मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (11:29 IST)

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी पाण्याखाली गेला आणि बुडून मेला

'शोले' चित्रपटातलं एक दृश्य आठवा! या चित्रपटात हेमामालिनीला मिळवण्यासाठी धर्मेंद्र पाण्याच्या टाकीवर चढतो. तिथूनच तो तिला लग्नाची मागणी घालतो. अखेरीस हेमामालिनीची मावशी त्या दोघांचं लग्न लावून देण्यास राजी होते.
 
आपलं प्रेम मिळवण्यासाठी प्रियकर आकाश-पाताळ एक करतात. प्रेयसीचा होकार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती, विविध फंडे आजमावले जातात. हा क्षण अविस्मरणीय व्हावा यासाठी विमान, जहाज, हॉट एअर बलून अशा हटके ठिकाणी प्रपोज केलं जातं. त्यानंतर आपल्या मित्रवर्गाला या गुलाबी प्रेमातल्या प्रपोजच्या कहाण्या रंगवून सांगितल्या जातात.
पण असा वेगळा प्रयत्न करून प्रेयसीला प्रपोज करताना एखाद्याचा जीव गेल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? अमेरिकेतील लुसियाना प्रांतात बॅटोन रॉग इथं राहणाऱ्या एका तरूण प्रियकराच्या बाबतीत अशीच एक दुर्दैवी घटना घडलीये. गर्लफ्रेंडला अंडरवॉटर प्रपोज करण्याच्या नादात त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
 
स्टीव्हन वेबर असं मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचं नाव आहे. स्टीव्हन आणि त्याची गर्लफ्रेंड केनेशा अँटोइन सुट्ट्या घालवण्यासाठी पूर्व आफ्रिकेतील टांझानियाला गेले होते. तिथल्या पेंबा बेटाजवळ मँटा रिसॉर्टमध्ये ते राहत होते.
 
हाती आलेल्या दृश्यांमध्ये स्टीव्हन अंडरवॉटर जाऊन केनेशाला लग्नासाठी मागणी घालताना दिसतोय. स्टीव्हन पाण्यात उतरून रिसॉर्टमध्ये अंडरवॉटर असलेल्या खोलीच्या खिडकीजवळ जातो. तिथूनच तो केनेशाला लग्नाची मागणी घालणारं एक पत्र दाखवतो.
पण यानंतर स्टीव्हन पाण्याबाहेर आलाच नाही, असं केनेशाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
 
बीबीसीने याबाबत द मँटा रिसॉर्टशी संवाद साधला. "द मँटा रिसॉर्टमध्येच स्टीव्हन पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले. ही 19 सप्टेंबर 2019 ची घटना आहे. असं घडणं अत्यंत दुर्दैवी आहे," असं त्यांनी सांगितलं.
 
रिसॉर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्थ्यू सॉस सांगतात, "स्टीवन वेबर यांच्या मृत्यूने आम्हाला सगळ्यांनाच हादरवलं आहे."
 
स्टीव्हन आणि केनेशा यांनी चार दिवसांसाठी रिसॉर्टमधली अंडरवॉटर रूम बुक केली होती. किनाऱ्यापासून ही रुम 250 मीटर दूर आहे. या रुमचं भाडं एका दिवसासाठी सुमारे 1700 डॉलर इतकं आहे.
त्यांच्या मुक्कामाच्या तिसऱ्या दिवशी स्टीव्हन यांनी केनेशाला प्रपोज करण्यासाठी पाण्यात डुबकी घेतली. गॉगल तसंच फ्लिपर घालून ते पाण्यात उतरले. लग्नाची मागणी घालणारा संदेश त्यांनी सोबत घेतला होता. हे पत्र त्यांनी केनेशाला खिडकीतून दाखवलं. केनेशानेही ते वाचले.
 
त्याच्या पत्रात लिहिलं होतं, "माझं तुझ्यावर किती आणि कसं प्रेम आहे, हे व्यक्त करण्यासाठी मी माझा श्वास जास्त वेळ रोखू शकत नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझं प्रेम आहे आणि हे प्रेम दिवसेंदिवस वाढतच राहील."
 
पुढे त्या व्हीडिओमध्ये स्टीव्हन केनेशाला अंगठी दाखवतानाही दिसतो. त्यानंतर तो खिडकीजवळून निघून जातो.
 
सॉस सांगतात, "स्टीव्हन बुडाल्याचं कळल्यानंतर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
 
स्टीव्हनला आपल्या गर्लफ्रेंडचं उत्तर ऐकायला मिळालंच नाही. 'मी त्याला लाखवेळा होकार दिला असता,' असं केनेशाने आपल्या भावनिक फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय.
 
तिने लिहिलं, "आम्हाला मिठी मारता आली नाही. आमच्या पुढच्या आयुष्याची सुरूवात असणारा तो क्षण आम्हाला साजरा करता आला नाही. आमच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय दिवस सर्वात वाईट दिवस बनला. नशीबाने इतकं क्रूर वळण का घेतलं?"
"आमच्या 'बकेट लिस्ट'मधल्या बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांत आम्ही केल्या होत्या. आम्ही आनंदी होतो. भावी आयुष्याबाबत आम्ही उत्सुक होतो."
 
आपल्या देशातील नागरिकाचा टांझानियात मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. "या तरूणाच्या मृत्यूचं आम्हाला दुःख आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतो. त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल," असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.