास ठेवेल तो उद्ध्वस्त न होता अनंत जीवन प्राप्त करेल. कारण या शुक्रवारी प्रभू येशूच्या बलिदानाने माणसाच्या मुक्तीची योजना पूर्ण झाली. म्हणून त्या दिवसाला 'गुड फ्रायडे' म्हणतात.