शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (09:13 IST)

उद्धव ठाकरेंमुळे नरेंद्र मोदींची मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडलीय का?

नरेंद्र मोदींनी 2017 साली मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं उद्घाटन केलं. 5 वर्षांत या बुलेट ट्रेनचं काम रुळावर आहे की तिला रेड सिग्नल लागलाय? मुंबईच्या बुलेट ट्रेनची खुशखबर कधी येणार?
 
भारताला बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवण्याचं श्रेय पंतप्रधान मोदींना जातं. 2017 साली जपानबरोबर एक महत्त्वाकांक्षी करार करून मोदींनी मुंबई अहमदाबाद या दोन व्यापारी शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारतीय रेल्वेनेही कंबर कसली, "15 ऑगस्ट 2022 पर्यंत मुंबई - अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेचं काम पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील" अशी घोषणा रेल्वेने केली. पण पाठोपाठ नीती आयोगाने म्हटलं की हा प्रकल्प 2023 सालापर्यंत पूर्ण होऊ शकतो. काय आहे बुलेट ट्रेनचा स्टेटस रिपोर्ट?
 
महाराष्ट्र सरकारमुळे मुंबईची बुलेट ट्रेन रखडली?
2020 साली ईस्ट जपान रेल्वे कंपनीने भारतात रुळावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा पहिला फोटो प्रकाशित केला. E5 सीरिजची शिंकानसेन बुलेट ट्रेन भारतात येणार असं कंपनीने सांगितलं.
 
20 मे 2022 ला रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल ट्वीट करत माहिती दिलीय आणि व्हीडिओंच्या माध्यमातून कामाची प्रगतीही दाखवलीय.
 
5 मे पर्यंत झालेलं काम या व्हीडिओत दिसतं. पण हा व्हीडिओ नीट पाहिलात तर त्यात फक्त गुजरातमधल्या कामाचीच माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या हद्दीतलं काम झालं नाहीय, की त्याची माहिती सरकारने दिली नाहीय? या व्हीडिओमध्ये काम कधीपर्यंत पूर्ण होईल याचाही काही उल्लेख नाही. पण हे व्हीडिओ नीट पाहा बरंका, मग तुमच्या लक्षात येईल की 2023 पर्यंत ही बुलेट ट्रेन धावू शकेल असं वाटत नाही. प्रकल्पाला विलंब होण्यामागे काय कारणं आहेत हे जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला.
 
कोरोनाचं संकट आणि भूसंपादनात झालेला उशीर यामुळे हा प्रकल्प रखडल्याचं जाणकारांचं सांगणं आहे. आतापर्यंत जी माहिती हाती लागतेय त्यावरून असं कळतं की डिसेंबर 2020 पर्यंत महाराष्ट्रात भूसंपादनाचं जितकं काम होणं अपेक्षित होतं ते झालं नाही. रेल्वे बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी तेव्हा म्हटलं होतं, "पुढच्या चार महिन्यांत महाराष्ट्र सरकारने 80% भूसंपादन करण्याचं आश्वासन दिलं आहे."
म्हणजे महाराष्ट्र सरकारने भूसंपादनासाठी एप्रिल 2021 ची मुदत ठरवली होती. मे 2022 पर्यंत महाराष्ट्रात 71% भूसंपादन पूर्ण झालंय आणि गुजरातमध्ये 98%.
 
हे काम इतकं संथगतीने का सुरू आहे? खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनबद्दल फेब्रुवारी 2020 मध्ये 'सामना' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "शेतकऱ्याच्या जमिनीही काढायच्या आणि हे पांढरे हत्ती पोसायचे हे काही योग्य नाही. बुलेट ट्रेनबद्दल सगळ्यांबरोबर बसून विचार व्हायला पाहिजे. याचा खरंच कुणाला उपयोग होणार आहे? तो जर उपयोगाचा असेल, पटवून द्या, आपण जनतेसमोर जाऊ आणि करू आपण प्रकल्प."
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आम्ही फेरविचार करू असं मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते. भाजपने आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावरून ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. कारण फडणवीसांनीच मोदींना गळ घातली होती की उद्घाटन भूमीपूजन अहमदाबादेत झालं आता ट्रेनचं उद्घाटन मुंबईत येऊन करा.
 
2022 मध्ये मोदींचा आजवरचा पाचवा जपान दौरा सुरू असताना या प्रकल्पाचं काम केवळ 17 टक्के पूर्ण झालंय. 'आज तक'ने ही बातमी RTI मधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर दिलीय. 1 फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या कामाची ही माहिती आहे.
 
पण पंतप्रधान अजूनही या प्रकल्पाबद्दल सकारात्मक आहेत. 18 फेब्रुवारीला एका व्हर्चुअल कार्यक्रमात बोलताना मोदींनी म्हटलं होतं की बुलेट ट्रेन पूर्ण करणं ही त्यांची प्राथमिकता असेल.
 
हा प्रकल्प भारत आणि जपान यांच्या सहकार्यातलं एक महत्वाचं पाऊल आहे. बुलेट ट्रेनसाठी भारताने जपान सरकारबरोबर एक करार केला. जपानने 88,000 कोटी रुपयांचं कर्ज 50 वर्षांच्या मुदतीवर फक्त 0.01% व्याजाने दिलं. 2014-15 साली जेव्हा वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा याचा अंदाजित खर्च 98 हजार कोटी रुपये होता. 2020 सालापर्यंत हा खर्च वाढून 1 लाख 10 हजार कोटी रुपये इतका झालाय.
 
2020 नंतर कोरोना, जागतिक मंदी, महागाई आणि इतर घटकांचा विचार करता हा खर्च आणखी वाढलाच असेल असं तज्ज्ञ सांगतात.
 
रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य श्रीप्रकाश यांनी बीबीसीला सांगितलं, "500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर किमान 5 वर्षांचा अवधी लागतो. जर पुढच्या दोन वर्षांत भूसंपादन पूर्ण झालं तर सन 2029-30 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. प्रकल्पाचा खर्चही साधारण 60 टक्क्यांनी वाढून 1 लाख 60-70 हजार कोटींच्या घरात पोहोचेल."
 
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातले मतभेद पाहता अशीही शक्यता व्यक्त केली जातेय की गुजरातच्या हद्दीतलं काम आधी पूर्ण होऊन रेल्वे रुळावर उतरवली जाईल. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सन 2026-27 पर्यंत सूरत आणि बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू होतील.
 
पण श्रीप्रकाश म्हणतात, "असं झालं तर बुलेट ट्रेन भारतात आणण्यामागे जो विचार आहे तोच पराभूत होईल. या माध्यमातून पंतप्रधानांना दोन राज्यांमधली दोन व्यापारी शहरं जोडायची आहेत. तसंही अहमदाबाद आणि सूरतदरम्यान रस्ते आणि रेल्वे प्रवासाच्या चांगल्या सोयी आधीपासूनच आहेत की."
 
गोळीच्या वेगाने जाणारी ही गाडी हे दशक संपेपर्यंत रुळावर उतरेल की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच.