शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (16:27 IST)

Rafale: रफाल विमानाच्या शस्त्रपूजनावरून राजनाथ सिंह यांचं ट्रोलिंग

फ्रान्सनं पहिलं रफाल लढाऊ विमान भारताच्या ताब्यात दिलं. ते विमान आणण्यासाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे फ्रान्सला गेले. रफालचा ताबा मिळाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी त्याची पूजा केली.
 
राजनाथ सिंह यांनी कुंकवाच्या बोटानं ओम काढला तसंच विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेवून, नारळ आणि फुलं वाहिली.
 
सोशल मीडियावर या शस्त्रपूजनाची दिवसभर चर्चा झाली. कुणी कौतुक केलं, कुणी टोमणे मारले, तर कुणी अंधश्रद्धा म्हणत टीकाही केलीय.
 
"विजयादशमीच्या दिवशी फ्रान्समध्ये रफालचं शस्त्रपूजन केलं. विजयादशमीला शस्त्रपूजन करणं भारताची परंपरा आहे," असं ट्वीट करत राजनाथ सिंह यांनी पूजेचे फोटो शेअर केले.
राजनाथ सिंह यांचे पुत्र आणि भाजपचे नेते पंकज सिंह यांनीही हे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि "शस्त्रपूजनामुळे प्रत्येक भारतीयाला आनंद आणि अभिमान" वाटल्याचं त्यांनी सांगितलं.
राजनाथ सिंह यांनी रफालची पूजा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर #Rafale, #RafaleOurPide, #Politics #ShastraPuja आणि #Nibu असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. इतकंच नव्हे, तर #RafalePujaPolitics हा हॅशटॅग तर ट्विटरवर टॉप ट्रेंड होता.
 
सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे?
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी "अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी!" अशी यावर टीका केली आहे.
 
"देशाच्या रक्षणासाठी #Rafale आणलंय अन् राफेलच्या यशस्वी उड्डाणासाठी लिंबांचा उतारा ठेवला जातोय. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही," असंही ते म्हणाले.
अमित कुमार सिंह यांनी ट्विटरवर लिहिलंय, "पहिलं देशाच्या रक्षणासाठी रफाल खरेदी करा, नंतर राफेलच्या रक्षणासाठी लिंबू खरेदी करा."

 
'नेहरूविअन अजित' नावाच्या ट्विटर युजरनं व्यंगचित्र ट्वीट केलंय. भारतातल्या गाड्यांवर अनेकदा जो मजकूर लिहिला जातो, तो राफेलवर लिहिल्यावर कसं दिसेल, हे दाखवण्याचा त्यांना प्रयत्न केलाय.
मारन नावाच्या ट्विटर युजरनं म्हटलंय, "मला कळत नाहीय, लोक याला धार्मिक रंग का देऊ पाहतायत? आपल्याला अभिमान वाटायला हवा. जेव्हा मी राफेलचा फोटो पाहतो, तेव्हा अभिमान वाटतो. शस्त्रपूजेत चूक काय आहे?"
सोनाली शिंदे या फेसबुकवर प्रश्न विचारतात, "लिंबात इतकी ताकद आहे तर मग राफेलची खरेदी कशाला?"
अनिकेत प्रल्हाद बोंद्रे राफेलच्या पूजनावर टीका करतात.
 
विनय काटे यांनी फेसबुकवरून शस्त्रपूजेवर टीका केलीय.