बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (12:11 IST)

दिल्लीत आरोग्य आणीबाणी: वायुप्रदूषणामुळे असा कोंडतोय राजधानीचा श्वास

- रोहन नामजोशी
2017 मधली एक दुपार. सगळीकडे धुरकं पसरलं होतं. सगळीकडे दिल्लीतल्या प्रदूषणाची चर्चा सुरू होती. श्वास कोंडल्यासारखा वाटत होता. वाईट गोष्टींचंही नावीन्य असतं, त्याप्रमाणे परिस्थिती वाईट असली तरी अनुभव थोडा वेगळा होता. मी मेट्रोतून उतरून घरी जायला निघालो. ऑटोवाल्याला बिचकत सांगितलं की "जरा हळू चालव". पण ग्राहकांचं ऐकतील ते ऑटोवाले कसले. त्यांनी ऑटो दामटला.
 
आम्ही ज्या रस्त्यावरून जात होतो, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाला होता. अचानक धुरक्यातून एक म्हैस धावत ऑटोसमोर आली. आता आपलं काही खरं नाही, असं वाटत असतानाच ऑटोवाल्याने कसंतरी माझा जीव वाचवला! म्हैस निघून गेली. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. साधं दिसणारं धुरकं किती प्रकारे धोकादायक असू शकतं, याचा प्रत्यय आला.
 
नवरात्र सुरू झाली की दिल्लीत थंडीची चाहूल लागते. वातावरणात गारवा पसरलेला असतो. जीवघेण्या उकाड्यातून सुटका मिळालेली असते. त्यामुळे दिल्लीकर सुखावले असतात. दिवाळीचे वेध लागले असतात आणि प्रदूषणाच्या बातम्या यायला सुरुवात होते.
 
दिवाळी जवळ आली की तमाम दिल्लीकरांच्या काळजात धडकी भरते. पंजाब आणि हरियाणात गहू वा अन्य पिकांचे बुडखे जाळून शेतजमिनीच्या भाजणीचा हंगाम सुरू होतो, तेव्हाच वायव्येकडून दिल्लीत येणारे थंड वारे वाढू लागतात. म्हणजे पंजाब- हरियाणातून आलेली हवा धूरच वाहून आणते.
 
त्याचवेळी दिल्लीत हलकं धुकं पसरण्यास सुरुवात झालेली असते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे दिल्लीची हवा प्रचंड प्रदूषित होते. त्यात हौशी दिल्लीकर दिवाळीत प्रचंड फटाके फोडतात. त्यामुळे या त्रासात आणखी भर पडते. परिणामी दिल्लीचा श्वास कोंडला जातो.
 
दिवाळी सुरू झाली की दिल्लीकरांचा दिवस आधी हवेचा वेध घेऊन होतो. दिवाळी संपते तशी तशी हवा आणखी खराब होत जाते. वातावरणात धुरक्याची दाट चादर पसरल्यासारखी वाटते. ही चादर गडद होत जाते. अगदी समोरचंही नीट दिसत नाही. वातावरण उदास होतं. सूर्य उगवलेला असतो पण त्यावरही धुरकं दिसतं. त्यामुळे एखाद्या चित्रपटात फ्लॅशबॅकमध्ये दाखवतात तसं धुसर वातावरण दिल्लीत बघायला मिळतं.
 
हे प्रदूषण मोजतात कसं, याची सामान्यतः लोकांना माहिती नसते. हो, मोठमोठे आकडे दरवर्षी समोर येत असतात... 300, 500, 700 वगैरे. ते काय असतात?
 
प्रदूषण मोजतात कसं?
Air Quality Index या मापकाद्वारे हवेचा दर्जा ठरतो. विविध वायूंचं प्रमाण एकत्रित करून हा index काढला जातो. PM10, PM2.5 अशा धुळीच्या कणांमुळे वायुप्रदूषण होतं. या घटकांचं वाऱ्यात प्रमाण किती, यावरून धोक्याचा अंदाज येतो.
 
मुख्यत: PM 2.5 या घटकामुळे हवा प्रदूषित होते. हे प्रमाण 90च्या कमी म्हणजे हवा चांगली असते. त्यापेक्षा जास्त म्हणजे धोक्याची पातळी वाढायला सुरुवात होते.
 
सध्या AQI 400 ते 700 दरम्यान आहे. हा आकडा अगदी 900 पर्यंतही जातो. त्यामुळे परिस्थितीची कल्पना करूनच अंगावर काटा येतो. ही पातळी साधारणपणे 300च्या खाली क्वचितच येते. त्यामुळे शुद्ध हवेसाठी दिल्लीकरांचा झगडा वर्षंभरच असतो, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
 
दिल्ली शहराला प्रदूषणाचा विळखा काही नवीन नाही. तो कमी करण्यासाठी CNGवर धावणाऱ्या बसेस, ऑटो आणि गाड्या, संपूर्णतः इलेक्ट्रिक मेट्रो, असे अनेक उपाय योजण्यात आले आहेत. मात्र वाढती लोकसंख्या, रस्त्यांवरील वाढती वाहनं, अनियमित कारखान्यांमधून निघणारा धूर, अशा अनेक गोष्टींमुळे प्रदूषण कमी व्हायला तयार नाही.
 
आरोग्याला जबर धोका
या प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांत दिल्लीकरांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. सकाळी उठलं की उत्साही वाटत नाही. कामाला निघालं की पांढुरकं वातावरण असतं, थोडंसंही चाललं तरी छातीत भरून आल्यासारखं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे चुरचुरतात.
 
सामान्य आरोग्य असलेली व्यक्ती एक किलोमीटरपेक्षा जास्त चालू शकत नाही. त्याबरोबरच खोकला, नाक वाहणे, घसा खवखवणे हे विकार सुरू होतात. काही व्यक्तींना सौम्य डोकेदुखीचा त्रासही होतो. सतत थकवा जाणवतो. दमा आणि श्वसनाचे विकार असलेल्या लोकांची अवस्था आणखीच वाईट असते. लहान बालकं आणि नवजात अर्भकं, यांचं काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही.
 
शुक्रवारी धुरक्यामुळे वाढलेला धोका पाहता दिल्ली सरकारने 5 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यास सांगितल्या आहेत. राजधानीत आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली असून अरविंद केजरीवाल सरकार लोकांना बचाव करणारे मास्क वाटप करत आहे.
 
इतर गमतीजमती
कोणत्याही चांगल्या-वाईट गोष्टीचा उत्सव करणं, हे भारतीयांचं अंगीभूत लक्षण आहे. मग प्रदूषणाचा विषय तरी त्यात कसा मागे राहणार?
 
दिल्लीतले लोक मुळातच हौशी. त्यामुळे प्रदूषणाच्या या दिवसात मास्कचा उद्योगधंदा जोरात असतो. आधी काळ्या किंवा पांढऱ्या रंगात असलेले मास्क आता रंगीबेरंगी होऊ लागले आहेत. ते मास्क घालून सेल्फी काढणं, धुरकट हवेचे फोटो सोशल मीडियावर टाकून धडकी भरवणं, हे प्रकार सर्रास सुरू असतात.
 
यातला गंमतीचा भाग सोडला तर या काळात डॉक्टरकडच्या रांगेतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. श्वसनाचे विकार आणि चित्रविचित्र आजारांमुळे दिल्लीकर हैराण झालेले असतात. घरोघरी त्याच विषयावर चर्चा सुरू असतात. बातम्या पाहून नातेवाईकांचे काळजीयुक्त फोन ठरलेलेच.
 
प्रदूषण कमी झाल्यावरही काळजीयुक्त स्वर राहतो आणि दिल्ली जगण्यास लायक नाही, असा निष्कर्ष काढला जातो. खरंतर दिल्ली इतकी वाईट नाहीच. मात्र प्रदूषणाचा त्रासाने सध्या दिल्लीकर वैतागलेत. धुरक्याची उदासवाणी छाया कधी दूर होईल, याचीच दिल्लीकर वाट पाहत आहे.