रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (17:26 IST)

कोरोना अंत्यसंस्कार : सायन हॉस्पिटलमध्ये मृतदेहांच्या बाजूला कोव्हिड-19 रुग्णांवर सुरू होते उपचार कारण...

मयांक भागवतकाही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. त्यावरून विरोधकांनी सरकारवर कडाडून टीका केली होती. आपण पूर्ण तयारी करत आहोत, सर्वकाही अतिरिक्त प्रमाणात तयार करून ठेवतोय, असं सरकार सांगतंय. मग अशी परिस्थिती का ओढवली?
 
महाराष्ट्र सरकारने कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारावेळी पाच नातेवाईकांना स्मशानात उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे, पण कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईक मृतदेह नेत नाहीत आणि स्मशानातही उपस्थित राहत नाहीत. तर मृतदेह नेल्यास काही ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे भीतीचंही वातावरण आहे.
 
यासाठी बीबीसीने कोव्हिड-19 वॉर्डमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, कोरोनाग्रस्तांची ने-आण करणारे अॅंब्युलन्स चालक आणि स्मशानातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
'आम्हीच करतो अंत्यसंस्कार'
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने या मृतांवर अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीत केले जातात. स्मशानात काम करणाऱ्यांच्या माहितीनुसार अनेक वेळा अॅंब्युलन्समधून मृतदेह आणला जातो, त्यासोबत नातेवाईक नसतात. त्यामुळे स्मशानातल्याच लोकांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.
 
याबाबत बोलताना पश्चिम उपनगरातील स्मशानात काम करणारे राजू सांगतात, "कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या अत्यसंस्कारासाठी कोणीच येत नाही. एक-दोन प्रकरणात एखादा नातेवाईक येतो, पण स्मशानाच्या बाहेरच उभे राहतात. आत येत नाहीत. लोकांमध्ये या आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर भीती आहे. त्यामुळे अॅंब्युलन्समधून मृतदेह आल्यानंतर मृतदेहावर थेट अंत्यसंस्कार करण्यात येतात."
 
राजू पुढे म्हणतात, सरकारने नातेवाईकांना दुरून दर्शन घेण्याची परवानगी दिलीय. एरव्ही अंत्यसंस्कारासाठी आणि मृत व्यक्तीचं अंत्यदर्शन घेण्यासाठी स्मशानात लोकांची गर्दी पाहिली आहे. पण कोव्हिड-19 मुळे परिस्थिती पूर्णतः बदलली आहे.
 
लोक मृतदेह घेण्यास तयार का नाहीत?
सायन रुग्णालयाचा तो व्हीडिओ समोर आल्यानंतर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. पण नातेवाईकांनी मृतदेह नाकारणं, हे देखील या मागचं एक कारण असल्याचं समोर आलं.
 
याबाबत बोलताना सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश सकनुरे म्हणतात, "कोरोना झपाट्याने पसरणारा आजार असल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक बॉडी नेण्यासाठी येत नाहीत. मग त्यांना शोधावं लागतं.
 
"नातेवाईक आले नाहीत तर, मृतदेह शवाघरात न्यावा लागतो. त्याला काही प्रोटोकॉल आहेत. हे पाळावेच लागतात, यात वेळ जातो. त्यामुळे मृतदेहाला जमिनीवर न ठेवता बेडवर ठेवला जातो. त्याचसोबत, वॉर्डमध्ये दाखल इतर रुग्णांकडेही डॉक्टरांना लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे मृतदेह बेडवर ठेवण्यात येतात."
 
कोव्हिड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, लोक दुसरी बाजू ऐकून न घेताच आपला निष्कर्ष काढून मोकळे होतात. दिवसरात्र रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टरांसाठी एकीकडे टाळ्या वाजवतात. तर, दुसरीकडे त्यांना चूक नसतानाही दोष देऊन मोकळे होतात. पण त्यांची बाजू कोणीच ऐकून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.
 
"कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहाच्या बाजूलाच इतर रुग्णांवर उपचार करणं ही चुकीची गोष्ट आहे. पण कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर काही प्रोटोकॉल पाळावे लागतात. मृत पावलेल्या व्यक्तीचा अनादर होऊ नये म्हणून मृतदेह खाली ठेवण्यात येत नाही," असं डॉ. अविनाश पुढे म्हणतात.
 
त्यातच बरेचदा मृत व्यक्तीचे नातेवाईक क्वारंटाईन असतात त्यामुळे ही मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ते पुढे येऊ शकत नाहीत.
 
तर सायन रुग्णालयातील डॉ. विश्वदीप भालेराव म्हणतात, "रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडतंय. पण अशा परिस्थितीतही आम्ही 24 तास काम करतोय. डॉक्टरांची चूक काहीच नाही. मृतदेहाच्या बाजूला इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उद्या डॉक्टर उपचार देत नाहीत असाही व्हीडिओ काढून टाकला असता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करायचे का नाहीत, असे दोन्ही प्रश्न निर्माण होतात."
 
'परस्पर अत्यंसंस्काराला परवानगी देतात'
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात इन्फेक्शन कंट्रोल नर्स म्हणून आंकांक्षा बागवे काम करतात. नायर रुग्णालयाला मुंबई महापालिकेने कोव्हिड-19 रुग्णालय घोषित केलं आहे.
 
आकांक्षा बागवे म्हणतात, "नातेवाईक मृतदेहाजवळ येत नाहीत. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृतदेह स्वीकारत नाहीत. आम्ही मृतदेह नेणार नाही, तुम्हीच अंत्यसंस्कार करा, असं सांगतात. याचं कारण म्हणजे, कोरोनाबाबत लोकांच्या मनात असलेली प्रचंड भीती. आपल्याला संसर्ग होईल या भीतीने नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यासाठी पुढे येत नाहीत."
 
"आम्ही कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांचं समुपदेशन करतो. त्यांना रुग्णांना सोडून जाऊ नका, असं वारंवार सांगतो. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न करतो. पण अनेकवेळा नातेवाईक सापडत नाहीत. मग अशा परिस्थितीत पालिका या रुग्णांचे अंत्यसंस्कार पूर्ण करते. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईक पुढे न येणं ही वस्तुस्थिती आहे," असं आकांक्षा पुढे म्हणतात.
 
पण रुग्णालयात बेडवर मृतदेह का ठेवले जातात. त्यांच्या योग्य पद्धतीने काळजी का घेतली जात नाही? याबाबात विचारल्यानंतर त्या म्हणतात, "अॅंब्युलन्स, मृतदेह घेऊन निघाली की परत येण्यासाठी खूप उशीर होतो. स्मशानात मृतदेह एकापाठोपाठ एक आले की अॅंब्युलन्सला थांबावं लागतं. तोपर्यंत रुग्णालयात तीन मृतदेह प्लॅस्टिकमध्ये रॅपकरून तयार असतात. त्यामुळे मृतदेह वॉर्डमध्येच राहतात."
 
'भीतीपोटी लोक मदत करत नाहीत'
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरात 108 नंबरच्या अॅंब्युलन्स धावत आहेत. अॅंबुलन्समधून कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यात येतं. यातील एका अॅंब्युलन्स चालकाने लोकांमध्ये असलेल्या भीतीचा अनुभव सांगितला.
 
कोव्हिडग्रस्तांची ने-आण करणारे ड्राइव्हर नितीन मंचेकर आपला अनुभव सांगताना म्हणतात, "एकदा कॉलवर रुग्णाला नेण्यासाठी गेलो असता, अॅंबुलन्समध्ये चढतानाच तो इसम पडला आणि मरण पावला. पण मदतीला पुढे कोणीच आलं नाही. मलाच त्या व्यक्तीला उचलून अॅंबुलन्समध्ये ठेवावं लागलं. हा आजार भयानक आहे. लोकांना भीती वाटते आपल्याला इन्फेक्शन होईल याची."
 
राज्यात आणि मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. पण दुसरीकडे मुंबईत अॅंब्युलन्सची संख्या देखील कमी आहे.
 
नितीन सांगतात, "अॅंब्युलन्सची संख्या कमी आहे. एकदा रुग्णाला घेऊन गेल्यानंतर अॅंब्युलन्स पूर्ण सॅनिटाईज करावी लागते, त्यात वेळ जातो. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे."
 
दुसरा एक अनुभव नितीन सांगतात, "एकदा धारावीत एक वृद्ध रुग्णाला घेण्यासाठी गेलो होतो. त्यांना चालता येत नव्हतं. मी मदत मागितली. एक मुलगा पुढे आला, पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नको जाऊस, असं सांगितल्यानंतर तो मागेच राहिला. मलाच मग त्या रुग्णाला उचलून अॅंब्युलन्सपर्यंत आणावं लागलं."
 
मृतदेह ताब्यात घेतला आणि कोरोना झाला
एकीकडे, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार देतात. कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातच सोडून देतात. मृतदेहावर स्माशानात अंत्यसंस्कार होतानाही उपस्थित राहत नाहीत. तर दुसरीकडे मुंबई जवळच्या उल्हासनगर भागात मात्र कोव्हिड-19 संशयित रुग्णाच्या मृतदेहाला आंघोळ घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
धक्कादायक गोष्ट म्हणजे, कोव्हिड-19 संशयित रुग्णाच्या मृतदेहाला आंघोळ घालून अंत्यसंस्कार करणाऱ्या 10 नातेवाईकांना आता कोरोनाचा लागण झालीये. उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
कसा घडला हा प्रकार?
9 मे रोजी उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण कोव्हिड-19 संशयित असल्याने रुग्णालयाने घशाचा नमुना घेवून तपासणीसाठी पाठवला. कोव्हिड-19 संशयित असल्याने मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यास नकार दिला. मात्र, लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात येतील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांना सूपूर्द केला.
 
याबाबत बोलताना उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले, "कोव्हिड-19 ने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाला स्पर्श केल्याने कोरोना होण्याची शक्यता असते. कारण मृतदेह इन्फेक्शिअस असतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागते. मात्र या प्रकरणात नातेवाईकांचा बेजबाबदारपणा त्यांना कोरोनाची लागण होण्यासाठी कारणीभूत आहे. मृत रुग्णाच्या 10 कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. पालिकेने मृत रुग्णाच्या नातेवाईकांना शोधून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं आहे."
 
"मृतदेहापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोव्हिड-19 रुग्णाचा मृतदेह बॅगमध्ये बंद करून देण्यात येतो. नातेवाईकांनी ही बॅग उघडू नये अशी सूचना करण्यात येते. नातेवाईकांना मृतदेह ताब्यात द्यावा लागेल. मात्र, कुटुंबीयांनी असं बेजबाबदारपणाने वागू नये," असं पालिका आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले.
 
अंत्यसंस्कार पालिका-पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत
याबाबत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले, "कोव्हिड-19 संशयिताच्या मृत्यूनंतर मृतदेह नातेवाईकांना देता येणार नाही. खन्ना कंपाउंड परिसरातील घटनेनंतर कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार पालिका किंवा पोलीस यांच्या उपस्थितीत होतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देताना पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य माहिती देऊन मृतदेह ताब्यात देण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत."
 
अंत्यसंस्काराच्या गाईडलाईन्स काय आहेत?
राज्य सरकारने 13 मे रोजी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीच्या वेळी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी या सूचना सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पाठवल्या आहेत.
 
कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह घरी नेऊ नये
शववाहिनीतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा, नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवावं
नातेवाईकांना मृतदेहाच्या चेहऱ्याचं दर्शन घेण्यासाठी बॅग उघडू नये
मृतदेहाचं दर्शन एक मीटर अंतरावरून घ्यावं
धार्मिक विधी दुरून करण्याची परवानगी
मृतदेहाला आंघोळ घालणं, चुबंन घेणं, मिठी मारणं, तोंडात पाणी सोडणं या गोष्टींना प्रतिबंध
अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी एक मीटर अंतर सोडून उभं राहावं
मृतदेहापासून कोरोना पसरण्याची शक्यता
 
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रा. डॉ. शैलश मोहिते म्हणतात, "कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहापासून संसर्ग होऊ नये यासाठी मृतदेह प्लॅस्टिक बॅगमध्ये बंद करून पोलिसांना सूपूर्द करण्यात येतो. ही बॅग बंद असल्याने इंन्फेक्शन होण्याची भीती नाही.
 
"नातेवाईक भावनेच्या भरात मृतदेह उघडणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी मृतदेह थेट स्मशानात पाठवला जातो. मृतदेह उघडला आणि नातेवाईकांनी स्पर्श केला तर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते."
 
"मृतदेह पुरतानाही योग्य ती काळजी घेतली जाते. सहा ते आठ फूट खोल खड्ड्यात मृतदेह पुरला जातो. एकदा मृतदेह पुरला की त्यापासून संसर्ग होण्याची शक्यता नसते," असं डॉ. मोहिते पुढे म्हणाले.