शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (16:18 IST)

ISWOTY: महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत मिळते केवळ एक तृतीयांश प्रसिद्धी : बीबीसी रिसर्च

खेळांबद्दलच्या बातम्यांचा विचार केला, तर महिला खेळाडूंना दिली जाणारी प्रसिद्धी ही पुरुष खेळाडूंच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षाही कमी असते, असं बीबीसीनं केलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.
 
2017 ते 2020 या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या दोन हजारहून अधिक बातम्यांचं विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. महिला खेळाडूंशी संबंधित बातम्यांपैकी केवळ 1 टक्का बातम्यांनाच पहिल्या पानावर जागा मिळते.
 
माध्यमांमध्ये महिला खेळाडूंना दिलं जाणारं महत्त्व
2017 मध्ये 10 बातम्यांपैकी केवळ एकच बातमी ही महिला खेळाडूबद्दलची होती. अर्थात, 2020 हे वर्ष उजाडेपर्यंत परिस्थिती बरीच बदलली होती. मात्र या काळातील वार्तांकनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतारही दिसून येत होते. त्याचं एक कारण म्हणजे नेहमी होणाऱ्या ऑलिम्पिक्स, कॉमनवेल्थ गेम्स, टेनिसच्या स्पर्धा किंवा बॅडमिंटन लीगसारख्या मोठ्या स्पर्धांच्या घोषणा. या स्पर्धांबद्दलच्या वार्तांकनामध्ये महिला खेळाडूंना जागा मिळायची.
 
उदाहरणार्थ- कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव जगभरात होण्यापूर्वी पुढची ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा टोक्यो इथे होईल, अशी चर्चा होती. त्यानंतर ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धा तसंच नवनवीन विक्रम याच्या बातम्या येऊ लागल्या.
 
दुसरं उदाहरण म्हणजे ICC महिला टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं. 2020 च्या सुरूवातीला झालेल्या या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. शफाली वर्माची कामगिरी वर्ल्ड कपमध्ये गाजली होती.
 
तिच्या विक्रमी कामगिरीची दखल घेत अनेक वर्तमानपत्रांनी 'शफाली वर्मा कोण आहे?' आणि 'शफालीपासून आम्हाला प्रेरणा मिळते' अशा हेडलाइन्स करत वेगवेगळ्या बातम्या केल्या होत्या.
 
कोणत्या खेळाला दिलं जातं सर्वाधिक प्राधान्य?
महिला खेळाडूंबद्दलच्या बातम्यांचा विचार केला तर टेनिस या खेळाला इतर खेळांच्या तुलनेत अधिक प्राधान्य दिलं जात असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्याखालोखाल बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग या खेळांचा क्रमांक आहे.
 
पीव्ही सिंधू, सानिया मिर्झा, सायना नेहवाल आणि मेरी कोमसारख्या महिला खेळाडूंना पहिल्या पानावर तसंच क्रीडाविषयक पानावरही प्रामुख्यानं स्थान दिलं जातं. विशेष म्हणजे संघात खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षाही एकट्यानं खेळणाऱ्या महिला खेळाडूंना अधिक प्रसिद्धी मिळते.
 
बीबीसीनं केलेल्या संशोधनातून समोर आलं की, 50 टक्के बातम्या या एकट्या खेळणाऱ्या महिला खेळाडूंच्या होत्या, तर 21 टक्के बातम्यांमधून महिला आणि पुरुष खेळाडूंना स्थान दिलं गेलं होतं.
 
वार्तांकनाचा दर्जा
क्रीडाविषयक पानावर पुरुष खेळाडूंच्या बातम्या अधिक ठळकपणे छापलेल्या असतात. त्यांचे फोटोही आकर्षक पद्धतीने छापलेले असतात. त्या तुलनेत महिलांच्या खेळांचं वार्तांकन फारसं सविस्तर नसतं.
 
महिला खेळाडूंचे फोटो हे अतिशय छोटे असतात किंवा कधीकधी बातमीमध्ये फोटोच नसतात, असंही संशोधनातून समोर आलं. मेरी कोम, पीव्ही सिंधू किंवा सायना नेहवालसारख्या प्रसिद्ध खेळाडूंच्या बातम्यांनाच फोटो असतात. आकडेवारीच्याच हिशोबात सांगायचं तर महिलासंबंधीच्या बातम्यांपैकी 40 टक्के बातम्यांना फोटोच नसतात.
 
महिला खेळाडूंविषयी छापून आलेल्या बातम्यांचं नीट विश्लेषण करण्यासाठी संशोधकांनी या खेळाडूंबद्दल छापून आलेल्या बातम्यांची नीट वर्गवारी केली. बातमी, मुलाखत, फोटो-फीचर, विशेष लेख आणि महिला खेळाडूंनी लिहिलेले लेख अशी वर्गवारी तयार करण्यात आली. त्यात असं दिसून आलं की एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल विस्तारानं वार्तांकन केलं जातं, पण विशिष्ट खेळाडूचं प्रोफाइल किंवा त्याच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे याकडे फार लक्ष दिलं जात नाही.
 
संशोधनासाठी निवडलेल्या तीन वर्षांच्या कालखंडाचा विचार केला, तर केवळ 9 वेळा एखाद्या महिला खेळाडूचं फोटो फीचर केल्याचं पहायला मिळालं. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश होता.
 
हरियाणाचं अव्वल स्थान
या संशोधनामध्ये केवळ महिला खेळाडूंसंबंधी तयार केल्या गेलेल्या विशेष वृत्तांचाही अभ्यास केला गेला, त्यात नमूद केलेल्या राज्यांचाही तौलनिक अभ्यास केला गेला. या वृत्तांमध्ये सर्वाधिक वेळा उल्लेख झालेलं राज्य होतं हरियाणा. हरियाणाचा उल्लेख 60 वेळा करण्यात आलाय. आंध्र प्रदेशचा उल्लेख 28 वेळा आहे आणि मणिपूरचा 20 वेळा आहे.
 
बऱ्याचशा लेखांमध्ये, ज्या महिला खेळाडू तुलनेनं कमी प्रसिद्ध आहेत त्यांचा उल्लेख हा त्यांच्या राज्यासोबत आहे. कारण अनेक सामान्य लोकांना राष्ट्रीय खेळाडूंची नाव आणि ते ज्या राज्यातून येतात ती राज्यं माहिती असतात.
 
हरियाणातील उदयोन्मुख महिला खेळाडूंसाठी बहुतांश वेळा 'झज्जर गर्ल', 'हरियाणा बॉक्सर', 'भिवानी गर्ल' अशा उपमा वापरल्या जातात. त्यातून ती खेळाडू मूळ कुठली आहे, हेही कळतं. राज्यांची नावंही अशा संदर्भांसाठी वापरल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. 'आसाम गर्ल', 'दिल्ली गर्ल' आणि 'महाराष्ट्र गर्ल' अशी संबोधनंही वापरली गेली आहेत.
 
कार्यप्रणाली आणि मर्यादा
या संशोधनासाठी जी पद्धत अवलंबली गेली त्यामध्ये 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'हिंदुस्तान टाइम्स' या भारतातील दोन सर्वाधिक खपाच्या इंग्रजी वर्तमानपत्रांचा अभ्यास केला गेला. संधोधनासाठी डिसेंबर 2017 ते ऑक्टोबर 2020 हा तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला गेला. या वर्तमानपत्राच्या डिजिटल आवृत्तींच्या उपलब्धतेचा विचार करून हा कालावधी ठरविण्यात आला. या वर्तमानपत्रांच्या दिल्ली आवृत्तीचं विश्लेषण करण्यात आलं.
 
वर्तमानपत्राचं पहिलं पान आणि क्रीडाविषयक पान प्रामुख्याने अभ्यासासाठी निवडण्यात आलं, पण अन्य कोणत्याही पानावर जर संशोधनासाठी आवश्यक बातम्या आढळल्या तर त्यांचाही विचार या अभ्यासासाठी करण्यात आला. इतर कोणत्याही पानांचा विचार अभ्यासासाठी करण्यात आला नाही.
 
सँपल साइज म्हणून क्रीडाविषयक पानावर छापल्या गेलेल्या सर्व बातम्या आणि फोटोंची संख्या मोजली. पहिल्या पानावर छापल्या गेलेल्या क्रीडाविषयक बातम्या आणि फोटोही विचारात घेतले गेले.
 
महिला खेळाडूंविषयीचे वृत्तांत स्वतंत्रपणे मोजले. क्रीडा प्रकार, खेळाडूंची संख्या, संबंधित बातमीचे कॉलम, बातमीत वापरलेले फोटो, त्यांचा आकार, खेळाडूचं राष्ट्रीयत्व किंवा राज्य, खेळाडूंसाठी वापरलेली विशेषणं, लेखाचा प्रकार (बातमी, मुलाखत, फीचर स्टोरी इत्यादि) अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचारही या संशोधनासाठी केला गेला.
 
दोन कोडर्स होते, जे सगळ्या स्टोरींना संकेतांक देत होते. सुरुवातीला कोडर्सने एकत्र काम करत 15 दिवसाच्या वर्तमानपत्रांना संकेतांक दिले, जेणेकरून एकत्र केलेल्या माहितीमध्ये एकसंधता येईल. कोडिंग करताना येणाऱ्या समस्यांवर दोन्ही कोडर्सनी चर्चा केली आणि एकसंधता ठेवत कोडिंगची प्रक्रिया पूर्ण केली.
 
डेटाला संकेतांक देण्यासाठी एक कोड शीट तयार करण्यात आली होती. त्यामध्ये वेगवेगळ्या वर्गवारीसाठी वेगवेगळे क्रमांक दिले गेले. क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या बातम्या, खेळाडूंसंबंधीच्या बातम्या, इंटरव्ह्यू अशा वेगवेगळ्या प्रकारातील 3563 बातम्या एकत्रित करण्यात आल्या.
 
या सगळ्या बातम्या संशोधनासाठी निवडल्या गेलेल्या दोन वर्तमानपत्रांच्या दिल्ली आवृत्तीमधून घेतल्या गेल्या होत्या. डिसेंबर 2017 ते ऑक्टोबर 2020 पर्यंतचा कालखंड यासाठी निवडला गेला होता. वर्तमानपत्रांच्या ई आवृत्यांचा वापर केला गेला. महिलांसंबंधीच्या बातम्यांच्या कव्हरेजसाठी किती कॉलमची जागा दिली गेली, याचा विचार केला गेला.
 
यामुळे संशोधनावर काही प्रमाणात मर्यादाही आल्या. कारण संशोधनासाठी निवडलेला कालावधी आणि कॉलमची संख्या यासाठी प्रिंटचा नाही, तर डिजिटल आवृत्तीचा विचार केला गेला होता.