PMC बँक: मुंबई हायकोर्टाने मागवली RBI कडून माहिती
PMC बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) निर्देश दिले आहेत. खातेधारकांना दिलासा देण्यासाठी काय पावलं उचलली आहेत, या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे, याची माहिती न्यायालयानं मागितली आहे.
13 नोव्हेंबरपर्यंत ही माहिती न्यायालयात सादर करण्याचे निर्देश RBI ला दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी PMC घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हे निर्देश दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायाधीश रियाज छागला यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.