1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (10:55 IST)

पुरुषांसाठीही येऊ शकते गर्भनिरोधक गोळी, ती कशी काम करणार?

sperm
पुरुषांसाठीही आता गर्भनिरोधक गोळ्या बाजारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगांमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत.
 
शास्त्रज्ञांना एक असा सेल पाथ वे किंवा स्विच सापडला आहे, ज्यामुळे शुक्राणूंची गती काही काळ मंदावते.
 
उंदरांमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसून आलं आहे की, या गोळ्यांमुळे शुक्राणूंची गती किमान काही तासांसाठी का होईना स्थिर होऊ शकते. स्त्रीबीजापर्यंत न पोहोचण्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे.
 
अर्थात, अजून बऱ्याच चाचण्या नियोजित आहेत आणि गरजेच्या आहेत. उंदरानंतर या औषधाचे प्रयोग थेट माणसांवर केले जाणार नाहीत. सशांवरही त्याचे प्रयोग केले जातील.
 
या औषधामागची कल्पना अशी आहे की, शारीरिक संबंधांच्या तासभर आधी ही गोळी घेतली जावी आणि तिचा परिणाम कधी ओसरतो याकडे लक्ष ठेवावं.
 
ही गोळी कशी काम करते?
महिलांना दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या या हार्मोन्सवर परिणाम करतात.
 
पुरुषांसाठीच्या गोळ्यांमध्ये एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे त्याचा परिणाम हार्मोन्सवर नाही होतं. म्हणजेच या गोळ्यांमुळे टेस्टोस्टेरॉनचं शरीरातील प्रमाण कमी होत नाही आणि पुरुष संप्रेरकांच्या कमतरतेमुळे होणारे साइड-इफेक्टसही होत नाहीत.
 
या गोळ्या शुक्राणांची 'पोहोण्याची क्षमता' कमी करताना सोल्युबल अॅडनेलिल सिक्लेज किंवा (sAC) या प्रोटीनवर काम करतात. प्रायोगिक तत्वावरील या गोळ्या sAC ला प्रतिबंध करतात.
 
यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या फंडातून यापूर्वीही उंदरांवर संशोधन करण्यात आलं होतं. त्याचे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रसिद्धही झाले होते.
 
या संशोधनामध्ये TDI-11861 नावाचं औषध वापरलं गेलं होतं. ते शारीरिक संबंधांपूर्वी, त्या दरम्यान आणि नंतरही काही काळ स्पर्म्सची गती थांबवायचं.
 
या औषधाचा परिणाम जवळपास तीन तास टिकून राहायचा. 24 तास उलटून गेल्यानंतर औषधाचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला असायचा.
 
न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिनमधील संशोधक डॉ. मेलनी बालबाख यांनी म्हटलं की, यातून साइड इफेक्ट नसलेल्या, वापरण्यासाठी सोप्या असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या निर्मितीबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला.
 
जर या गोळ्या माणसांवरही तितक्याच परिणामकारक सिद्ध झाल्या, तर पुरुष त्या केवळ जेव्हा गरज आहे तेव्हाच आणि त्याच प्रमाणात घेऊ शकतील. त्यासाठीचं काही ठराविक चक्र नसेल.
 
अर्थात, या गोळ्यांमुळे लैंगिकदृष्ट्या होणाऱ्या संक्रमणांपासून बचाव करू शकणार नाहीत, असा इशाराही तज्ज्ञ देतात. त्यासाठी कंडोम्सच लागणार.
 
युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डचे प्रोफेसर अॅलन पेसी सांगतात, "आतापर्यंत पुरुषांसाठी परिणामकारक, साइड इफेक्ट नसलेल्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हज बनविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, चाचण्या झाल्या, पण फारसं यश आलं नाही. त्यांपैकी कोणतंही उत्पादन बाजारात पोहोचू शकलं नाही."
 
"आताच्या संशोधनामध्ये स्पर्मच्या हालचालीसाठी महत्त्वाचं ठरू शकणाऱ्या एन्झायमवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. ही कल्पना नावीन्यपूर्ण आहे.
 
जर उंदरांवर करण्यात आलेले प्रयोग माणसांवर त्याच परिणामकारकतेने राबविले गेले, तर पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधकासंबंधीची आपली दिशा योग्य असल्याचंच स्पष्ट होईल."
 
दरम्यान, याच मुद्द्यावर इतरही संशोधन होत आहे आणि ते काहीशा वेगळ्या दृष्टिकोनाने यावर विचार करत आहेत. यामध्ये स्पर्मच्या पृष्ठभागावरील प्रोटीन ब्लॉक करण्यासंबंधीचे प्रयत्न केले जात आहेत.