गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 24 जून 2020 (09:30 IST)

भारत-चीन सीमावाद : संघर्ष क्षेत्रातून सैन्य माघारी घेण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत

India-China border dispute
पूर्व लडाखमधील सगळ्या संघर्ष क्षेत्रांमधून आपले सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये एकमत झालं आहे. सोमवारी दोन्ही देशांतील वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुमारे 11 तास चालली. या बैठकीत सैन्य माघारीबाबत निर्णय घेण्यात आला.
 
भारत आणि चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गलवान खोरे परिसरात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांत तणाव प्रचंड वाढला होता. 15 जूनच्या मध्यरात्री झालेल्या या संघर्षात 20 भारतीय जवान मृत्युमुखी पडले होते.
 
दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्याचा निर्णय झाला असला तरी टप्प्याटप्प्याने किती कालावधीत सैन्य माघारी घेण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
 
भारताकडून या बैठकीत 14 व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी नेतृत्व केले तर मेजर जनरल लिऊ लिन यांच्या नेतृत्वाखाली चीनने चर्चेत सहभाग नोंदवला.