1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 9 जून 2024 (10:24 IST)

भाजप की काँग्रेस, यंदाच्या निवडणुकीत महिलांनी कुणाला दिली पसंती?

भारतात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चं सरकार केंद्रात स्थापन होत आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान होत आहेत.
 
यंदाच्या निवडणुकीनंतर भारतीय मतदारांच्या कलाबाबत अनेक चर्चा होत आहेत. कुणालाही पूर्ण बहुमत न देता, युती-आघाडीचं सरकार स्थापन करण्याचाच निकाल मतदारांनी दिलाय. अशा निकालात तरुण मतदारांचा कशी भूमिका राहिली, याची उत्सुकता तुम्हा-आम्हाला सगळ्यांनाच असेल.
 
भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात तरुण मतदारांचा (विशेषतः 25 वर्षांखालील) निवडणुकीतील कल हा अत्यंत काळजीपूर्वक जाणून घेतला पाहिजे.
 
अटीतटीच्या निवडणुकीत तरुण मतदारांची मतं निर्णायक ठरू शकतात, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना तरुणांची मतं त्यांच्याकडे वळवायची असतात. तर या निवडणुकीत तरुणांनी नेमकी कुणाला पसंती दिली? हे आकडेवारीच्या मदतीने पाहूया.
 
आतापर्यंत काय घडलं?
2019 च्या निवडणुकीत 20 टक्के तरुण मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 2024 च्या निवडणुकीत हा आकडा फक्त एक टक्क्याने वाढला. त्यामुळे या निवडणुकीत तरुण मतदारांचा कौल काँग्रेसकडे होता, असं म्हणता येणार नाही.
 
भाजपच्या बाबतीत मात्र नेमकं याउलट घडलं, 2019 मध्ये भाजपला 40 टक्के तरुणांची पसंती होती. तुलनेने प्रौढ मतदारांच्या तुलनेत तरुणांनी भाजपला भरीव पाठिंबा दिला होता.
 
2024 च्या निवडणुकीत तरुणांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामध्ये फक्त थोडीशी घट झालेली दिसून येत आहे. 25 वर्षाखालील मतदारांमध्ये भाजपची एक टक्का घसरण झाली तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या 26 ते 35 वयोगटातील मतदारांमध्ये दोन टक्क्यांची घट झाली.
यंदा महिला मतदारांनी कुणाला पसंती दिली?
एकूणच भारतातील निवडणुकांमध्ये महिला मतदारांचं महत्त्व थोड्या प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे.
 
हे खरंय की, मागील काही वर्षांमध्ये निवडणुकीच्या राजकारणात महिलांनी महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. असं असलं तरी 2014 आणि 2019च्या तुलनेत यंदा महिलांनी भाजपला निर्णायक कल दिला आहे असं म्हणता येणार नाही किंवा हे सिद्ध करणारी कसलीच आकडेवारी नाही. आधीच्या तुलनेत महिलांच्या मतांमध्ये नक्कीच मोठी वाढ झाली आहे.
 
महिला मतदानाची आकडेवारी (मतदानाचा 7 वा टप्पा वगळता) 2019 प्रमाणेच पुरुष आणि महिलांचे मतदान, जवळपास समान प्रमाणात झाल्याचे सूचित करते.
 
वाचकांना हे लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मतदान केवळ 0.6 टक्क्यांनी कमी होते.
 
1990 मध्ये पुरुष आणि महिला मतदारांमध्ये जवळपास 10 टक्क्यांची तफावत होती. असं असलं तरी राष्ट्रीय पातळीवर महिलांनी निर्णायक प्रमाणात भाजपची निवड केली आहे असं दिसत नाही.
 
भाजपला महिलांचं सुप्त समर्थन असल्याचं नेहमी बोललं जातं, अनेक अभ्यासक आणि संस्थांना महिलांनी पुरुषांपेक्षा भाजपला जास्त मतदान केल्याचा समज झाला आहे पण, लोकनीती-सीएसडीएसकडून मतदारानंतर झालेल्या सर्वेक्षणात असं दिसून येत नाही.
 
आता 2024 मध्येच असं घडलं आहे का? तर नाही 2019 आणि 2014च्या निवडणुकीतही महिलांचा असाच कल दिसून आला होता.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत 37% पुरुष आणि 36% महिलांनी भाजपला मतदान केलं असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. यामुळेच भाजपविरोधात मतदान केलेल्या पुरुष आणि महिलांमध्ये एक टक्क्याच्या फरक पडला आहे.
 
दुसऱ्या बाजूला काँग्रेसला सातत्याने पुरुषांपेक्षा महिलांचा पाठिंबा जास्त असल्याचं दिसून येत आहे.
 
एनईएस (NES) च्या आकडेवारीवर आधारित विश्लेषण असं सूचित करतं की, 1990 च्या दशकापासून काँग्रेसला मतदान करणाऱ्यांमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये असलेला फरक कमी होत गेला. 2024 मध्ये तर काँग्रेसच्या मतदारांमध्ये महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.
 
2019 मध्ये भाजपला मिळालेल्या महाकाय बहुमतामागे लोककल्याणकारी योजनांची विशेषतः महिलांना लक्ष्य करून सुरु करण्यात आलेल्या उज्वला गॅस सारख्या योजनांची भूमिका महत्त्वाची असल्याचं बोललं गेलं. पण लोकनीती-सीएसडीएसच्या आकडेवारीवरून 2019 मध्ये देखील भाजप हा महिलांच्या पहिल्या पसंतीचा पक्ष आहे असं दिसून आलं नाही.
 
2024 मध्येही यात बदल झालेला नाही. महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये भाजपला येणाऱ्या अपयशाचं दोन पातळ्यांवर विश्लेषण करता येऊ शकेल.
 
एक म्हणजे 2014 पर्यंत भाजपच्या मतांची टक्केवारी मर्यादित होती आणि एकूण आकड्यांचा जरी विचार केला तर महिलांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं दिसून येत नाही. दुसरं कारण म्हणजे बऱ्याच काळापर्यंत भाजपकडे भारतीय समाजातील सामर्थ्यवान वर्गाचं समर्थन असणारा पक्ष म्हणून बघितलं गेलं त्यामुळे भाजपला मिळणारा सामाजिक आधार विस्कळीत होता. या दोन्ही कारणांचा संयुक्तपणे विचार केला तर आजवर पुरुषांच्या तुलनेत महिलांनी भाजपची निवड का केली नसेल हे कळू शकतं.
 
दुसऱ्या तक्त्यातील आकडेवारीवरून 2024 मध्येही या मतांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसून येतो.
 
विविध सामाजिक वर्गातील महिलांच्या राजकीय निवडीवरून, सुशिक्षित महिलांमध्ये भाजपला थोडा फायदा होत असल्याचं दिसतंय पण यात असणारा ग्रामीण-शहरी भेद अजूनही स्पष्ट नाहीये.
 
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 2024 च्या निवडणुकीतील महिला मतदारांच्या आकडेवारीवरून अजूनही भाजपकडे महिलांचा कल पूर्वीसारखाच दिसून येतो. असं असलं वेगवेगळ्या सामाजिक प्रवर्गांमध्ये, विशेषतः ग्रामीण, दलित आणि आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यात भाजपला यश मिळालं आहे.
 
(लोकनीती-सीएसडीएस तर्फे लोकसभेच्या 191 मतदारसंघांमध्ये पसरलेल्या 776 ठिकाणी मतदान झाल्यानंतर सर्वेक्षण केलं गेलं. भारतीय मतदारांच्या सामाजिक संरचनेचं राष्ट्रीय प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणाच्या नमुन्यातून केला आहे. या सर्वेक्षणासाठी घेण्यात आलेल्या मुलाखती मतदारांना प्रत्यक्ष भेटून करण्यात आलेल्या आहेत, बहुतांश वेळा मतदारांच्या घरी या मुलाखती घेतल्या गेल्या.)
 
Published By- Priya Dixit