शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

श्रीलंकेत बाँब हल्ल्यांनंतर आता चेहरा झाकण्यावर बंदी

मुस्लीम महिलांचा बुरखा किंवा निकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणून लोकांनी चेहरे झाकू नयेत असं श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. सोमवारपासून (29 एप्रिल) हा नियम लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून हा तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे.
 
बुरखा किंवा निकाब घालणाऱ्या मुस्लीम महिलांचा या निर्णयात उल्लेख केला नाहीये पण सरसकट सगळ्यांच लोकाना यापुढं चेहरा झाकता येणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. श्रीलंका बाँब हल्ल्याचे धागदोरे केरळमध्येही लागत असल्याचं समोर येत आहे.
 
हल्ल्याचा सुत्रधार झारान हाशिमच्या नातेवाईकांचा मृत्यू
बाँब हल्ल्यानंतर संपूर्ण श्रीलंकेत तपास मोहीम चालू आहे. याच तपास मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी पोलिसांच्या एका पथकाने सैंथमारूथू या ठिकाणी एका घरावर धाड टाकली. सैंथमारूथू हे ठिकाण या हल्ल्याचा संशयित सूत्रधार असलेल्या झहरान हाशिम यांच्या गावाजवळच आहे. त्या वेळी पोलीस कारवाई सुरू असताना एका बंदुकधाऱ्याने पोलिसांच्या पथकावर गोळीबार सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
त्यानंतर तिघांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात सहा मुलं आणि तीन महिला यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय तीन जण गोळीबारात मृत्युमुखी पडले, असं पोलिसांनी सांगितलं. यामध्ये झहरान हाशिमचे वडील आणि त्याच्या दोन भावांचा मृत्यू झाल्याचं हाशिमच्या जवळच्या नातेवाईकांनी बीबीसीला सांगितलं.
 
Reuters वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मोहमद हाशिम आणि त्यांचे मुलगे झैनी हाशिम आणि रिलवा हाशिम यांचा समावेश आहे.
 
त्यादिवशी काय घडलं?
कोलंबो, नेगोम्बो आणि बट्टीकोला इथल्या चर्चमध्ये आणि कोलंबोतल्या शांग्री-ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल याठिकाणी एकूण 8 स्फोट झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी 8.45 वाजता पहिल्यांदा बाँबस्फोट झाल्याच वृत्त आलं. त्यांनंतर एकामागून एक असे सहा स्फोट झाले.
 
पोलिस जेव्हा हल्लेखोरांचा शोध घेत होते तेव्हा आणखी दोन स्फोट घडले. म्हणजे एकूण आठ स्फोट काही मिनिटांच्या अंतराने झाले. हल्ल्यात 253 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 500हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आठव्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकारीही मारले गेलेत.
 
हल्ला कुणी केला?
हे स्फोट घडवण्याचा संशय 9 जणांवर आहे. झहरान हाशिम या कट्टर धर्मप्रचारकाने हा हल्ला घडवल्याचं सांगितलं जातं. त्याचा कोलंबोमधील शांग्री-ला हॉटेलातील स्फोटात मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
तसेच मसाला व्यापारी मोहम्मद युसुफ इब्राहिमच्या दोन मुलांचाही यात समावेश असल्याचं सांगितलं जातं. स्फोटांनंतर इब्राहिमला पकडण्यात आलं आहे. त्याच्या एका मुलाने झहरानबरोबर शांग्री ला हॉटेलमध्ये स्फोट घडवल्याचं समजतं. तर दुसऱ्याने सिनॅमन ग्रँड हॉटेलला लक्ष्य केलं.
 
या हल्लेखोरांपैकी बहुतेक सर्वजण उच्चशिक्षित होते तसंच मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गातील होते, असं श्रीलंकेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतरही कार्यवाही का करण्यात आली नाही, यासंदर्भात श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर 24 संशयितांना ताब्यात घेतल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेले सगळे नागरीक हे श्रीलंकनच आहेत.
 
'आंतरराष्ट्रीय नेटवर्क'च्या मदतीने हे साखळी बॉम्बस्फोट घडवल्याचं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नॅशनल तोविड जमात या स्थानिक जिहादी गटाने हे स्फोट घडवले आणि त्यासाठी परदेशी दहशतवादी संघटनांची मदत घेण्यात आली, असा दावा श्रीलंकेच्या सरकारने केला आहे.