मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणतात गोमूत्राने कॅन्सर बरा झाला.. पण हे खरंच शक्य आहे?

मालेगाव बाँबस्फोटाच्या आरोपी आणि भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोमूत्राने कॅन्सर बरा झाल्याचा दावा केल्यानंतर गोमूत्राने खरंच कॅन्सर बरा होऊ शकतो का अशी चर्चा ट्विटरवर सुरू झाली.
 
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की गोमूत्र आणि पंचगव्यापासून बनलेल्या औषधीपासून माझा कॅन्सर बरा झाला. प्रज्ञासिंह यांच्या दाव्यामुळे रुग्णांची दिशाभूल होऊ शकते असं कॅन्सरतज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबई मिररने केलेल्या बातमीनुसार प्रज्ञासिंह यांचा दावा फसवा आहे असं मत टाटा मेमोरियलचे संचालक राजेंद्र बडवे यांनी मांडलं आहे.
 
'शपथपत्रावर सांगितलं होतं की कॅन्सर आहे'
आपल्याला कॅन्सर आहे असा दावा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता. प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी आहेत आणि सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. 2017मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला. आपल्याला कॅन्सर आहे त्यामुळे मला जामीन मिळावा असं त्यांनी अर्जात म्हटलं होतं. त्यांनी जोडलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. त्यांना 2017मध्ये कॅन्सर होता आणि 2019 मध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे की त्यांचा कॅन्सर बरा झाला आहे.
साध्वी प्रज्ञांचा जामीन रद्द होऊ शकतो का?
साध्वी प्रज्ञांनी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं सांगितलं होतं. प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना न्यायालयाने जामीन दिला होता. जर आता त्यांची प्रकृती चांगली असेल तर त्यांचा जामीन रद्द होऊ शकता का असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
 
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील या मुद्द्यावर ट्वीट केलं होतं. प्रज्ञा ठाकूर या प्रकृती ठीक नाही या कारणामुळे जर बाहेर असतील तर त्या निवडणूक कशा लढवू शकतात असा प्रश्न ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला होता. आधाराशिवाय चालता देखील येत नाही असं म्हणणाऱ्या साध्वी रणरणत्या उन्हात प्रचार करताना दिसत आहेत असं ओमर म्हणाले.
 
ठाकूर यांचा जामीन रद्द होऊ शकतो का? याबद्दल कायदेतज्ज्ञ काय म्हणतात बघा.
आई-वडिलांची प्रकृती ठीक नाही, त्यांचा मृत्यू झाला किंवा स्वतःची प्रकृती नीट नाही या कारणावर जर जामीन दिला असेल आणि पुढे चालून ते कारणच नष्ट झालं असेल जामीन रद्द केला जातो. प्रज्ञासिंह ठाकूर या कायद्याच्या पळवाटांचा वापर करताना दिसत आहेत.
 
2008च्या बाँबस्फोटातील मृताचे वडील निसार सईद यांनी NIA न्यायालयात तक्रार दाखल केली आहे की जर साध्वी यांनी 'हेल्थ ग्राउंड'वर अर्ज केला आहे तर त्या प्रचार करताना कशा दिसत आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं होतं पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. निवडणूक लढवण्यावर न्यायालय बंदी घालू शकत नाही. तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.
'प्रज्ञासिंह ठाकूर यांना कॅन्सर झालाच नाही?'
मुंबईच्या जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मुंबई मिररला सांगितलं की 2010मध्ये त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांची तपासणी केली होती. त्यांच्या तपासण्या घेतल्या होत्या तेव्हा कोणत्याही मोठ्या आजाराची लक्षणं त्यांच्यात दिसली नव्हती. या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
 
'द हिंदू' वृत्तपत्राशी बोलताना राम मनोहर लोहिया रूग्णालयातील डॉक्टरांनी काय म्हटलं?
लखनौमधील राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डॉक्टर एस.एस.राजपूत यांनी 'द हिंदू' सोबत बोलताना सांगितलं की, "प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर 'बायलॅटरल मस्टक्टॉमी' अर्थात स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली आहे. डॉ.राजपूत पुढे सांगतात, "प्रज्ञासिंह यांना स्टेज 1 कॅन्सरचं निदान झालं होतं. जो आक्रमकपणे शरीरात पसरण्याची भीती होती."
 
दरम्यान प्रज्ञासिंह यांनी गोमूत्राने कॅन्सर बरा होऊ शकतो असा दावा केलाय, त्यावर तुमचं म्हणणं काय आहे असा प्रश्न विचारल्यानंतर डॉ.राजपूत म्हणाले, "प्रज्ञासिंह यांनी कॅन्सरवर शस्त्रक्रियेनं उपचार केले आहेत. मी 2008 मध्ये पहिल्यांदा मुंबईच्या जेजे रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी त्यांच्या उजव्या स्तनामध्ये ट्यूमर होता. 2012 मध्ये ट्यूमर पुन्हा उद्भवला. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्यांच्या उजव्या स्तनाचा एक तृतीयांश भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला. दुसरी शस्त्रक्रिया भोपाळच्या खासगी रुग्णालयात झाली."
 
"त्यानंतर ट्यूमर आणि पेशी तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्या. ज्यातून त्यांना स्टेज वन कॅन्सर असल्याचं निदान झालं. ज्याचे रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आले आहेत." "2017 मध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावर 'बायलॅटरल मस्टक्टॉमी' अर्थात स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली." अर्थात त्यांनी रेडिएशन किंवा किमोथेरपी करण्यात आली का? याची माहित डॉ.राजपूत यांनी दिली नाही."