गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषाच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं सांगितलं जात आहे.
ज्या मिनिआपोलीस शहरात कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूपासून ही आंदोलनं सुरू झाली होती, त्या शहराने आता अख्खं पोलीस प्रशासनच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मिनिआपोलीस नगर पालिकेत मांडण्यात आलेल्या या ठरावाला 13 सदस्यांपैकी 9 जणांनी संमती दिली आणि सार्वजनिक सुरक्षिततेची एक पर्यायी व्यवस्था तयार करण्याच्या बाजूने मतदान केलं आहे.
शहराचे महापौर जेकब फ्रे यांनी या ठरावाला विरोध केला होता, पण जनतेकडून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आल्यानंतर त्यांनी माघार घेतली. वर्णद्वेषविरोधी आंदोलकांच्या मते हा एक मोठा कौल आहे.
25 मे रोजी फ्लॉईड यांना ताब्यात घेत असताना पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांनी त्यांच्या मानेवर गुडघा ठेवून दाबलं होतं. त्यातच श्वास कोंडून फ्लॉईड यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांविषयीचा वर्णभेद आणि पोलिसांकडून त्यांच्या होणाऱ्या हत्यांबद्दल निदर्शनं सुरू आहेत.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये काही ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागलं असून, अमेरिकेतल्या 40 पेक्षा जास्त शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता.
मिनिआपोलीस नगर पालिकेने काय निर्णय घेतलाय?
या निर्णयाच्या बाजूने मत देणाऱ्या नऊ पालिका सदस्यांनी एक निवेदन जनतेपुढे वाचून दाखवलं. त्यात ते म्हणाले, "मिनिआपोलीस आणि देशभरातल्या अनेक शहरांमध्ये आता हे स्पष्ट झालंय की सध्याच्या कायदा-सुव्यवस्था प्रशासनाला आपले काही समुदाय सुरक्षित ठेवण्यात अपयश आलंय, म्हणून आज आम्ही इथे आहोत. थोडा थोडा सुधार करण्यास आपण निश्चितच अपयशी ठरलोय," असं पालिका अध्यक्ष लिसा बेंडर म्हणाल्या.
पण याला पर्यायी व्यवस्था काय असेल, याविषयी आपण पुढे चर्चा करू, असं त्या म्हणाल्या. आतापर्यंतचा पोलीस निधी आपण यापुढे लोकसहभागातून काम करण्यासाठी वापरू, असंही त्या म्हणाल्या.
पण या निर्णयाला महापौरांनी विरोध केल्यामुळे ही प्रक्रिया अगदीच सुरळीत आणि झटपट पार पडेलच, याची शाश्वती नाही. ज्या राज्यात हे मिनिआपोलीस शहर येतं, त्या मिनेसोटातल्या 'ब्लॅक विझन' या हक्क संघटनेचे संचालक कँडेस माँटगोमेरी म्हणाले, "या निर्णयापर्यंत पोहोचायला इतके जीव जायला नको होते. सरकारची फूस असलेल्या अशा सैराट पोलीस प्रशासनाशिवाय, कुठल्याही शस्त्रास्त्रांशिवाय आम्ही जास्त सुरक्षित आहोत."
तर अमेरिकेत इतर काही राज्यांमध्येही "Defund the police" अर्थात पोलिसांसाठी दिला जाणारा निधी बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासिओ यांनी जाहीर केलंय की ते पोलीस प्रशासनासाठी राखीव निधी आता सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरणार आहेत.
जॉर्ज फ्लॉईड यांच्यासोबत काय घडलं?
एका दुकानदाराला 20 डॉलर्सची बनावट नोट दिल्याचा आरोप जॉर्ड फ्लॉईड यांच्यावर होता. कारवाई करणाऱ्या पोलिसांनी फ्लॉईड यांची गाडी रोखली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार - त्यांना कारपासून दूर जाण्यास सांगण्यात आलं असता, त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. या घटनेच्या व्हायरल व्हीडिओत जॉर्ज फ्लॉईड जमिनीवर पडलेले आहेत आणि एक श्वेतवर्णीय अधिकारी त्यांच्या गळ्यावर गुडघा दाबून बसल्याचं दिसतंय. "प्लीज, मला श्वास घेता येत नाहीये,", "पाय उचला, मला मारू नका," अशी विनवणी करताना फ्लॉईड या व्हीडिओत दिसतात.
डेरीक शॉविन, टू थाओ, थॉमस लेन आणि जे अलेक्झांडर क्युएंग हे चौघे अधिकारी या घटनेत सहभागी असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर शॉविन या अधिकाऱ्यावर सेकंड डिग्री मर्डरचा आरोप ठेवण्यात आला आहे, तर अन्य तीन अधिकाऱ्यांवरही फ्लॉईड यांच्या खुनासाठी मदत केल्याचे आणि खुनाला प्रोत्साहन दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
हे आरोप म्हणजे न्यायाच्या दिशेने आणखी एक पाऊस असल्याचं मिनेसोटाच्या सिनेटर एमी क्लोबशार यांनी ट्विटरवर म्हटलंय. तर फ्लॉईड कुटुंबाचे वकील बेंजामिन क्रम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं, "न्यायाच्या मार्गातलं हे एक महत्त्वाचं पुढचं पाऊल आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याआधी ही कारवाई करण्यात आल्याचं आम्हाला समाधान आहे."