शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (13:29 IST)

आसामची पहिलीच महिला बॉक्सर लव्हलिना बोरगोहाईं कोण

भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहाईंचा उपांत्य फेरीत पराभव, कांस्य पदकाची मानकरी लव्हलिना बोरगोहाईंला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावं लागलंय. तुर्कस्तानच्या हुसनाज सुरमेनेली हिनं उपांत्य फेरीत तिचा पराभव केला.
 
लव्हलिना बोरगोहाईंचा पराभव झाला असला, तरी पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेक कांस्य पदकाची कमाई करत तिनं मोठी कामगिरी केली आहे. बॉक्सिमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी लव्हलिना दुसरीच बॉक्सर आहे.
 
हुसनाज सुरमेनेली हिनं लव्हलिना बोरगोहाईंविरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा ठेवला. पंचांनी एकमतानं या सामन्यात तिला विजयी घोषित केलं.
 
उपांत्य सामन्यात चांगली कामगिरी करता आली नसल्यानं वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया लव्हलिनानं दिली आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये कांस्य पदकांची कमाई तिनं केली आहे. त्यामुळं सुवर्ण पदकासाठी तिचे प्रयत्न सुरू होते.
 
क्रीडा स्पर्धांमधील महिलांच्या कामगिरीबाबत बोलताना, यामुळं अनेक मुलींना प्रेरणा मिळू शकेल असं लव्हलिना म्हणाली. संध्या गुरुंग यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवण्यात यायला हवं, असंही ती म्हणाली.
 
कोण लव्हलिना बोरगोहाईं?
ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करून दाखवणारी लव्हलिना आसामची पहिलीच महिला बॉक्सर आहे. लव्हलिना ही 69 किलो वजनी गटातून खेळते.
 
चायनीज तैपेईच्या निएन चिन चेन नामक बॉक्सरला धूळ चारत लव्हलिनाने पुढील फेरीत प्रवेश केला होता.
 
चिन चेन ही माजी जागतिक विश्वविजेती खेळाडू आहे. तिने अनेकवेळा लव्हलिनाला पराभूत केलं होतं. 2018 च्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने लव्हलिनाला हरवलं होतं. पण आज (30 जुलै) लव्हलिनाने तिच्या पराभवाची परतफेड तर केलीच, शिवाय पदकावरही हक्क प्रस्थापित केला आहे.
 
लव्हलिनाला माईक टायसन आणि मोहम्मद अली यांच्यासारख्या बॉक्सर्सची शैली आवडते. पण कठोर मेहनतीच्या बळावर तिने स्वतःची एक वेगळी शैली विकसित केली आहे.
 
लव्हलिना बोरगोहाई ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते. ती आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारो मुखिया गावात राहते. तिचे वडील छोटे व्यापारी आहेत. तर आई गृहिणी. तिने खेळात आपलं करिअर बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय गरीब होती. पण त्या अडचणींना मागे टाकत तिने हे यश प्राप्त केलं आहे.
 
लव्हलिनाला आणि तिच्या दोन मोठ्या बहिणी मिळून एकूण तीन मुली त्यांच्या घरात होत्या. मोठ्या बहिणींप्रमाणेच लव्हलिनानेही किकबॉक्सिंग क्षेत्रात आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला.
 
हे पाहून त्यांना आजूबाजूच्या लोकांकडून विनाकारण टोमणे दिले जायचे. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून लव्हलिनाने खेळावर आपलं लक्ष केंद्रीत केलं.
 
लव्हलिनाच्या बहिणींनी राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये विजेतेपद पटकावलं पण लव्हलिनाचं स्वप्न त्याहून मोठं होतं.
 
ती प्राथमिक शाळेत असताना एका चाचणीदरम्यान प्रशिक्षक पादुम बोरो यांची नजर तिच्यावर गेली. तेव्हापासून म्हणजेच 2012 पासून तिचा बॉक्सिंगमधील प्रवास सुरू झाला.
 
पाच वर्षांच्या आतच लव्हलिनाने एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदकापर्यंत मजल मारली. नंतर मजल-दरमजल करत ती ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली.