बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (11:32 IST)

प्रकाश आंबेडकरांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींची तुलना करण्यामागचं राजकारण

"शिवसेनेने आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा मुद्द्याचा त्याग करू नये, एवढीच माझी विनंती आहे. सेनेने या मुद्द्याचा त्याग केला तर आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी' झाल्याशिवाय राहणार नाही."
 
"त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकच मार्ग आहे. आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होऊ द्यायचा नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा मुद्दा भाजपसमोर रेटला पाहिजे." असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सोमवारी (9 सप्टेंबर) म्हणाले.
 
लोकसभा निवडणुकीपासूनच प्रकाश आंबेडकर राज्याच्या राजकारणात प्रचंड सक्रिय झाले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी त्यांना मिळालेला लोकांचा प्रतिसाद तसंच त्यांनी घेतलेल्या मतांची टक्केवारी चांगली होती. प्रकाश आंबेडकर यांना आता विधानसभा निवडणूक खुणावू लागली आहे.
 
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल असा अंदाज व्यक्त केला होता. याला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, "विरोधी पक्षनेता नव्हे तर मुख्यमंत्रीच वंचित बहुजन आघाडीचा असेल."
 
हे सगळं प्रकरण ताजं असतानाच आंबेडकर यांनी नवीन विधान केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेचा युवा चेहरा आदित्य ठाकरे यांची तुलना राहुल गांधींशी केली आहे. यामागे काय राजकारण असेल असा प्रश्न निर्माण होतो.
 
'त्यांनी ओवेसींशी बोलावं'
प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली. आंबेडकरांनी त्यांच्या पक्षाबाबत बोलावं असं ठाकरे यांनी सांगितलं.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "मला या विषयावर बोलायचं नाही. इतर लोकांनीही आपल्या पक्षाबद्दल बोलावं. मला शिवसेना म्हणून जे काही बोलायचं असेल ते मी ठणठणीत बोलत असतो. त्याप्रमाणे या विषयावरही मी आधी खूप वेळा बोललेलो आहे. प्रकाश आंबेडकरांनीही शिवसेनेबद्दल बोलण्यापेक्षा ओवेसींसोबत बोलावं."
 
'खिल्ली उडवण्याचा प्रयत्न'
 
ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य म्हणजे एकमेकांचा उचकवण्यासाठीचा प्रयत्न आहे. ही राजकीय टोलेबाजीच असून त्याला इतका जास्त काही अर्थ नाही."
 
भिडे पुढे सांगतात, "शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद तरी मिळावं म्हणून आदित्य ठाकरेंना पुढे केलं आहे. भाजपकडे जागा मुळातच जास्त असल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं शक्य नाही. शिवसेनेने खूपच ताणून धरलं आणि भाजपकडे जागा कमी असतील तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं."
"देवेंद्र फडणवीस उद्याचा विरोधी पक्ष वंचित आघाडी असू शकेल असं म्हणतात. भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या तर शिवसेनेला सत्तेत वाटाही मिळणार नाही. ते विरोधातही असू शकतात. त्यामुळे शिवसनेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत," असं भिडे सांगतात.
 
'तुलना होणं स्वाभाविक'
 
आदित्य ठाकरे हेसुद्धा राहुल गांधी यांच्याप्रमाणे घराण्याचा वारसा चालवण्यासाठी राजकारणात आले आहेत. या दोघांच्या कर्तृत्वापेक्षाही ते कोणत्या घराण्यात जन्माला आले आहेत याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे दोघांचीही तुलना होणं स्वाभाविक असल्याचं राजकीय अभ्यासक मृणालिनी नानिवडेकर सांगतात.
 
त्या पुढे सांगतात, "आदित्य ठाकरे सध्या ठिकठिकाणी फिरत आहेत. बरेच लोक त्यांच्यासोबत येत आहेत. अशावेळी त्यांच्याबद्दल कोणताही राजकीय नेता बोलेल. ते राजकीय वारसदार म्हणून समोर आले आहेत. त्यांचं स्थान पक्षाने स्वीकारलं आहे. दुसरीकडे, राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर स्वतःची जागा नव्याने तयार करू पाहत आहेत. ते शिवसेना-भाजपला लक्ष्य करतील हे उघड आहे. त्यामुळेच शिवसेनेचा स्टार प्रचारक असलेल्या आदित्यला त्यांनी लक्ष्य केलं आहे."
"प्रकाश आंबेडकर यांना बऱ्यापैकी राजकारणाची समज आहे. त्यामुळे कुठे घाव मारायचा ते जाणतात. निवडणुकांचा मोसम असल्यामुळे खिल्ली उडवण्याला महत्त्व आहे. त्या इमेजमधून बाहेर पडायचं असेल तर आदित्य ठाकरे यांनी रियल पॉलिटिक्समध्ये यावं, आणि काहीतरी करावं हीच एक राजकीय निरीक्षक म्हणून अपेक्षा आहे, असंही नानिवडेकर म्हणतात.
 
'त्यांनी शिवसेनेचा सल्लागार बनावं'
 
प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याऐवजी समाजाच्या भल्यासाठी कोणतं काम करावं याचा विचार करावा, असं पत्रकार प्रकाश अकोलकर यांना वाटतं.
 
अकोलकर सांगतात, त्यांनी शिवसेनेनं काय करावं किंवा भाजपनं काय करावं याचे त्यांना सल्ले देण्याऐवजी आपल्या समाजाच्या भल्यासाठी आपण कुणाबरोबर गेलं पाहिजे याचा विचार करावा.
 
"आंबेडकर यांच्यावर आधीच भाजपची बी टीम म्हणून शिक्का बसलेला आहे. ते काँग्रेसकडे अतार्किक मागण्या करतात. कांग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर युती नाही असं म्हणतात. त्यांनी याबद्दल आधी ठरवावं. शिवसेनेनं काय करावं किंवा आदित्य ठाकरेंनी काय करावं याचा सल्ला त्यांना द्यायचा असेल तर त्यांनी राजकारणातून बाहेर पडून शिवसेनेचा सल्लागार बनावं."