शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

हाज यात्रा

हाज यात्रेला मुस्लिम धर्मात मोठे महत्त्व आहे. या धर्माचा पाचवा पाया हाज यात्रा मानला जातो. मुस्लिमांचे पवित्र धर्मस्थळ मानली जाणारी मक्का व तिचा परिसर यांची यात्रा करणे याला हाज यात्रा असे म्हटले जाते.

प्रत्येक मुस्लिमाने त्याला आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तर आयुष्यात किमान एकदा तरी हाज यात्रा केलीच पाहिजे, असे मानले जाते. इस्लामी दिनदर्शिकेच्या आठव्या ते दहाव्या ( धुल ते हिज्जाल) या महिन्यांरम्यान ही यात्रा करतात.

या यात्रेची सुरवात हिजराच्या नवव्या शतकात झाली. प्रेषित पैगंबरांनी आपल्या तीनशे शिष्यांना या यात्रेसाठी पाठविले. त्यानंतर लगेचच दुसऱया वर्षी प्रेषित पैगंबर यांनी आपण स्वतः या यात्रेला जाणार असल्याचे जाहीर केले.

ही यात्रा त्यांनी पूर्ण करून वेगवेगळे विधी कसे करावेत याचा दंडक घालून दिला. ही यात्रा इतिहासात हजतूल विदा या नावाने प्रसिद्ध आहे. प्रेषितांच्या आयुष्यातील ही शेवटची यात्रा होती.

त्यानंतर प्रेषित पैगंबरांना तत्पूर्वी बावीस वर्षांपासून मिळत असलेले दैवी संदेश बंद झाले. ही यात्रा करताना अनेक बंधने पाळावी लागतात. हाताच्या बोटाची नखे रंगवलेली वा शरीरावरचा कुठलाही केस या काळात काढलेला चालत नाही.

यात्रेत पुरूष यात्रेकरूंना शरीर झाकण्यासाठी कापड दिले जाते. त्यातील एक कमरेवरील भागासाठी तर दुसरे त्याखालील भागासाठी असते. महिलांना मात्र त्यांच्या नेहमीच्या पण पूर्णपणे पायघोळ पोशाखात यावे लागते.

हाज यात्रा ही अत्यंत श्रद्धापूर्वक करण्याची बाब आहे. पाच दिवसांच्या प्रार्थनेचे (सलत) व रमझानमधील उपवसांचे महत्त्व या यात्रेला आहे. या यात्रेच्या काळात जगभरातील मुस्लिम मक्केत गोळा होतात.