शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (20:14 IST)

राहुल द्रविडच्या सल्ल्याची प्रिंटआऊट काढा, स्पिन बॉलिंग चांगली खेळू शकाल- केव्हिन पीटरसन

स्पिन बॉलिंगचा यशस्वी सामना करायचा असेल तर राहुल द्रविड यांच्या सल्ल्याची प्रिंटआऊट काढा आणि तसं खेळा असं इंग्लंडचा माजी बॅट्समन केव्हिन पीटरसनने म्हटलं आहे.
 
इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंग्लंडचे डॉमनिक सिबले आणि झॅक क्राऊले हे युवा सलामीवीर श्रीलंकेच्या स्पिनर्सविरुद्ध खेळताना विकेट गमावत आहेत.
 
तुम्हाला स्पिन बॉलिंगचा सक्षमपणे सामना करायचा असेल तर भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी मला दिलेला सल्ला प्रमाण माना असं ट्वीट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने केलं.
 
तासाभरात पीटरसनने द्रविडने पाठवलेला मेल शोधून काढला आणि पुन्हा ट्वीट केलं. या इमेलची प्रिंट काढून सिबले आणि क्राऊले या जोडगोळीला द्या. यावर तपशीलवार बोलायचं असेल तर हे दोघं मला केव्हाही कॉल करू शकतात असं पीटरसनने म्हटलं आहे.
 
२०१० मध्ये केव्हिन पीटरसनला बांगलादेश दौऱ्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशच्या शकीब अल हसन आणि अब्दुल रझ्झाक यांचा सामना करताना पीटरसनची तारांबळ उडाली होती. त्यामुळे दौरा आटोपल्यानंतर पीटरसनने द्रविडकडे स्पिन बॉलिंग कशी खेळावी यासंदर्भात सल्ला मागितला होता. त्याआधी दोन वर्ष पीटरसन आणि द्रविड आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी खेळायचे. तिथेच त्यांचे मैत्र जुळले. द्रविडने इमेलच्या माध्यमातून पीटरसनला स्पिन खेळताना तंत्रात काय बदल करावेत ते सांगितलं.
 
पीटरसनने केपी-द ऑटोबायोग्राफी या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केला होता. आशियाई उपखंडात स्पिनर्सविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या मोजक्या आधुनिक विदेशी खेळाडूंमध्ये पीटरसनचं नाव अग्रणी आहे.
 
नुकत्याच झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंच्या वाटचालीत राहुल द्रविडची भूमिका मोलाची होती. आता इंग्लंडच्या युवा बॅट्समनला स्पिन खेळण्याचं द्रविडचं तंत्र कामी येऊ शकतं.
 
द्रविडने पीटरसनला नेमकं काय लिहिलं होतं हे जाणून घेऊया
 
चॅम्प,
 
मी दोन गोष्टी स्पष्ट करू इच्छितो- आपलं ज्या दोन बांगलादेशच्या बॉलर्स विषयी खेळणं झालं त्यांच्या विरुद्ध मी खेळलेलो नाही आणि ही मालिका पाहूही शकलेलो नाही. त्यामुळे मी बोलतोय त्यात विसंगती आढळली किंवा संदर्भहीन, अव्यवहार्य तर सरसकट दुर्लक्ष कर.
 
आपल्या सगळ्यांनाच माहितेय, सल्ला देणं सोपं असतं. जोपर्यंत तुम्ही मैदानात उतरून लढत नाहीत, परिस्थितीला सामोरं जात नाही तोपर्यंत जाणीव होऊ शकत नाही.
 
त्यांचे स्पिनर वेगात बॉल टाकतात. खेळपट्या स्पिनर्ससाठी अनुकूल असतील तर त्यांचा सामना करणं कोणत्याही बॅट्समनला अवघडच आहे.
 
जे स्पिनर वेगात बॉल टाकतात (मी अनिल कुंबळेविरुद्ध खेळत मोठा झालो आहे) त्यांच्यासमोर खेळताना कोणताही फटका ठरवून न खेळता, पुढचा पाय खेळपट्टीवर घट्ट रोवून खेळण्याऐवजी पुढे जाऊन खेळावं. आपण पुढे जाऊन खेळू इच्छितो तसं करणं योग्य पण त्याचवेळी बॅकफूटवर जाऊन खेळताना बाद होऊ नये या द्विधा मनस्थितीत तुम्ही फ्रंटफूट (पुढचा पाय) खूप आधीच पुढे टाकून खेळण्याची चूक करता. त्यामुळे फटका खेळण्याचं सगळं टायमिंगच बिघडून जातं. तुमची बॅट खूपच वेगाने खाली येते (कारण फ्रंटफूट अर्थात पुढचा पाय पुढे रोवला गेला, त्यावेळी तुमच्या मेंदूला बॅटने खेळण्याची सूचना मिळते) त्यामुळे ढकलल्यासारखा फटका खेळला जातो, बॉल तुमच्यापर्यंत येऊन तुम्ही फटका खेळत नाही.
 
एवढं सगळं होत असताना, बॉल वळत असेल तर तुम्ही बॉलच्या दिशेने जाऊ लागता. तुम्ही ठरवलेल्या फटक्याची दिशा भरकटते आणि बॉल वळून तुमचा बचाव भेदला जातो. (तुम्ही किती वेळा चकलात याची नोंद कुणीही ठेवत नाही)
 
याचा परिणाम हार्ड हँड्समध्येही होतो. सोप्या शब्दात सांगायचं तर घट्ट स्थितीतल्या हातांनी फटका खेळणं. ट्रान्सफर ऑफ वेट अर्थात शरीराचा भार कुठून कुठे जातोय त्याचं प्रमाण योग्य असेल आणि तुमची बॅट वेळेत खाली येत असेल म्हणजे गोष्टी अचूक मार्गावर आहेत. अशा स्थितीत बॅट फटका खेळण्यासाठी योग्य स्थितीत आहे.
 
ऑस्ट्रेलियात स्पिन बॉलिंग खेळताना मला थोडी अडचण जाणवली होती. कारण माझं टायमिंग नीट नव्हतं त्यामुळे मी बॉलच्या दिशेने ढकलल्यासारखा फटका खेळत असे. यामुळे बॅट आणि पॅडमध्ये बरंच अंतर राहत असे. टायमिंगच्या बाबतीत असं होणं एकदमच ओशाळवाणं असतं. टायमिंग शिकवणं किंवा सांगणं अशक्य आहे.
 
हे सगळं सुप्त मनात सुरू असतं. याचा तुम्ही विचार करू शकत नाही.
 
तुम्ही काही गोष्टींचा प्रयत्न नक्कीच करू शकता. सरावावेळी बॉलरच्या हातात असलेल्या बॉलला पाहून बॉल कोणत्या टप्प्यावर पडेल याचा अंदाज घ्या. त्यामुळे तुम्ही बॉल बॉलरच्या हातून सुटेपर्यंत नीट पाहाल.
 
पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न करा पण हेही लक्षात ठेवा की रन्स करण्याच्या खूपशा संधी बॅकफूटवरून खेळताना मिळू शकतात.
 
पुढे होऊन खेळताना बॉल पडण्याआधीच कुठला फटका खेळणार हे ठरवू नका. बॉल पडल्यानंतर गरज पडली तर बॅकफूटवर जाऊन रन्स मिळतात का याचा अंदाज घ्या.
 
ग्रॅमी स्वान किंवा मॉँटी पानेसरविरुद्ध खेळताना पॅड न घालता किंवा फक्त नी पॅड घालून सराव करावा (मॅचच्या आदल्या दिवशी असा सराव करू नये) जेव्हा तुमच्या पायावर पॅडचं कवच नसतं त्यावेळी तुम्ही बॅट पॅडच्या पुढे ठेऊन खेळायचा प्रयत्न करता. तुम्ही बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत पाहता. काहीवेळेस हे वेदनादायी ठरू शकतं. पायावर पॅडचं कवच नसताना तुमचे पाय ढकलले जाणार नाहीत. माझे कोच मला सांगायचे की स्पिन बॉलिंग खेळण्यासाठी पॅडची आवश्यकता असता कामा नये.
 
केपी, तू एक उत्तम खेळाडू आहेस. तू बॉल नीट पाहायला हवास, तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेव. तू शांतपणे क्रीझमध्ये उभा राहून खेळलास तर तुला बॉलच्या टप्प्याचा आणि खोलीचा अंदाज येईल आणि स्पिन बॉलिंग चांगल्याप्रकारे खेळू शकशील. दडपणाखाली असताना विशेषत: डावाच्या सुरुवातीला आपल्या डोक्यातून काही गोष्टी निसटून जातात. तू एखाद्या बॉलवर बिट झालास, बॉल स्पिन होऊन विकेटकीपर किंवा अन्य कोणाकडे गेला तर दिग्मूढ होण्याचं कारण नाही. तू अजूनही खेळपट्टीवर आहेस हे लक्षात ठेव. आधीच्या बॉलवर काय घडलं हे जेवढं लवकरात लवकर विसरून जाशील तेवढं पुढचा बॉल खंबीरपणे खेळू शकशील. तुला स्पिन बॉलिंग खेळता येत नाही हे कोणालाही म्हणू देऊ नकोस. तू नक्कीच स्पिन बॉलिंग चांगल्या प्रकारे खेळतोस आणि यापुढेही चांगल्या पद्धतीने खेळशील.
 
असो, मी बरंच गुंतागुंतीचं बोललो आहे. तुला मनापासून शुभेच्छा.
 
राहुल